भगवान बुद्ध

गौतम बुद्धांचे चरित्र


*परिशिष्ट एक ते तीन 18

‘‘कायेने, वाचेने अथवा मनाने कर्म आरंभिले असताही त्याचे प्रत्यवेक्षण कर आणि ते आत्मपरहिताच्या आड येणारे असून परिणामी दु:खकारक आहे असे दिसून आल्यास तेवढय़ावरच सोडून दे. पण ते आत्मपरहिताच्या आड येणारे नसून परिणामी सुखकारक आहे असे दिसून आल्यास, वारंवार करीत जा.

‘‘कायेने, वाचेने अथवा मनाने कर्म केल्यानंतर देखील तू त्याचे प्रत्यवेक्षण कर आणि ते कायिक अथवा वाचसिक कर्म आत्मपरहिताच्या आड येणारे व परिणामी दु:खकारक होते असे दिसून आल्यास शास्त्यापाशी किंवा विद्वान् सब्रह्मचार्‍यापाशी तू त्या पापाचा आविष्कार कर (ते कबूल करावे), आणि पुन्हा आपणाकडून तसे कर्म घडू नये अशी काळजी बाळग. ते मन:कर्म असेल, तर त्याबद्दल पश्चात्ताप कर, लाज धर व पुन्हा तो विचार मनात येऊ देऊ नकोस. पण कायेने, वाचेने अथवा मनाने केलेले कर्म आत्मपरहिताच्या आड येणारे नसून परिणामी सुखकारक होते असे दिसून आल्यास मुदित मनाने ते कर्म पुन:पुन्हा करण्याला शिक.

‘‘हे राहुल, अतीतकाली ज्या श्रमणब्राह्मणांनी आपली कायिक, वाचसिक आणि मानसिक कर्मे परिशुद्ध केली, त्यांनी ती पुन:पुन्हा प्रत्यवेक्षण करूनच परिशुद्ध केली. भविष्यकाली जे श्रमणब्राह्मण ही कर्मे परिशुद्ध करितील ते पुन:पुन्हा प्रत्यवेक्षण करूनच ही कर्मे परिशुद्ध करितील. सांप्रत जे श्रमणब्राह्मण ही कर्मे, परिशुद्ध करतात, ते पुन:पुन्हा प्रत्यवेक्षण करूनच ही कर्मे परिशुद्ध करतात. म्हणून हे राहुल, पुन:पुन्हा प्रत्यवेक्षण करून कायिक, वाचसिक आणि मानसिक कर्मे परिशुद्ध करण्यास शिक.’’

असे भगवान बोललाय आयुष्मान् राहुलाने मुदित मनाने भगवन्ताच्या भाषणाचे अभिनंदन केले.

ह्या सात सुत्तांपैकी सुत्तनिपातात असलेली, मुनिगाथा, नाळकसुत्त व सारिपुत्तसुत्त ही तीन पद्यात व बाकी चार गद्यात आहेत. गद्य सुत्तात पुनरुक्ति फार आढळते. त्या काळच्या वाङ्मयाची ही पद्धति समजली पाहिजे. का की, जैनांच्या सूत्रांत आणि काही ठिकाणी उपनिषदात देखील अशी पुनरुक्ति आहे. पण ती त्रिपिटकात एवढी आहे की, हे सर्व पूर्ववत् असावे असे वाचकाला वाटते आणि एखादा महत्त्वाचा मुद्दा त्या पुनरुक्तीत तसाच राहून जातो; त्याच्याकडे वाचकाचे लक्ष जात नाही. उदाहरणार्थ, ह्या राहुलोवादसुत्तात कायिक, वाचसिक आणि मानसिक कर्माच्या प्रत्यवेक्षणात तोच तोच मजकूर पुन:पुन्हा आला आहे. परंतु कायिक आणि वाचसिक अकुशल कर्म आचरणात आले तर शास्त्यापाशी किंवा विद्वान् सब्रह्मचार्‍यांपाशी त्याचा आविष्कार करावा, व तसे कर्म पुन्हा होऊ देऊ नये असे म्हटले आहे. मानसिक अकुशलाला हा नियम लागू केला नाही. का की, विनयपिटकात कायिक आणि वाचसिक दोषांनाच आविष्कारादिक (पापदेशना इत्यादिक) प्रायश्चित्ते सांगितली आहेत; मनोदोषासाठी प्रायश्चित्तविधान नाही. त्याला प्रश्नयश्चित्त म्हटले म्हणजे त्याबद्दल पश्चात्ताप करावा व लाज धरावी आणि तसा अकुशल विचार पुन्हा मनात आणू नये. कायिक व वाचसिक अकुशल कर्मातील आणि मानसिक अकुशल कर्मातील हा फरक राहुलोवादसुत्त वरवर वाचणार्‍याच्या लक्षात यावयाचा नाही.

अशोकाच्या वेळी ही सर्व सुत्ते अशीच होती, की संक्षिप्त होतो हे सांगला येणे कठीण आहे. ती संक्षिप्त असली तरी सारभूत मजकूर हाच होता यात शंका नाही. सुत्तपिटकातील प्राचीनतम सुत्ते ओळखण्याला ही सात सुत्ते फार उपयोगी आहेत.