भगवान बुद्ध (पूर्वार्ध)

गौतम बुद्धांचे चरित्र


समकालीन राजकीय परिस्थिति 4

बापाच्या निधनानंतर विडूडभाने शाक्यांवर स्वारी करण्याचा बेत केला. भगवान् बुद्धाने त्याला उपदेश करून त्याचा हा बेत दोनदा रहित करविला. परंतु तिसर्‍या वेळीं मध्यस्थी करण्याला बुद्धाला सवड न मिळाल्यामुळे विडूडभाने आपला बेत पार पाडला. त्याने शाक्यांवर स्वारी करून त्यांची दाणादाण केली. जे शरण आले किंवा पळून गेले त्यांना सोडून इतरांची बायका-मुलांसकट कत्तल केली व त्यांच्या रक्ताने आपलें आसन धुवावयास लावलें.

शाक्यांचा निःपात करून विडूडभ श्रावस्तीला येऊन अचिरवतीच्या काठीं आपल्या सैन्याचा तळ देऊन राहिला. आसपासच्या प्रदेशांत अकालमेघाचा भयंकर वर्षाव होऊन अचिरवतीला महापूर आला, आणि सैन्यांतील कांही लोकांसह विडूडभ त्या पुरांत सापडून वाहून गेला.

मगध देशाप्रमाणेंच कोसल देशांत देखील एकसत्ताक राज्यपद्धति बळकट होत चालली होती, हें विडूडभाच्या कथेवरून स्पष्ट होतें. त्याने आपल्या लोकप्रिय बापाची गादी बळकावली असतांही कोसलांनी त्याविरुद्ध एक ब्र देखील काढला नाही.

५. वज्जी
महाजनसत्ताक राज्यांत तीनच राज्यें स्वतंत्र राहिलीं होतीं. एक वज्जीचें, आणि दोन पावा व कुशिनारा येथील मल्लांची. त्यांत वज्जींचें राज्य बलाढ्य असून भरभराटींत होतें, तरी त्याचा अस्त देखील फार दूर नव्हता. तथापि पहाटेच्या प्रहरीं शुक्राच्या चांदणीप्रमाणें तें चमकत होतें. बुद्ध भगवान् अशाच एका महाजनसत्ताक राज्यांत जन्मला. पण शाक्यांचें स्वातंत्र्य पूर्वीच नष्ट झालें होतें. वज्जी आपल्या एकीने व पराक्रमाने बुद्धाच्या हयातींत स्वतंत्र राहिल्यामुळे बुद्धाला त्यांच्याविषयीं आदर असणें साहजिक होतें. महापरिनिब्बानसुत्तांत भगवान् दुरून येणार्‍या लिच्छवींकडे पाहून भिक्षूंना म्हणतो, ''भिक्षूंनो, ज्यांनी तावतषत्रंशत् देव पाहिले नसतील, त्यांनी या लिच्छवींच्या समुदायाकडे पाहावें !''

वज्जींची राजधानी वैशाली नगरी होती. तिच्या आसपास राहणार्‍या वज्जींना लिच्छवी म्हणत. त्यांच्या पूर्वेला पूर्वी विदेहांचें राज्य होतें, जेथे जनकासारखे उदारधी राजे होऊन गेले. विदेहांचा शेवटचा राजा सुमित्र मिथिलानगरींत राज्य करीत होता, असें ललितविस्तरावरून दिसून येतें. त्याच्या पश्चात् विदेहांचे राज्य वज्जींच्या राज्याला जोडण्यांत आलें असावें.

बुद्ध भगवन्ताने वज्जींना अभिवृद्धीचे सात नियम उपदेशिल्याचें वर्णन महापरिनिब्बानसुत्ताच्या आरंभीं आणि अंगुत्तरनिकायाच्या सत्तकनिपातांत सापडतें. महापरिनिब्बानसुत्ताच्या अट्ठकथेंत या नियमांवर सविस्तर टीका आहे. तिजवरून असें अनुमान करतां येतें की, वज्जींच्या राज्यांत एक प्रकारची ज्यूरीची पद्धति होती व सहसा निरपराधी माणसाला शिक्षा होत नसे. त्यांचे कायदे लिहिलेले असत व त्याप्रमाणें चालण्याविषयीं ते दक्षता बाळगीत.