भगवान बुद्ध (पूर्वार्ध)

गौतम बुद्धांचे चरित्र


भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 3

वेय्याकरण म्हणजे व्याख्या.  एखादें सूत्र घेऊन त्याचा थोडक्यांत किंवा विस्तारपूर्वक अर्थ सांगणें याला वेय्याकरण म्हणतात. (अर्थात् या शब्दाचा संस्कृत व्याकरणाशीं कांही संबंध नाही.)

धम्मपद, थेरगाथा आणि थेरीगाथा हे तीन ग्रंथ गाथा सदराखाली येतात, असें बुद्धघोषाचार्याचें म्हणणें आहे.  परंतु थेर आणि थेरी गाथा बुद्धाच्या परिनिर्वाणानंतर तीन चार शतकें अस्तित्वांत असतील असें वाटत नाही; आणि धम्मपद तर अगदीच लहानसा ग्रंथ.  तेव्हा गाथा म्हणजे तो एकच ग्रंथ होता किंवा दुसर्‍या कांही गाथांचा या विभागांत समावेश होत असे हें सांगणें कठीण आहे.

वर दिलेल्या खुद्दकनिकायाच्या यादींत उदानाचा उल्लेख आलाच आहे.  त्यांतील उदानें व तशाच प्रकारचीं सुत्तपिटकांत इतर ठिकाणीं आलेलीं वचनें यांना उदान म्हणत असत, असें बुद्धघोषाचार्याचें म्हणणें आहे.  परंतु त्यांपैकी अशोकसमकालीं किती उदानें अस्तित्वांत होतीं, हें सांगता येणें शक्य नाही.  मागाहून त्यांच्यांत भर पडत गेली यांत शंका नाही.

इतिवुत्तक प्रकरणांत ११२ इतिवुत्तकांचा संग्रह आहे.  त्यांपैकी कांही इतिवुत्तकें अशोककालीं किंवा त्यानंतर एखाद्या शतकांत अस्तित्वांत होतीं; मागाहून त्यांची संख्या वाढत गेली असावी.

जातक नांवाच्या कथा सुप्रसिद्ध आहेत;  आणि त्यांपैकी कांही कथांतील देखावे सांची आणि बर्हुत येथील स्तूपांच्या आजूबाजूला कोरलेले आढळतात.  यावरून अशोकसमकालीं जातकाच्या बर्‍याच कथांचा बौद्धवाङ्‌मयांत प्रवेश झाला होता, असें अनुमान करतां येतें.

अब्भुतधम्म म्हणजे अद्‍भुत चमत्कार.  बुद्धभगवंताने आणि त्याच्या प्रमुख श्रावकांनी केलेल्या अद्‍भुत चमत्कारांचें ज्यांत वर्णन होतें असा एखादा ग्रंथ त्या काळीं अस्तित्वांत होता असें दिसतें.  परंतु आता या अद्‍भुत धर्माचा मागमूस राहिला नाही.  त्यांतले सर्व भाग सध्याच्या सुत्तपिटकांत मिसळून गेले असावेत.  बुद्धघोषाचार्याला देखील अद्‍भुतधर्म काय होता, हें सांगणें कठीण पडलें.  तो म्हणतो, ''चत्तारोमे भिक्खवे अच्छरिया अब्भुता धम्मा आनन्दे ति आदिनयपवत्ता सब्बे पि अच्छरियब्भुतधम्मपटिसंयुत्ता सुत्तन्ता अब्भुतधम्मां ति वेदितब्बा ।'' ('भिक्षुहो, हे चार आश्चर्य अद्‍भुतधर्माने सुरू झालेलीं आश्चर्य-अद्‍भुतधर्मांनी युक्त असलेलीं सर्व सूत्रें अब्भुतधम्म समजावीं.')  पण या अद्‍भुतधर्मांचा आणि मूळच्या अब्भुतधम्म ग्रंथाचा कांही संबंध दिसत नाही.

महावेदल्ल व चूळवेदल्ल अशीं दोन सूत्रें मज्झिमनिकायांत आहेत.  त्यांवरून वेदल्ल हें प्रकरण कसें होतें याचें अनुमान करतां येतें.  त्यांपैकी पहिल्या सुत्तांत महाकोट्ठित सारिपुत्ताला प्रश्न विचारतो आणि सारिपुत्र त्या प्रश्नांचीं यथायोग्य उत्तरें देतो.  दुसर्‍यांत धम्मदिन्ना भिक्षुणी आणि तिचा पूर्वाश्रमांतील पति विशाख या दोघांचा तशाच प्रकारें प्रश्नोत्तररूपाने संवाद आहे.  हीं दोन्ही सुत्तें बुद्धभाषित नव्हेत.  परंतु तशाच रीतीच्या संवादांना वेदल्ल म्हणत असत.  श्रमण, ब्राह्मण आणि इतर लोकांबरोबर बुद्ध भगवंताचे जे संवाद झाले असतील, त्यांचा एक निराळा संग्रह करण्यांत आला होता व त्याला वेदल्ल हें नांव देण्यांत आलें होतें, असें दिसतें.