भगवान बुद्ध

गौतम बुद्धांचे चरित्र


*परिशिष्ट एक ते तीन 17

राहुलोवादसुत्त

याला चूळराहुलोवाद आणि अम्बलट्ठिकराहुलोवाद असेही म्हणतात. हे मञ्झिमनिकायात आहे. त्याचा गोषवारा असा—

एके समयी बुद्ध भगवान राजगृहापाशी वेणुवनात राहत होता व राहुल अम्बट्ठिका नावाच्या ठिकाणी राहत होता. एके ठिकाणी संध्याकाळी भगवान ध्यानसमाधि आटपून राहुल राहत होता तेथे गेला. राहुलाने भगवंताला दुरून पाहून आसन मांडले व पाय धुण्यासाठी पाणी आणून ठेवले. भगवान आला व त्या आसनावर बसून त्याने पाय धुतले. राहुल भगवन्ताला नमस्कार करून एका बाजूला बसला.

भगवन्ताने पाय धुण्याच्या पात्रात स्वल्प पाणी शिल्लक ठेवले, आणि भगवान राहुलाला म्हणाला, ‘‘राहुल, हे तू स्वल्प पाणी पाहतोस काय?’’

‘‘होय भदन्त,’’ राहुलाने उत्तर दिले.

‘‘राहुल, ज्यांना खोटे बोलण्याला लाज वाटत नाही, त्यांचे श्रामण्य या पाण्याप्रमाणे क्षुल्लक आहे.’’
नंतर ते पाणी फेकून देऊन भगवान म्हणाला, ‘‘राहुल, हे फेकलेले पाणी तू पाहतोस ना?’’

‘‘होय भदन्त,’’ असे राहुलाने उत्तर दिले.

‘‘राहुल, ज्यांना खोटे बोलण्याला लाज वाटत नाही त्यांचे श्रामण्य या पाण्याप्रमाणे त्याज्य आहे.’’

नंतर ते पात्र पालथे करून भगवान म्हणाला, ‘‘राहुल, ज्यांना खोटे बोलण्याला लाज वाटत नाही त्यांचे श्रामण्य या भांडय़ाप्रमाणे पालथे समजले पाहिजे.’’

नंतर ते सुलटे करून भगवान म्हणाला, ‘‘राहुल, हे रिकामे पात्र तू पाहत आहेस ना?’’
‘‘होय भदन्त,’’ राहुलाने उत्तर दिले.

‘‘राहुल, ज्यांना खोटे बोलण्याला लाज वाटत नाही, त्यांचे श्रामण्य ह्या भांडय़ाप्रमाणे रिकामे आहे.’’
‘‘हे राहुल, लढाईसाठी सज्ज केलेला राजाचा मोठा हत्ती, पायांनी लढतो, डोक्याने लढतो, कानांनी लढतो, दातांनी लढतो, शेपटीने लढतो, पण एक तेवढी सोंड राखतो. तेव्हा पाहुताला वाटते की, एवढा मोठा हा राजाचा हत्ती सर्व अवयवांनी लढतो, फक्त सोंड राखतो; संग्रामविजयाला त्याने जीवित अर्पण केले नाही. जर त्या हत्तीने इतर अवयवांबरोबर सोंडेचाही पूर्णपणे उपयोग केला तर माहुत समजतो की, हत्तीने संग्रामविजयाला आपले जीवित अर्पण केले आहे, आता त्याच्यात कमीपणा राहिला नाही. त्याचप्रमाणे ज्यांना खोटे बोलण्यास लाज वाटत नाही, त्यांनी कोणतेही पाप सोडले नाही असे मी म्हणतो. म्हणून, हे राहुल, थट्टेने देखील खोटे बोलावयाचे नाही असा अभ्यास कर.’’

‘‘राहुल, आरशाचा उपयोग कोणता?’’

‘‘प्रत्यवेक्षण (निरीक्षण) करण्यासाठी, भदन्त,’’ राहुलाने उत्तर दिले.

‘‘त्याचप्रमाणे, राहुल, पुन:पुन्हा प्रत्यवेक्षण (नीट विचार) करून कायेने, वाचेने आणि मनाने कर्म करावी.

‘‘जेव्हा तू राहुल, कायेने, वाचेने अथवा मनाने एखादे कर्म करू इच्छिशील, तेव्हा प्रथमत: त्याचे प्रत्यवेक्षण कर आणि ते जर आत्मपरहिताच्या आड येणारे व परिणामी दु:खकारक असे दिसून आले तर ते मुळीच अमलात आणू नकोस. पण ते आत्मपरहिताच्या आड येणारे नसून परिणामी सुखकारक आहे असे दिसून आले, तर ते आचर.