पार्श्वनाथाचा चातुर्याम धर्म

पार्श्वनाथाचा चातुर्याम धर्म


चातुर्याम धर्म 6

पार्श्वनाथाचा धर्मोपदेश

तदनंतर पार्श्वनाथाने धर्मोपदेश केला तो असा – ह्या जराव्याधिमृत्युनें भरलेल्या संसाररूपी महारण्यांत दुसरा त्राता नाही; म्हणून त्याचीच कास धरावी. तो धर्म सर्वविरति व एकदेशविरति * असा दोन प्रकारचा आहे. पैकीं पहिला संयमादिक दहा प्रकारचा साधूंसाठीं; आणि दुसरा पांच अणुव्रतें, तीन गुणव्रतें व चार शिक्षाव्रतें मिळून बारा प्रकारचा गृहस्थांसाठीं जाणावा.

ही व्रते पाळण्यांत (गृहस्थांकडून) अतिचार घडला, तर तीं पुण्यप्रद होत नाहींत. यास्तव पांच अणुव्रतांत प्रत्येकीं पांच अतिचार वर्ज्य करावे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(* याचें वर्णन हेमचन्द्राचार्यानें केलें नाहीं. परंतु तत्वार्थाधिगमसूत्रांत पहिल्याचे हे दहा प्रकार दिले आहेत, ते असे – क्षमा, मार्दव, आर्जव (सरलता), शौच (निर्लोभता), सत्य, संयम, तप, त्याग, आकिंचन्य आणि ब्रम्हचर्य. यांत अहिंसा, सत्य, अरत्तेय, ब्रम्हचर्य आणि अपरिग्रह या पांच महाव्रतांचा समावेश होतोच. ही पांच महाव्रतें गृहस्थ पूर्णपणें पाळू शकत नाहींत म्हणून त्यांच्या ह्या व्रतांना अणुव्रतें म्हणतात. दिग्विरति, देशविरति आणि अनर्थदण्डविरति हीं तीन गुणव्रतें आणि सामायिकव्रत, प्रोषधव्रत, उपभोगपरिभोगपरिमाणव्रत आणि अतिथिसंविभागव्रत हीं चार शिक्षाव्रतें होत. ह्या बाराहि व्रतांचें स्पष्टीकरण न करता हेमचन्द्राचार्यानें त्यांचे अतिचार तेवढे दिले आहेत. त्यांपैकी पांच अणुव्रतांचे अतिचार येथे दिले आहेत, आणि बाकी ७ व्रतांचा खुलासा तत्त्वार्थागमसूत्राच्या सर्वार्थसिद्धि टीकेच्या (अ.७, सूत्र २१) आधारें केला आहे. हेमचन्द्राचार्यानें दिलेले ह्या ७ व्रतांचे अतिचार विस्तारभयास्तव गाळले आहे.)
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
रागानें (प्राण्याला) बांधणें, नाककान छेदणें, अधिक भार लादणें, ताडन करणें आणि उपाशीं ठेवणें हें अहिंसा अणुव्रताचे पांच अतिचार वर्ज्य करावे.

खोटा उपदेश, विचार न करतां बोलणें, गुप्त गोष्टीचा स्फोट करणें, विश्वास ठेवून सांगितलेली गोष्ट दुसर्‍यास सांगणें आणि खोटा लेख तयार करणें हे सत्य अणुव्रताचे पांच अतिचार वर्ज्य करावे.

चोरीला संमति देणें, चोरीचा माल घेणें, विरोधी राजाच्या राज्यांत जाणें, बनावट माल तयार करणें आणि मापांत कमीजास्त करणें हे पांच अस्तेय अणुव्रताचे अतिचार आहेत; ते वर्ज्य करावे.

वेश्या किंवा परस्त्री-गमन, कुमारी किंवा विधवा-गमन, दुसर्‍याचें लग्न (किंवा प्रेम) जुळविणें, स्त्रीसंगाचा अतिरेक आणि सृष्टिविरुद्ध मैथुन हे पांच ब्रम्हचर्य अणुव्रताचे अतिचार आहेत; ते वर्ज्य करावे.