भगवान बुद्ध (पूर्वार्ध)

गौतम बुद्धांचे चरित्र


समकालीन राजकीय परिस्थिति 7

९. कुरू
या देशाची राजधानी इन्द्रप्रस्थ नगर होतें. बुद्धसमकालीं तेथें कौरव्य नांवाचा राजा राज्य करीत असे, एवढीच काय ती माहिती सापडते. पण तेथील राज्यव्यवस्था कशी चालत होती, याची माहिती कोठे सापडत नाही. या देशांत बुद्धाच्या भिक्षुसंघासाठी एक देखील विहार नव्हता. बुद्ध भगवान् उपदेश करीत त्या देशांत जाई, तेव्हा एखाद्या झाडाखाली किंवा अशाच दुसर्‍या ठिकाणीं मुक्कामाला राहत असे. तथापि या देशांत बुद्धोपदेशाचे चाहते बरेच होते असें दिसतें. त्यांपैकी राष्ट्रपाल नांवाचा धनाढ्य तरुण भिक्षु झाल्याची कथा मज्झिमनिकायांत विस्तारपूर्वक दिली आहे. कुरु देशांतील कम्मासदम्म (कल्माषदम्य) नांवाच्या नगराजवळ बुद्ध भगवंताने सतिपट्ठानासारखीं कांही उत्तम सुत्तें उपदेशिल्याचा उल्लेख सुत्तपिटकांत सापडतो. त्यावरून असें दिसतें की, तेथील सामान्य जनसमूह बुद्धाला मानीत असला, तरी अधिकारी वर्गात त्याचा कोणी भक्त नव्हता आणि वैदिक धर्माचें येथे फारच वर्चस्व होतें.

१०-११. पञ्चाला (पांचाला) आणि मच्छा (मत्स्या)
उत्तरपाञ्चालांची राजधानी कम्पिल्ल (काम्पिल्य) होती, असा उल्लेख जातक अट्ठकथेंत अनेक ठिकाणीं सापडतों; पण मत्स्य देशाच्या राजधानीचा पत्ता नाही. यावरून असें दिसून येतें की, बुद्धसमकालीं या दोन देशांना फारसें महत्त्व राहिलें नव्हतें आणि त्या देशांतून बुद्धाने प्रवास केला नसल्यामुळे तेथील लोकांसंबंधाने किंवा शहरांसंबंधाने बौद्धग्रंथांत फारशी माहिती सापडत नाही.

१२. सूरसेना (शूरसेना)
यांची राजधानी मधुरा (मथुरा) येथे अवंतिपुत्र नांवाचा राजा राज्य करीत होता. वर्णाश्रमधर्मासंबंधाने त्याचा व महाकात्यायनाचा संवाद मज्झिमनिकायांतील मधुरसुत्तांत वर्णिला आहे. या देशांत बुद्ध क्वचितच जात असे. मधुरा त्याला फारशी आवडत नसावी, असें खालील सुत्तावरून दिसून येतें.

पञ्चिमे भिक्खवे आदीनवा मधुरायं । कतमे पञ्च ? विसमा, बहुरजा, चण्डसुनखा, वाळयक्खा, दुल्लभपिण्डा । इमे खो भिक्खवे पञ्च आदीनवा मधुरायं ति ।
(अंगुत्तरनिकाय पञ्चकनिपात)

भिक्षुहो, मथुरेंत हे पांच दोष आहेत. कोणते पांच ? तिचे रस्ते खडबडीत, धूळ फार, कुत्रे द्वाड, यक्ष क्रूर आणि तेथे भिक्षा मिळणें फार कठीण. भिक्षुहो, मथुरेंत हे पांच दोष आहेत.

१३. अस्सका (अश्मका)
सुत्तनिपातांतील पारायणवग्गाच्या आरंभी ज्या वत्थुगाथा आहेत, त्यांजवरून असें दिसून येतें की, अस्सकांचें राज्य कोठे तरी गोदावरी नदीच्या आसपास होतें. बावरी नांवाच्या श्रावस्ती येथे राहणार्‍या ब्राह्मणाने आपल्या सोळा शिष्यांसहवर्तमान या राज्यांत वस्ती केली.

सो अस्सकस्स विसये अळकस्स समासने ।
वसी गोदावरीकूले उञ्छेन च फलेन च ||


तो (बावरी) अश्वकाच्या राज्यांत आणि अळकाच्या राज्याजवळ गोदावरीतीरीं भिक्षेवर आणि फळांवर निर्वाह करून वास करिता झाला.

अस्सक आणि अळक हे दोन आन्ध्र (अन्धक) राजे होते व त्यांच्या राज्यांच्या दरम्यान बावरीने आपल्या सोळा शिष्यांसहवर्तमान एक वसाहत केली आणि ती उत्तरोत्तर वाढत गेली, असें अट्ठकथाकाराचें म्हणजें आहे. वैदिक धर्मप्रचारकांची दक्षिणेंत ही पहिली वसाहत होती, असें म्हणण्यास हरकत नाही. बुद्ध किंवा तत्समकालीन भिक्षु एथवर पोचले नसल्यामुळे या राज्यांची विशेष माहिती बौद्ध वाङ्‌मयांत सापडत नाही. तथापि बुद्धाची कीर्ति येथवर जाऊन थडकली होती. ती ऐकून बावरीने आपल्या सोळाही शिष्यांना बुद्धदर्शनाला पाठविलें. ते प्रवास करीत मध्य देशांत आले व अखेरीस राजगृह येथे बुद्धाला गाठून त्याचे शिष्य झाल्याची हकीकत वर निर्देशिलेल्या पारायणवग्गांतच आहे. परंतु त्यानंतर त्यांनी परत जाऊन गोदावरीच्या प्रदेशांत उपदेश केल्याचा उल्लेख कोठेच आढळत नाही.