भगवान बुद्ध (पूर्वार्ध)

गौतम बुद्धांचे चरित्र


समकालीन धर्मिक परिस्थिति 3

मातंग ॠषि कांही काळाने प्रवास करीत मेज्झ राष्ट्रांत जाऊन पोचला. हें वर्तमान मांडव्याबरोबरच्या ब्राह्मणांना समजल्याबरोबर त्यांनी मेज्झराजाची अशी समजूत करून दिली की, हा नवीन आलेला भिकारी मायावी आहे आणि तो सर्व राष्ट्रांचा नाश करील. हें ऐकल्याबरोबर राजाने आपले शिपाई मातंगाच्या शोधासाठी पाठविले. त्यांनी त्याला एका भिंतीजवळ बसून भिक्षेंत मिळालेलें अन्न खात असतांना गाठलें आणि तेथेच ठार केलें. त्यामुळे देवता क्षोभल्या आणि त्यांनी तें राष्ट्र ओस पाडलें.

मातंगाच्या हत्येमुळे मेज्झ राष्ट्र ओस पडल्याचा उल्लेख अनेक जातकांत सांपडतो. या दंतकथेंत कितपत तथ्य आहे हें सांगतां येत नाही. तथापि मातंग ॠषि चांडळ होता व त्याची पूजा ब्राह्मण आणि क्षत्रिय देखील करीत होते, हें वसलसुत्तांतील खालील गाथांवरून स्पष्ट होतें.

तदमिना पि जानाथ यथा भेदं निदस्सनं ॥
चण्डालपुत्तो सोपाको मातंगो इति विस्सुतो ॥१॥

सो यसं परमं पत्तो मातंगो यं सुदुल्लभं ।
आगच्छुं तस्सुपट्टानं खत्तिया ब्राह्मणा बहू ॥२॥

देवयानं अभिरुय्ह विरजं सो महापथं ।
कामरागं विराजेत्वा ब्रह्मलोकूपगो अहु ।
न न जाति निवारेसि ब्रह्मलोकूपपत्तिया ॥३॥


(१) ह्याला मी एक उदाहरण देतों. कुत्र्याचें मांस खाणार्‍या चांडाळाचा एक पुत्र मातंग या नांवाने प्रसिद्ध होता.

(२) त्या मातंगाला अत्यंत श्रेष्ठ आणि दुर्लभ यश मिळालें. त्याच्या सेवेस पुष्कळ क्षत्रिय आणि ब्राह्मण हजर असत.

(३) विषयवासनेचा क्षय करणार्‍या थोर मार्गाचा व देवयानाचा (समाधीचा) अवलंब करून तो ब्रह्मलोकाला गेला. ब्रह्मलोकीं उत्पन्न होण्यास त्याचा जन्म त्याला आड आला नाही.

शंबूकाची कथा काल्पनिक

शंबूक नांवाचा शूद्र अरण्यांत तपश्चर्या करीत होता. त्यामुळे एका ब्राह्मणाचा मुलगा मरण पावला. रामाला ही गोष्ट समजल्यावर त्याने अरण्यांत जाऊन शंबूकाचा शिरच्छेद केला आणि ब्राह्मणाच्या मुलाला जिवंत केलें. ही कथा रामायणांत अत्यंत खुलवून वर्णिली आहे. कांही सौम्य स्वरूप देऊन भवभूतीने हा प्रसंग उत्तररामचरितांत देखील दाखल केला आहे. पण असा प्रकार बुद्धाच्या पूर्वी किंवा बौद्धधर्म हिंदुस्थानांत असेपर्यंत घडून आल्याचा कोठेच पुरावा सापडत नाही. राजाने असें वर्तन केलें पाहिजे, एवढेंच दाखविण्याचा ही कथा रचणार्‍याचा हेतु असावा.