भगवान बुद्ध (पूर्वार्ध)

गौतम बुद्धांचे चरित्र


समकालीन राजकीय परिस्थिति 11

मैथिलराजकुल
(८) दुसरे म्हणाले, ''मैथिल राजा सुमित्र याची राजधानी ही मिथिला नगरी अत्यंत रमणीय असून हत्ती, घोडे, पायदळ यांनी तो राजा संपन्न आहे. सोनें, मोतीं आणि जवाहीर त्याजपाशीं आहेत. सामन्त राजांची सैन्यें त्याच्या पराक्रमाला घाबरतात. तो मित्रवान आणि धर्मवत्सल आहे. म्हणून हें कुल बोधिसत्त्वाला योग्य होय.'' त्यावर दुसरे म्हणाले, ''असा हा राजा आहे खरा, परंतु त्याला पुष्कळ संतति असून तो अतिवृद्ध असल्याकारणाने पुत्रोत्पादन करण्याला समर्थ नाही. म्हणून तें देखील कुल बोधिसत्त्वाला अयोग्य आहे.''

''याप्रमाणें त्या देवपुत्रांनी जंबुद्वीपांतील सोळा राज्यांत (षोडश जानपदेषु) जीं लहान मोठीं राजघराणीं होतीं तीं सर्व पाहिलीं. पण तीं त्यांना सदोष दिसलीं.''*
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
* हें मूळ उतार्‍याचें संक्षिप्‍त रूपांतर आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आठच कुलांची माहिती
सोळा जनपदांपैकी येथे आठांच्याच राजकुलांचें वर्णन आहे. त्यांपैकी सुमित्राचें कुल त्याच्या मागोमागच नष्ट होऊन विदेहांचा अंतर्भाव वज्जींच्या राज्यांत झाला असावा. बाकी राहिलेल्या सातांत पांडवांच्या परंपरेंत कोणता राजा राज्य करीत होता, हें सांगितलें नाही आणि त्याची माहिती इतर बौद्ध ग्रंथांतही सापडत नाही. कुरुदेशांत कौरव्य नांवाचा राजा राज्य करीत होता असा उल्लेख रट्टपाल सुत्तांत आहे. तो पांडवकुलांतील होता याजबद्दल कोठे पुरावा नाही. राहिलेल्या सहा राजकुलांची जी माहिती येथे दिली आहे, तशीच कमीजास्त प्रमाणांत त्रिपिटक ग्रंथांत सापडते.

शाक्यकुल
बौद्ध ग्रंथांत शाक्यकुलाची माहिती विस्तारपूर्वक दिली आहे. असें असतां वरील सोळा जनपदांत शाक्यांचा नामनिर्देश मुळीच नाही, हें कसें ? याला उत्तर हें की, ही यादी तयार होण्यापूर्वीच शाक्यांचें स्वातंत्र्य नष्ट होऊन त्या देशाचा समावेश कोसलांच्या राज्यांत झाला, आणि म्हणूनच या यादींत त्यांचा निर्देश सापडत नाही.

बोधिसत्त्व गृहत्याग करून राजगृहाला आला असतां बिंबिसार राजाने त्याची भेट घेऊन तूं कोण आहेस असा प्रश्न विचारला. तेव्हा तो म्हणाला --

उजुं जानपदो राजा हिमवन्तस्स पस्सतो ।
धनविरियेन सम्पन्नो कोसलेसु निकेतिनो ॥
आदिच्चा नाम गोत्तेन, साकिया नाम जातिया ।
तम्हा कुला पब्बजितोम्हि राज न कामे अभिपत्थयं ॥

(सुत्तनिपात, पब्बज्जासुत्त)

'हे राजा, येथून सरळ हिमालयाच्या पायथ्याशीं कोसल देशांपैकी एक जानपद (प्रान्त) आहे. त्यांचें गोत्र आदित्य व जातिं शाक्य. त्या कुलांतून, हे राजा, मी कामोपभोगांची इच्छा सोडून परिव्राजक झालों आहें.'

ह्या गाथांत 'कोसलेसु निकेतिनो' हे शब्द महत्त्वाचे आहेत. कोसल देशांत ज्यांचें घर आहे, म्हणजे जे कोसल देशांत गणले जातात. यावरून शाक्यांचें स्वातंत्र्य कधीच नष्ट झालें होतें असें सहज दिसून येतें.

शाक्य कोसलराजाला कर देत असता आणि अन्तर्गत व्यवस्था आपण पाहत. महानामाच्या दासीकन्येशीं पसेनदीचा विवाह झाल्याची हकीकत वर दिलीच आहे. याविषयीं प्रो. र्‍हिस डेव्हिड्स शंका प्रदर्शित करतात. कोसल राजाचा सर्वाधिकार जर शाक्यांना मान्य होता, तर आपली मुलगी त्याला देण्याला शाक्यांना हरकत कां वाटावी, असें त्यांचें म्हणणें दिसतें.* परंतु हिंदुस्थानांतील जातिभेद किती तीव्र होता हें त्यांना माहीत नसावें. उदेपूरच्या प्रतापसिंहाला अकबराचें सार्वभौमत्व मान्य असलें तरी आपली मुलगी अकबराला देण्याला तो तयार नव्हता. कोसलकुल 'मातंगच्युत्युत्पन्न' असें ललितविस्तरांत म्हटलें आहे. त्यावरून हें कुल मातंगांच्या (मांगांच्या) जातींतून उदयाला आलें असावें असें वाटतें. अशा घराण्याशीं शाक्यांनी शरीरसंबंध करणें नाकारलें असल्यास त्यांत आश्चर्य मानण्याजोगें कांही नाही.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
* Buddhist India, P. 11-12
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------