भगवान बुद्ध (पूर्वार्ध)

गौतम बुद्धांचे चरित्र


आर्यांचा जय 4

आर्यांच्या जयाने झालेली हानी

दासांच्या आणि आर्यांच्या संघर्षणाने जी मोठी हानि झाली, ती ही की, दासांचीं घरें आणि नगरें बांधण्याची कला नष्टप्राय होऊन गेली. सिंध आणि पंजाब प्रांतांत सापडलेल्या प्राचीन नगरांची आणि घरांची परंपरा हिंदुस्थानांत राहिली नाही. दुसरी गोष्ट ही की
जंगलांत राहणारे यति कशा रीतीने वागत, हें समजण्याचा मार्ग राहिला नाही. वरच्या उतार्‍यांत इन्द्राने त्यांना कुत्र्यांकडून खाववलें असा उल्लेख आला आहे. मूळचा शब्द 'सालावृक'. ह्याचा अर्थ लांडगे किंवा कुत्रे असा होऊं शकतो. टीकाकाराने शालावृक म्हणजे लांडगे असाच अर्थ केला आहे. परंतु इंद्राजवळ पुष्कळ शिकारी कुत्रे होते आणि त्याने ते यतींच्या अंगावर घातले, हें अधिक संभवनीय दिसतें. या यतींचें वजन समाजावर फार असल्याशिवाय इन्द्राने त्यांना मारण्याचें कांहीच कारण नव्हतें. पण ते वागत होते कसे, लोक त्यांना कां मानीत, इत्यादि गोष्टी समजण्याला कांही मार्ग राहिला नाही.

आर्यांच्या संस्कृतीला कृष्णाचा विरोध

सप्‍तसिंधूच्या प्रदेशावर इन्द्राची पूर्ण सत्ता स्थापन झाल्यावर त्याचा मोर्चा मध्य हिंदुस्थानाकडे वळला असल्यास नवल नाही. पण तेथे त्याला मोठाच प्रतिस्पर्धी भेटला. देवकीनंदन कृष्ण केवळ गाईंचा प्रतिपालक राजा होता. इन्द्राची यज्ञयागाची संस्कृति आणि त्याचें वर्चस्व तो मान्य करण्यास तयार नव्हता. यास्तव इन्द्राने त्याच्यावर हल्ला केला. कृष्णाजवळ घोडदळ नव्हतें. तथापि त्याने मार्‍याची अशी जागा शोधून काढली की इन्द्राचें त्याच्यासमोर कांही चाललें नाही. बृहस्पतीच्या मदतीने तो कसा तरी आपला जीव संभाळून मागे हटला. ॠग्वेदांत (८।९६।१३-१५) सापडणार्‍या कांही ॠचांवरून आणि भागवत इत्यादि पुराणांत आलेल्या दंतकथांवरून या विधानाला बरीच बळकटी येते.*
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
* हिंदी संस्कृति आणि अहिंसा, पृ.२२-२५ पहा.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
कृष्ण यज्ञयागांची संस्कृति मानण्याला तयार नव्हता. मग तो मानीत होता तरी काय ? त्याला आंगिरस ॠषीने यज्ञांची एक साधी पद्धति शिकविली. त्या यज्ञाच्या दक्षिणा म्हटल्या म्हणजे तपश्चर्या, दान, सरळपणा (आर्जव), अहिंसा आणि सत्यवचन या होत. 'अथ यत्तपो दानमार्जवमहिंसा सत्यवचनमिति ता अस्य दक्षिणाः ।' (छां. उ. ३।१७।४-६) यावरून असें दिसतें की, आर्यांच्या आणि दासांच्या संघर्षांत जी यतींची संस्कृति सप्‍तसिंधु प्रदेशांत नष्ट झाली, तिचा कांहीसा अंश गंगायमुनेच्या प्रदेशांत कायम राहिला होता. तपश्चर्या करणार्‍या अहिंसक मुनींची कृष्णासारखे राजे या प्रदेशांत पूजा करीत होते, हें वरील उतार्‍यावरून दिसून येतें.

