भगवान बुद्ध

गौतम बुद्धांचे चरित्र


*परिशिष्ट एक ते तीन 6

‘‘वीरा, ऊठ. तू संग्राम जिंकला आहेस. तू ऋणमुक्त सार्थवाह आहेस. अतएव जगात संचार कर.’’

‘‘भगवन् धर्मोपदेश कर, जाणणारे असतीलच।।’’
आणि भिक्षुहो, अर्हन् सम्यक्  संबुद्ध विपस्सी भगवंताने ब्रह्मदेवाला गाथांनी उत्तर दिले.

‘‘त्यांच्याकरिता अमरत्वाची द्वारे उघडली आहेत. ज्यास ऐकण्याची इच्छा असेल त्यांनी भाव धरावा।।’’
‘‘उपद्रव होईल म्हणून मी लोकांना, हे ब्रह्मदेवा, श्रेष्ठ प्रणीत धर्म उपदेशिला नाही।।’’

आणि भिक्षुहो, विपस्सी भगवंताने धर्मोपदेश करण्याचे वचन दिले, असे जाणून तो महाब्रह्मा भगवंताला अभिवादन आणि प्रदक्षिणा करून, तेथेच अंतर्धान पावला.

ह्या सात खंडात तिसरा खंड पहिल्याने रचण्यात आला असावा. का की, तो त्रिपिटकामधील सर्वात प्रश्नचीन सुत्तनिपात ग्रन्थातील सेलसुत्तात सापडोत. हेच सुत्त मज्झिमनिकायात (नं. ९२) आले आहे. त्यापूर्वीच्या (नं. ९१) ब्रह्मयुसुत्तात आणि दीघनिकायातील अंबट्ठसुत्तातही याचा उल्लेख आला आहे. बुद्धकालीन ब्राह्मण लोकांत ह्या लक्षणाचे फार महत्त्व समजले जात असे. तेव्हा बुद्धाच्या शरीरावर ही सर्व लक्षणे होती असे दाखवून देण्याच्या उद्देशाने बुद्धानंतर एक दोन शतकांनी ती सुत्ते रचण्यात आली असावी, आणि त्यानंतर ह्या महापदान सुत्तात ती दाखल केली असावी. गोतम बोधिसत्त्व बुद्ध झाल्यानंतर ब्राह्मण पंडित त्याची लक्षणे पाहत. परंतु ह्या सुत्तात विपस्सीकुमाराची लक्षणे त्याच्या जन्मानंतर लौकरच पाहण्यात आली असे दर्शविले आहे आणि त्यामुळे एक मोठी विसंगति उत्पन्न झाली आहे. ती ही की, त्यास चाळीस दात आहेत, ते सरळ आहेत, त्यांच्यात विवरे नाहीत आणि त्याच्या दाढा शुभ्र पांढर्‍या आहे, ही चार लक्षणे त्यात राहून गेली. जन्मल्याबरोबर मुलाला दात नसतात, याची आठवण या सुत्तकाराला राहिली नाही!

त्यानंतर दुसरा खंड तयार करण्यात आला असावा. त्यात जे स्वभावनियम सांगितले आहेत ते मज्झिमनिकायातील अच्छरियअब्भुधम्मसुत्तात (नं. १२३) सापडतात. बोधिसत्त्वाला विशेष महत्त्व आणण्यासाठी ते रचलं आहेत. यांपैकी त्याची माता उभी असता प्रसवली आणि तो सात दिवसाचा झाल्यावर परलोकवासी झाली, हे दोन खरोखरच घडून आले असावेत. बाकी कविकल्पना. त्यानंतरचा किंवा त्याच्या मागेपुढे काही काळाने लिहिलेला सातवा खंड  होय. हा मज्झिमनिकायातील अरियपरियेसनसुत्तात, निदानवग्गसंयुत्तात (६।१), आणि महावग्गाच्या आरंभी सापडतो. ब्रह्मदेवाने केलेल्या प्रार्थनेमुळे बुद्धाने धर्मोपदेशाला सुरुवात केली, हे दाखवून देण्यासाठी हा खंड रचला गेला. मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा या चार उदात्त मनोवृत्तीवर हे रूपक आहे असे मी बुद्ध, धर्म आणि संघ या पुस्तकातील पहिल्या व्याख्यानात दाखवून दिले आहे.