भगवान बुद्ध (पूर्वार्ध)

गौतम बुद्धांचे चरित्र


भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 2

वर सांगितलेले त्रिपिटकाचे विभाग राजगृह येथे भरलेल्या पहिल्या सभेंत ठरविण्यांत आले, असें बुद्धघोषाचार्याचें म्हणणें आहे.  भगवान् बुद्धाच्या परिनिर्वाणानंतर भिक्षु शोकाकुल झाले.  तेव्हा एक सुभद्र नांवाचा वृद्ध भिक्षु म्हणाला, ''आमचा शास्ता परिनिर्वाण पावला, हें बरें झालें.  तुम्ही अमुक केलें पाहिजे आणि तमुक करतां कामां नये, अशा प्रकारें तो आम्हांस सतत बंधनांत ठेवीत होता.  आता वाटेल तसें वागण्यास मोकळीक झाली.''  हें ऐकून महाकाश्यपाने विचार केला की, जर धर्मविनयाचा संग्रह केला नाही, तर सुभद्रासारख्या भिक्षूंना स्वैराचार करण्यास मुभा मिळेल, म्हणून ताबडतोब भिक्षुसंघाची सभा बोलावून धर्म आणि विनय यांचा संग्रह करून ठेवला पाहिजे.  त्याप्रमाणें महाकाश्यपाने राजगृह येथे त्या चातुर्मासांत पांचशें भिक्षूंना गोळा केलें; आणि त्या सभेंत प्रथमतः उपालीला विचारून विनयाचा संग्रह करण्यांत आला; आणि नंतर आनंदाला प्रश्न करून सुत्त आणि अभिधम्म या दोन पिटकांचा संग्रह करण्यांत आला.  कित्येकांच्या मतें खुद्दकनिकायाचा अंतर्भाव अभिधम्मपिटकांतच केला गेला होता.  पण इतर म्हणत की, त्याचा अंतर्भाव सुत्तपिटकांतच करावयास पाहिजे.

हा सुमंगलविलासिनीच्या निदानकथेंत आलेल्या मजकुराचा सारांश आहे.  हाच मजकूर समन्तपासादिका नांवाच्या विनय अट्ठकथेच्या निदानकथेंतही सापडतो.  पण त्याला तिपिटक ग्रंथांत कोठेच आधार नाही.  बुद्ध भगवंताच्या परिनिर्वाणानंतर राजगृहांत भिक्षुसंघाची पहिली सभा झाली असेल; पण तींत सध्याचे पिटकाचे विभाग किंवा पिटक हें नांव देखील आलें असेल असें दिसत नाही.  अशोककालापर्यंत बुद्धाच्या उपदेशाचे धर्म आणि विनय असे दोन विभाग करण्यांत येत असत; पैकी धर्माचीं नऊ अंगें समजलीं जात असत, तीं अशीं ः- सुत्त, गेय्य, वेय्याकरण, गाथा, उदान, इतिवुत्तक, जातक, अब्भुतधम्म आणि वेदल्ल.  या अंगांचा उल्लेख मज्झिमनिकायांतील अलगद्दूपमसुत्तांत, आणि अंगुत्तरनिकायांत सात ठिकाणीं सापडतो.

सुत्त हा पालि शब्द सूक्त किंवा सूत्र या दोनही संस्कृत शब्दांबद्दल असूं शकेल.  वेदांत जशीं सूक्तें आहेत, तशींच हीं पालि सूक्तें होत, असें कित्येकांचें म्हणणें.  परंतु महायानसंप्रदायाच्या ग्रंथांत यांना सूत्रें म्हटलें आहे; आणि तोच अर्थ बरोबर असावा.  अलीकडे सूत्रें म्हटली म्हणजे पाणिनीची आणि तशाच प्रकारचीं इतर सूत्रें समजलीं जातात.  पण आश्वलायन गृह्यसूत्र वगैरे सूत्रें या संक्षिप्‍त सूत्रांहून थोडीशीं विस्तृत आहेत; आणि तशाच अर्थाने पालि भाषेंतील सूत्रें आरंभी रचलीं गेलीं असावीं.  त्या सूत्रांवरून आश्वलायनादिकांनी आपल्या सूत्रांची रचना केली किंवा बौद्धांनी त्यांच्या सूत्रांना अनुसरून आपल्या सूत्रांची रचना केली, या वादांत शिरण्याची आवश्यकता नाही.  एवढें खरें की, अशोककालापूर्वी जीं बुद्धाचीं उपदेशपर वचनें असत, त्यांना सुत्तें म्हणत; आणि तीं फार मोठीं नव्हतीं.

गाथायुक्त सूत्रांना गेय्य म्हणतात,  असें अलगद्दसुत्ताच्या अट्ठ कथेंत म्हटलें आहे आणि उदाहरणादाखल संयुत्तनिकायाचा पहिला विभाग देण्यांत आला आहे.  परंतु जेवढ्या म्हणून गाथा आहेत त्या सर्वांचा गेय्यामध्ये संग्रह होतो; तेव्हा गाथा नांवाचा निराळा विभाग कां पाडण्यांत आला हें सांगतां येत नाही.  गेय्य म्हणजे अमुकच प्रकारच्या गाथा अशी समजूत असल्यास नकळे.