भगवान बुद्ध (पूर्वार्ध)

गौतम बुद्धांचे चरित्र


भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 6

अशा कथांतून बुद्धचरित्रासंबंधाने विश्वसनीय गोष्टी कशा काढतां येतील, हें दाखविण्याच्या उद्देशानेच मी हें पुस्तक लिहिलें आहे.  अशा कांही उपयुक्त गोष्टी माझ्या दृष्टोत्पत्तीला आल्या नसतील; आणि ज्या कांही गोष्टींना महत्त्व देऊं नये त्यांना माझ्याकडून महत्त्व दिलें गेलें असेल.  पण संशोधन करण्याच्या पद्धतींत माझी चूक असेल, असें मला वाटत नाही.  ह्या पद्धतीचा अवलंब केल्यास बुद्धचरित्रावर आणि त्या काळच्या इतिहासावर विशेष प्रकाश पडेल, असा मला भरवसा वाटतो; आणि त्याच उद्देशाने मी हें पुस्तक लिहिलें आहे.  यांतील कांही लेख कांही वर्षांमागे 'पुरातत्त्व' नांवाच्या त्रैमासिकांत आणि 'विविधज्ञानविस्तारां'त छापले होते.  पण ते जशाचे तसे या पुस्तकांत घेतले नाहीत.  त्यांत पुष्कळच फेरफार केला आहे.  त्यांतला बराच मजकूर या पुस्तकांत दाखल केला असला, तरी हें पुस्तक अगदी स्वतंत्र आहे, असें म्हणण्यास हरकत नाही.

प्रस्तुत ग्रंथाचें हस्तलिखित नवभारत ग्रंथमालेच्या संपादकांनी वाचून पाहिलें, तेव्हा ग्रंथामध्ये ज्यांचें विशेष विवेचन आलेलें नाही असे कांही मुद्दे माझ्या नजरेस आणण्याचा प्रयत्‍न त्यांनी केला, त्यांचा येथेच थोडक्यांत विचार करणें योग्य होईल असें वाटल्यावरून तसें करीत आहें.

(१) बुद्धाच्या जन्मतिथीसंबंधाने निरनिराळ्या मतांचा उपन्यास करून साधकबाधक प्रमाणांनिशीं ऊहापोह प्रस्तुत ग्रंथांत करावयास नको होता काय ?  आपल्या प्राचीन अथवा मध्ययुगीन इतिहासांतील राज्यकर्ते, धर्मगुरू, ग्रंथकार, इत्यादिकांचें चरित्र वर्णन करावयाच्या अगोदर त्यांचा काल ठरविण्यासाठी विद्वानांना पुष्कळच मजकूर खर्ची घालावा लागतो, तसें या ग्रंथांत केलेलें दिसत नाही.

या मुद्यासंबंधाने माझें म्हणणें असें ः  मध्ययुगीन कवि आणि ग्रंथकार हे शककर्ते नव्हते.  त्यांच्या जन्मतिथीसंबंधी कितीही वाद केला, तरी त्या नक्की ठरवितां येतील असें वाटत नाही.  बुद्धाची गोष्ट तशी नाही.  त्याच्या परिनिर्वाणापासून तहत आजपर्यंत त्याचा शक चालू आहे.  मध्यंतरीं पाश्चात्य पंडितांनी वादविवाद करून ह्या तिथींत ५६ पासून ६५ वर्षांपर्यंत फरक आहे, असें सिद्ध करण्याचा प्रयत्‍न केला.  पण अखेरीस जी पंरपरा सिंहलद्वीपांत चालू आहे, तीच बरोबर ठरली.  पण समजा, बुद्धाच्या जन्मतिथींत थोडासा कमीजास्त फारक पडला, तरी त्यापासून त्याच्या चरित्राला कांही गौणत्व येईल असें वाटत नाही.  मुद्याची गोष्ट जन्मतिथि नसून त्याच्या पूर्वीची स्थिति काय होती आणि त्या स्थितीतून बुद्धाने नवीन धर्ममार्ग कसा शोधून काढला ही होय; आणि ती जर विशद करतां आली, तर आजकाल बुद्धासंबंधाने प्रचलित असलेल्या अनेक भ्रामक कल्पना नष्ट होतील व आम्हाला त्या काळचा इतिहास नीटपणें समजेल.  तेव्हा तिथीवर पुष्कळ पानें खर्ची न घालतां बुद्धाच्या चरित्रावर प्रकाश पडेल अशाच गोष्टींकडे मी विशेष लक्ष दिलें आहे.

(२)  बुद्धाने उपदेशिलेल्या अहिंसेने हिंदी समाज नेभळट झाला व त्यामुळेच परकीयांकडून तो जिंकला गेला, असें मत कित्येक ठिकाणीं प्रतिपादिलें जातें.  त्याला या ग्रंथांत उत्तर असावयास पाहिजे होतें.

उत्तर- बुद्धाच्या चरित्राचा आणि या प्रतिपादनाचा कांही संबंध आहे, असें मला वाटत नाही.  बुद्धाचें परिनिर्वाण इ.स. पूर्वी ५४३ व्या वर्षी झालें.  त्यानंतर दोन शतकांनी चंद्रगुप्ताने साम्राज्य स्थापन केलें.  स्वतः चंद्रगुप्‍त जैनधर्मी होता असें म्हणतात.  पण ग्रीक लोकांना या देशांतून हाकून देण्याला अहिंसाधर्म त्याला आड आला नाही.  त्याचा नातू अशोक पूर्णपणें बौद्ध झाला, तरी तो मोठें साम्राज्य चालवीत होता.

महंमद इब्न कासीम याने इ.स. ७१२ सालीं सिंध देशावर स्वारी केली,  तेव्हा बौद्धधर्म पश्चिम हिंदुस्थानांतून लोप पावला होता; आणि ब्राह्मणी धर्माचें वर्चस्व वाढत गेलें होतें.  असें असतां खलिफाच्या या अल्पवयी सरदाराने सिंध देश हां हां म्हणतां पादाक्रांत केला, आणि तेथील हिंदू राजाला ठार मारून त्याच्या मुली आपल्या खलिफाला नजराण्यादाखल पाठवून दिल्या.