भगवान बुद्ध (पूर्वार्ध)

गौतम बुद्धांचे चरित्र


समकालीन राजकीय परिस्थिति 8

१४. अवंती
अवंतीची राजधानी उज्जयिनी व त्यांचा राजा चंडप्रद्योत यांच्या संबंधाने बरीच माहिती आढळते. चंडप्रद्योत आजारी पडला असतां त्याच्या आमंत्रणावरून मगध देशांतील प्रसिद्ध वैद्य जीवक कौमारभृत्य त्याला बरें करण्यासाठी उज्जयिनीला गेला. प्रद्योताच्या अत्यंत क्रूर स्वभावामुळे त्याला चंड हें विशेषण लावीत; आणि ही गोष्ट जीवकाला चांगली माहीत होती. राजाला औषध देण्यापूर्वी जीवकाने जंगलांत जाऊन औषधें आणण्याच्या निमित्ताने भद्दवती नांवाची हत्तीण मागून घेतली आणि राजाला औषध देऊन त्या हत्तिणीवर बसून पळ काढला. इकडे औषध घेतल्याबरोबर प्रद्योताला भयंकर वांत्या होऊं लागल्या. त्यामुळे तो खवळला; आणि त्याने जीवकाला पकडून आणण्याचा हुकूम सोडला. परंतु जीवक तेथून निसटला होता. त्याचा पाठलाग करण्यासाठी राजाने काक नांवाच्या आपल्या दासाला पाठविलें. काकाने कौशाम्बीपर्यंत प्रवास करून जीवकाला गाठलें. जीवकाने त्याला एक औषधी आवळा खाण्यास दिला, त्यामुळे काकाची दुर्दशा झाली आणि जीवकाने भद्दवतीवर बसून सुखरूपपणें राजगृहाला प्रयाण केलें. इकडे प्रद्योत साफ बरा झाला. काक दास देखील बरा होऊन उज्जयिनीला गेला. रोग नष्ट होऊन प्रकृति पूर्वीप्रमाणें बरी झाल्याकारणाने प्रद्योताची जीवकावर मर्जी बसली आणि त्याला अर्पण करण्यासाठी प्रद्योताने सिवेय्यक नांवाच्या उत्तम वस्त्रांची जोडी राजगृहाला पाठविली.*
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
* महावग्ग, भाग ८ वा पाहा.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
या गोष्टींत आणि धम्मपद अट्ठकथेंतील गोष्टींत बरेंच साम्य आहे. परंतु एकीवरून दुसरी रचण्यांत आली किंवा त्या भिन्न भिन्न काळीं घडून आल्या, हें सांगतां येत नाही. या दोन्ही गोष्टींवरून प्रद्योताची चंडप्रकृति व्यक्त होते आणि तो सर्वसत्ताधारी राजा होता, असें दिसून येतें.

बुद्ध भगवान् प्रद्योताच्या राज्यांत कधीही गेला नाही. परंतु त्याच्या प्रमुख शिष्यांपैकी एक-महाकात्यायन-प्रद्योताच्या पुरोहिताचा मुलगा होता. पित्याच्या मरणानंतर त्याला पुरोहितपद मिळालें. पण त्यांत समाधान न मानतां तो मध्यदेशांत जाऊन बुद्धाचा भिक्षुशिष्य झाला. महाकात्यायन परत स्वदेशीं आल्यावर प्रद्योताने आणि इतर लोकांनी त्याचा चांगला आदरसत्कार केला.* त्याचा आणि मथुरेचा राजा अवंतिपुत्र यांचा जातिभेदाविषयींचा संवाद मज्झिमनिकायांतील मधुर किंवा मधुरिय सुत्तांत सापडतो. मथुरेंत आणि उज्जयिनींत महाकात्यायन जरी प्रसिद्ध होता, तरी या प्रदेशांत बुद्ध भगवंताच्या हयातींत बौद्धमताचा फारसा प्रसार झाला होता, असें दिसत नाही. बुद्धाचे भिक्षुशिष्य तुरळक असल्यामुळे या प्रदेशांत पांच भिक्षूंनी देखील दुसर्‍या भिक्षूला उपसंपदा देऊन संघांत दाखल करून घेण्याची बुद्ध भगवंताने परवानगी दिली.** या कामीं मध्य देशांत कमींत कमी वीस भिक्षूंची जरूरी लागत होती.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
* विशेष माहितीसाठी 'बौद्धसंघाचा परिचय' पृ. १६५-१६८ पाहा.
** महावग्ग, भाग ८ वा; 'बौद्धसंघाचा परिचय' पृ. ३०-३१.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१५. गंधारा (गांधारा)

