भगवान बुद्ध (पूर्वार्ध)

गौतम बुद्धांचे चरित्र


समकालीन राजकीय परिस्थिति 5

६. मल्ला
मल्लांचें राज्य वज्जींच्या पूर्वेस व कोसल देशाच्या पश्चिमेस होतें. तेथे वज्जींप्रमाणेंच गणसत्ताक राज्यपद्धति प्रचलित होती. परंतु मल्लांत फुट पडून त्यांचे पावा येथील मल्ल व कुशिनारा येथील मल्ल असे दोन विभाग झाले होते.

मगध देशांतून कोसल देशाकडे जाण्याचा रस्ता मल्लांच्या राज्यांतून असल्यामुळे बुद्ध भगवान् येथून वारंवार प्रवास करीत असे. बुद्ध भगवंताने पावा येथे राहणार्‍या चुन्द लोहाराचें अन्न ग्रहण केलें; आणि तो आजारी झाला; व तेथून कुसिनारेला गेल्यावर त्या रात्रीं परिनिर्वाण पावला. आजला त्या ठिकाणीं एक लहानसा स्तूप व मंदिर अस्तित्वांत आहे. त्याच्या दर्शनाला अनेक बौद्ध यात्रेकरू जातात. पावा किंवा पडवणा हा गावही येथून जवळच आहे. तेव्हा पावा येथील मल्ल व कुसिनारा येथील मल्ल जवळ जवळ राहत असें दिसतें. या दोन राज्यांतून बुद्धाचे बरेच शिष्य होते. ही राज्यें स्वतंत्र होतीं खरीं, पण त्यांचा प्रभाव वज्जींच्या गणसत्ताक राज्याएवढा खास नव्हता. किंबहुना, वज्जींच्या बलाढ्य राज्याच्या अस्तित्वामुळेंच तीं राहिलीं असावीं.

७. चेती
या राष्ट्राची माहिती जातकांतील चेतिय जातक आणि वेस्संतर जातक या दोन जातकांत आली आहे. त्याची राजधानी सोत्थिवती (स्वस्तिवती) होती असें चेतिय जातकांत (नं. ४२२) म्हटलें आहे; आणि तेथील राजांची परंपराही दिली आहे. शेवटचा राजा उपचर किंवा अपचर हा खोटें बोलला आणि आपल्या पुरोहिताच्या शापामुळे नरकांत पडला. त्याचे पांच मुलगे पुरोहिताला शरण गेले. पुरोहिताने तें राज्य सोडून जाण्यास त्यांना सांगितलें आणि त्याप्रमाणें त्यांनी बाहेर जाऊन निरनिराळीं पांच शहरें वसविलीं, असें वर्णन या जातकांत आढळतें.

वेस्संतराची पत्‍नी मद्दी (माद्री) ही मद्द (मद्र) राष्ट्रांतील राजकन्या होती. याच राष्ट्राला चेतिय राष्ट्र म्हणत असें वेस्संतर जातकांतील कथेवरून दिसून येतें. खुद्द वेस्संतराचा देश शिवि हा या चेतिय राष्ट्राच्या जवळ होता. तेथल्या शिबिराजाने आपले डोळे ब्राह्मणाला दिल्याची कथा जातकांत प्रसिद्ध आहे.* वेस्संतर राजकुमाराने देखील आपला मंगल हत्ती, दोन मुलें आणि बायको ब्राह्मणांना दान दिल्याची कथा वेस्संतर जातकांत आली आहे. यावरून फार तर एवढें सिद्ध होतें की, शिवींच्या आणि चेतींच्या (चैद्यांच्या) राष्ट्रांत ब्राह्मणांचें फार वर्चस्व असे आणि त्यामुळें हीं राज्यें कोठे तरी पश्चिमेच्या बाजूला असावीं. बुद्धकाळीं शिवीचें व चेतीचें नांव अस्तित्वांत होतें; पण बुद्ध त्यांच्या राज्यांत गेल्याचें, किंवा अंगाचा जसा मगधांच्या राज्यांत समावेश झाला, तसा त्या राज्यांचा दुसर्‍या राज्यांत समावेश झाल्याचेंहि दिसून येत नाही. कांही असो, बुद्ध भगवंताच्या चरित्राशीं या राज्यांचा कोणत्याही रीतीने संबंध आला नाही एवढें खास.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
* सिविजातक (नं. ४९९) पहा.
न.भा. १६....४
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
८. वंसा (वत्सा)

यांची राजधानी कोसम्बी (कौशाम्बी). बुद्धसमकालीं येथील गणसत्ताक राज्यपद्धति नष्ट झाली व उदयन नांवाचा मोठा चैनी राजा सर्वसत्ताधिकारी झाला, असें दिसतें. धम्मपद अट्ठकथेंत या राजाची एक गोष्ट आली आहे, ती अशी ः-

उदयनाचें आणि उज्जयिनीचा राजा चंडप्रद्योत याचें अत्यंत वैर होतें. लढाईंत उदयनाला जिंकणें शक्य नसल्यामुळे प्रद्योताला कांही तरी युक्ति लढवून उदयनास धरण्याचा बेत करावा लागला. उदयन राजा हत्ती पकडण्याचा मंत्र जाणत होता; आणि जंगलांत हत्ती आल्याबरोबर शिकारी लोकांना घेऊन तो त्याच्या मागे लागत असे. चंडप्रद्योताने एक कृत्रिम हत्ती तयार करविला व त्याला वत्सांच्या सरहद्दीवर नेऊन ठेवण्यास लावलें. आपल्या सरहद्दीवर नवीन हत्ती आल्याची बातमी समजल्याबरोबर उदयन राजा त्याच्या मागे लागला. या कृत्रिम हत्तीच्या आंत दडून राहिलेल्या मनुष्यांनी तो हत्ती चंडप्रद्योताच्या हद्दींत नेला. उदयन त्याच्या मागोमाग पळत गेला असतां तेथे दबा धरून राहिलेल्या प्रद्योताच्या शिपायांनी त्याला पकडून उज्जयिनीला नेलें.

चंडप्रद्योत त्याला म्हणाला, ''हत्तीचा मंत्र शिकवशील तर मी तुला सोडून देईन, नाही तर येथेच ठार करीन.'' उदयन त्याच्या लालचीला किंवा शिक्षेला मुळीच घाबरला नाही. तो म्हणाला, ''मला नमस्कार करून शिष्य या नात्याने मंत्राध्ययन करशील तरच मी तुला मंत्र शिकवीन; नाही तर तुला जें करावयाचें असेल तें कर.'' प्रद्योत अत्यंत अभिमानी असल्यामुळे त्याला हें रुचलें नाही. पण उदयनाला मारून मंत्र नष्ट करणेंही योग्य नव्हतें. म्हणून तो उदयनाला म्हणाला, ''दुसर्‍या एखाद्या माणसाला तूं हा मंत्र शिकवशील काय ? माझ्या प्रीतींतल्या माणसाला तूं हा मंत्र शिकविलास, तर मी तुला बंधमुक्त करीन.''

उदयन म्हणाला, ''जी स्त्री किंवा जो पुरुष मला नमस्कार करून शिष्यत्वाने मंत्राध्ययन करील, तिला किंवा त्याला मी तो शिकवीन.''