भगवान बुद्ध (पूर्वार्ध)

गौतम बुद्धांचे चरित्र


भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 10

सहा वर्षे फर्गसन कॉलेजांत प्राध्यापकाचें काम केल्यानंतर डॉ. वुड्स यांनी अमेरिकेंत येण्याबद्दल फार आग्रह केल्यावरून ते १९१८ सालीं पुनः अमेरिकेस गेले.  ''विशुद्विमार्गाचें संस्करण प्रो. ल्यानमनच्या दुराग्रहामुळें तसेंच पडून राहिलें हें मला कधींही आवडलें नाहीं.  कांहीं तडजोड करून वॉरनच्या मृत्युपत्राप्रमाणें तें छापून प्रसिद्ध करतां येईल अशी आशा दिसली व माझा (अमेरिकेला जाण्याचा) बेत नक्की करण्याला हीच आशा प्रामुख्यानें कारणीभूत झाली.''  अमेरिकेला पुनः जाण्याच्या संबंधांत असा 'खुलासा' त्यांनी केला आहे.

त्या वेळीं महायुद्ध सुरू असल्यामुळे अमेरिकेचा हा प्रवास कोसम्बींनी पूर्वेकडून पॅसिफिक महासागरांतून केला.  त्यांजबरोबर त्यांचीं मुलें व श्री. पार्वतीबाई आठवले या होत्या.  या खेपेस अमेरिकेंत कोसम्बींचा मुक्काम सुमारें ४ वर्षे झाला.  १९२२ च्या ऑगस्टमध्यें ते परत आले.  त्यांनी तेथे संशोधनकार्य बरेंच केलें, परंतु ल्यानमनच्या दुराग्रहामुळे त्यांना या खेपेसही त्रास झालाच.

कोसम्बींच्या विचारांना नवी दिशा १९११ सालच्या अमेरिकेच्या पहिल्या सफरीपासूनच लागत चालली होती.  अमेरिकेंत त्यांनी समाजशास्त्रावरील ग्रंथांचें - विशेषतः समाजसत्तावादाचें - खूप वाचन केले.  भांडवलशाही नष्ट करून समाजाची रचना साम्यवादाच्या पायावर केल्यानेच सामान्य जनतेला सुख मिळेल व समाजांतील स्पर्धा, कलह, इत्यादिकांचे मूळ नाहीसें होईल, अशी त्यांची खात्री होत चालली होती. परंतु पाश्चात्य देशांत साम्यवाद मूळ धरूं शकत नव्हता व सर्व राष्ट्रांचे हात हिंसा व अत्याचार यांनी बरबटलेले होते,  हे त्यांस सहन होत नव्हते.  ''जगांतील श्रमजीवी वर्गाने अशा प्रकारचा प्रेमाचा मार्ग स्वीकारल्याशिवाय मनुष्यकृत मनुष्यहत्या बंद होणार नाही.  परंतु देशाभिमानाने उन्मत्त झालेल्यांना तो सापडणार कसा ?''

अशा मनःस्थितींत भांडवलशाहीचें आगर बनलेल्या अमेरिकेंत अस्वस्थ चित्ताने कालक्रमण करीत असतां १९२०-२१ सालच्या गांधीजींनी सुरू केलेल्या सत्याग्रहाच्या बातम्या तेथे एकामागून एक येऊन पोचूं लागल्या.  त्या वाचून कोसम्बींचें अंतःकरण धन्यतेने भरून गेले.  ''राष्ट्रद्वेषाच्या आणि वर्णद्वेषाच्या रोगांतून पार पडण्याला याच्याशिवाय दुसरा मार्ग कोणताही असूं शकत नाही,''  असा त्यांचा ठाम ग्रह झाला.

''अमेरिकेंतील बातमीदार सत्याग्रहाची चळवळ पाहण्यासाठी हिंदुस्थानांत गेले.  तेथून ते कॉलमचे कॉलम बातम्या पाठवीत असत.  हीं वर्णनें वाचून माझें अंतःकरण सद्गदित होत असे आणि कंठ दाटून येऊन डोळ्यांतून नकळत आसवें गळत.''  अशा रीतीने कोसम्बी अमेरिकेहून आले, ते मनाने साम्यवादी, सत्याग्रहाचे पुरस्कर्ते बनून आले, हिंदुस्थानांत आल्यावर १९२२ ते १९२५ पर्यन्त गांधीजींनी काढलेल्या गुजरात विद्यापीठाच्या पुरातत्त्वमंदिर शाखेंत पालिभाषाचार्य या नात्याने त्यांनी काम केले.  या अवकाशांत मराठींत व गुजरातीत त्यांनी अनेक पुस्तकें लिहिली.  प्रा. ल्यानमन सेवानिवृत्त झाल्यामुळे 'विसुद्विमग्गा'चें संस्करण पूर्ण करण्याची संधि आता मिळेल या अपेक्षेने १९२६ च्या प्रारंभास धर्मानन्द पुनः अमेरिकेस गेले व सप्टेंबर १९२७ पर्यंत सर्व संस्करण छापून तयार झाल्यानंतर ते स्वदेशीं परतले.