भगवान बुद्ध

गौतम बुद्धांचे चरित्र


प्रकरण एक ते बारा 130

आजारीपणा

भगवान आजारी असल्याचा उल्लेख फार थोडय़ा ठिकाणी सापडतो. एकदा राजगृहाजवळ वेळुवनात तो आजारी होता. त्याला महाचुंदाने त्याच्या सांगण्यावरून सात बोध्यगे म्हणून दाखविली, आणि त्या योगे तो बरा झाला, अशी कथा बोज्झंगसंयुत्ताच्या सोळाव्या सुत्तात आढळते.

विनयपिटकांतील महावग्गांत भगवान थोडासा आजारी होता व त्याला जीवक कौमारभृत्याने जुलाब दिला असा उल्लेख आहे. चुल्लवग्गात देवदत्ताची कथा आहे. त्याने गृध्रकूट पर्वतावरून भगवंतावर एक धोंड टाकली. ऊतचे तुकडे तुकडे होऊन एक चीप भगवंताच्या पायाला लागली व त्यामुळे भगवान आजारी झाला. देवदत्त भगवंताचा खून केरील, अशी भीती वाटून काही भिक्षूंनी भगवान राहत होता त्याच्या आसपास पहारा करण्यास सुरवात केली. त्यांची हालचाल पाहून भगवान आनंदाला म्हणाला, ‘‘हे भिक्षू येथे का फिरत आहेत?’’ आनंदाने उत्तर दिले, ‘‘भदन्त, देवदत्ताकडून आपल्या शरीराला धक्का पोचू नये म्हणून हे भिक्षू येथे पहारा करीत आहेत.’’

भगवंताने आनंदाकडून त्या भिक्षूंना बोलावून आणले आणि भगवान त्यांना म्हणाला, ‘‘माझ्या देहाची एइतकी काळजी घेण्याचे काही कारण नाही. माझ्या शिष्यांपासून माझे रक्षण व्हावे, अशी अपेक्षा नाही. तेव्हा तुम्ही पहारा न करता आपल्या कामाला लागा.’’

या विनयपिटकातील गोष्टींना सुत्तपिटकात आधार सापडत नाही. जुलाबाची गोष्ट तर आगदीच साधी आहे; आणि देवदत्ताची कथा त्याला अत्यंत अधम ठरविण्यासाठी रचली असण्याचा संभव आहे. जरी ती खरी असली, तरी त्या जखमेमुळे भगवान फार दिवस आजारी होता असे वाटत नाही. असे हे लहानसहान आजार खेरीज करून बुद्ध झाल्यापासून भगवंताचे आरोग्य एकंदेरीत चांगले होते, असे म्हणण्यास हरकत नाही.

आरोग्याचे कारण

बुद्ध भगवान आणि त्याचे शिष्य सर्व जातींच्या लोकांनी दिलेली भिक्षा घेत व दिवसातून एकदा जेवीत. असे असता त्यांचे आरोग्य चांगले राहून मुखचर्या प्रसन्न दिसत असे याचे कारण खालील काल्पनिक संवादात दिले आहे.

(प्रश्न-)    अरञ्ञे विचरन्तानं सन्तानं ब्रह्मचारिनं।
एकभत्तं भुञ्जमानानं केन वण्णो पसीदति।।

‘अरण्यात राहतात, ब्रह्मचर्याने वागतात आणि एकदा जेवतात, असे असून साधूंची कान्ति प्रसन्न कशी?’

(उत्तर-)     अतीतं नानुसोचन्ति नप्पजप्पन्ति नागतं।
पच्चुपन्नेन यापेन्ति तेन वण्णो पसीदती।।
‘गेल्या गोष्टींचा शोक करीत नाहीत, अनागत गोष्टींची बडबड करीत नाहीत आणि वर्तमानकाळी संतोषाने वागतात, म्हणून कान्ति प्रसन्न राहते.’