वैदिक संस्कृतीचा विकास

परंतु या अहिंसात्मक संस्कृतीची फारशी उन्नति झाली नाही. ब्राह्मणांनी राजकारणांतून अंग काढून घेतल्यावर वाङ्‌मयाकडे आणि इतर लोकोपयोगी गोष्टींकडे चांगलें लक्ष पुरवलें. हिंदुस्थानांत सगळ्यांत प्राचीन विश्वविद्यालय म्हटलें म्हणजे तक्षशिला येथे होतें. तेथे ब्राह्मण वेद तर शिकवीतच; आणि त्याशिवाय धनुर्विद्या, वैद्यक इत्यादि शास्त्रेंही शिकवीत. सत्पसिंधूंतून इन्द्राच्या परंपरेचें साम्राज्य नष्ट झालें, तरी त्या परंपरेपासून उद्‍भवलेल्या नवीन संस्कृतीचें राज्य सुरू झालें, आणि त्याची वाढ होत गेली.

वैदिक संस्कृतीचा मध्यदेशांत विजय

कृष्णाने इन्द्राचा पराभव केल्यानंतर सहाशें-सातशें वर्षांनी परीक्षित् आणि त्याचा मुलगा जनमेजय या दोन पांडवकुलोत्पन्न राजांनी सप्‍तसिंधूंत तयार झालेल्या आर्यसंस्कृतीची संस्थापना गंगायमुनांच्या प्रदेशांत केली. पांडव आर्यसंस्कृतीचे भोक्ते होते याला आधार वैदिक वाङ्‌मयांत सापडत नाही. कृष्णामध्ये आणि पांडवांमध्ये तर निदान सहाशें वर्षांचा काळ लोटला असला पाहिजे. महाभारतांत ज्या कृष्णाच्या कथा येतात, त्या वरवर वाचल्या तरी प्रक्षिप्‍त असाव्याशा वाटतात. निदान इन्द्राबरोबर युद्ध करणारा कृष्ण आणि महाभारतांतील कृष्ण एक नव्हता, असें मानावें लागतें. पांडवांचे वंशज परीक्षित् आणि जनमेजय या दोघांनी मात्र वैदिक संस्कृतीला भरपूर आश्रय दिला, हें अथर्ववेदावरून (काण्ड २०, सू. १२७) चांगलें सिद्ध होतें.*
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
* हिंदी संस्कृति आणि अहिंसा पृ. ३७-३८.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
सप्‍तसिंधूंत यतींची संस्कृति साफ नष्ट झाली, तरी ती प्रामुख्याने मध्यहिंदुस्थानांत वास करीत होती, हें वर दिलेल्या छांदोग्य उपनिषदाच्या उतार्‍यावरून आणि पालि वाङ्‌मयांतील सुत्तनिपातांत सापडणार्‍या 'ब्राह्मणधाम्मिक' सुत्तावरून दिसून येतें.* सप्‍तसिंधूतील चातुर्वर्ण्य मध्यहिंदुस्थानांत देखील स्थिरावलें होतें. फरक एवढाच की, सप्‍तसिंधूंतील ब्राह्मणांनी आर्यांच्या विजयामुळे उत्पन्न झालेली यज्ञयागांची पद्धति पूर्णपणें स्वीकारली. मध्यहिंदुस्थानांत जरी ब्राह्मण अग्निपूजा करीत असत, तरी त्या पूजेंत प्राण्यांचें बलिदान होत नसे. तांदूळ, जव वगैरे पदार्थांनीच ते अग्निदेवतेची पूजा करीत. परंतु परीक्षित आणि जनमेजय यांनी यज्ञयागाला सुरवात केल्यानंतर ही जुनी अहिंसात्मक ब्राह्मणसंस्कृति नष्टप्राय झाली, आणि तिच्या जागीं हिंसात्मक यज्ञयागाची प्रथा जोराने पसरूं लागली. सत्पसिंधूच्या ऐवजी गंगायमुनांच्या मधला प्रदेशच आर्यावर्त बनला !
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
* हिंदी संस्कृति आणि अहिंसा पृ. ३९-४०.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------