यांची राजधानी तक्कसिला (तक्षशिला). तेथे पुक्कुसाति नांवाचा राजा राज्य करीत होता. त्याने उतारवयांत आपलें राज्य सोडलें व राजगृहापर्यंत पायीं प्रवास करून भिक्षुसंघांत प्रवेश केला. तद्‍नंतर पात्र आणि चीवर शोधण्यासाठी फिरत असतां त्याला एका उन्मत्त गाईने ठार केलें. त्याला गाईने मारल्याची कथा मज्झिमनिकायाच्या धातुविभंगसुत्तांत आली आहे. तो तक्षशिलेचा राजा होता आणि त्याची व बिंबिसार राजाची मैत्री कशी झाली, इत्यादि सविस्तर वर्णन या सुत्ताच्या अट्ठकथेंत सापडतें. त्याचा सारांश असा :-

तक्षशिलेंतील कांही व्यापारी राजगृहाला आले. बिंबिसार राजाने वहिवाटीप्रमाणें त्यांचा आदरसत्कार करून त्यांच्या राजाची प्रवृत्ति विचारली. तो अत्यंत सज्जन असून वयाने आपल्या एवढाच आहे, असें समजल्यावर बिंबिसार राजाच्या मनांत त्याच्याविषयीं प्रेमादर उत्पन्न झाला; आणि त्याने त्या व्यापार्‍यांचा कर माफ करून पुक्कुसाति राजाला दोस्तीचा निरोप पाठविला. त्यामुळे पुक्कुसाति बिंबिसारावर फार प्रसन्न झाला. मगध देशांतून येणार्‍या व्यापार्‍यांवर असलेला कर त्याने माफ केला आणि आपल्या नोकरांकडून त्या व्यापार्‍यांबरोबर बिंबिसार राजासाठी आष्ठ पंचरंगी बहुमोल शाली पाठविल्या. बिंबिसार राजाने या भेटीचा मोबदला एक सुवर्णपट उत्तम करंडकांत घालून पाठविला. त्या सुवर्णपटावर बुद्ध, धर्म आणि संघ यांचे गुण उत्कृष्ट हिंगुळाने लिहिले होते. तो मजकूर वाचून पुक्कुसातील बुद्धाचा निदिध्यास लागला; आणि शेवटीं राज्यत्याग करून तो राजगृहापर्यंत पायीं चालत आला.

तेथे एका कुंभाराच्या घरीं त्याची व बुद्धाची गाठ कशी पडली, त्याला बुद्धाने कोणता उपदेश केला आणि शेवटीं उन्मत्त गाईकडून तो कसा मारला गेला, हा मजकूर वर निर्देशिलेल्या धातुविभंगसुत्तांतच सापडतो.

गांधारांचा आणि त्यांच्या राजधानीचा (तक्षशिलेचा) उल्लेख जातक अट्ठकथेंत अनेक ठिकाणीं आहे. तक्षशिला जशी कलाकौशल्यांत तशीच विद्वत्तेंतही आघडीवर होती. ब्राह्मणकुमार वेदाभ्यास करण्यासाठी, क्षत्रिय धनुर्विद्या व राज्यकारभार शिकण्यासाठी आणि तरुण वैश्य शिल्पकला व इतर धंदे शिकण्यासाठी दूरदूरच्या प्रदेशांतून तक्षशिलेला येत असत. राजगृह येथील विख्यात वैद्य जीवक कौमारर्भृंत्य याने आयुर्वेदाचा अभ्यास याच ठिकाणीं केला. हिंदुस्थानांत अगदी प्राचीन असें प्रसिद्ध विश्वविद्यालय तक्षशिलेलाच होतें.