भगवान बुद्ध

गौतम बुद्धांचे चरित्र


प्रकरण एक ते बारा 129

बुद्ध भगवंताने उपदेशाला सुरुवात केली, तेव्हा त्याची फारशी प्रसिद्धि नसल्यामुळे त्याला किंवा त्याच्या लहानशा भिक्षुसमुदायास वर्षावासासाठी एका ठिकाणी राहता येणे शक्य नव्हते . जेव्हा त्याची चोहोकडे प्रसिद्धि झाली, तेव्हा प्रथमत: अनाथपिंडिक श्रेष्ठीने श्रावस्तीजवळ जेतवनात त्याच्यासाठी एक मोठा विहार बांधला; आणि काही काळाने विशाखा उपासिकेने त्याच शहराजवळ पूर्वाराम नावाचा प्रश्नसाद बांधून बौद्धसंघाला अर्पण केला. बुद्ध भगवान उत्तर वयात बहुधा या दोन ठिकाणी वर्षाकाळी राहत असे. इतर ठिकाणच्या उपासकांनी आमंत्रण केले असता वर्ळाकाळासाठी भगवान बुद्ध त्यांच्या गावी देखील जात असावा. वर्षाकाळापुरत्या झोपड्या बांधून लोक भिक्षूच्या राहण्याची व्यवस्था करीत. भगवंतासाठी एक निराळी झोपडी असे. तिला गंधकुटी म्हणत.

वर्षाकाळात आजूबाजूचे उपासक बुद्धदर्शनाला येत धर्मोपदेश ऐकत. परंतु ते नित्य विहारात आणून भिक्षा देत नसत. भिक्षूंना आणि बुद्ध भगवंताला वहिवाटीप्रमाणे भिक्षाटन करावे लागे; क्वचितच गृहस्थांच्या घरी आमंत्रण असे.

काही दिवसांचा एकांतवास

भगवान प्रवासात असला काय, किंवा वर्षाकाळी एका ठिकाणी राहिला काय, दुपारी एक दोन तास आणि राक्षीच्या पहिल्या व शेवटच्या यामात बराच वेळ ध्यानसमाधीत घालवीत असे, हे वर सांगितलेच आहे याशिवाय, भगवान एकदा वैशालीजवळ महावनातील कूटागार शाळेत राहत असता पंधरा दिवसपर्यंत एकान्तात राहिला, भिक्षा घेऊन येणार्‍या एका भिक्षूला तेवढी त्याने जवळ येणायास परवानगी दिली होती, अशी कथा आनापानस्मृतिसंयुत्ताच्या वनव्या सुत्तात आली आहे. याच संयुत्ताच्या अकराव्या सुत्तात मजकूर आहे तो असा—

एकेसमयी भगवान इच्छानंगल गावाजवळ इच्छानंगल वनात राहत होता. तेथे भगवान भिक्षूंना म्हणाला, ‘‘भिक्षूहो, मी तीन महिनेपर्यंत एकान्तात राहू इच्छितो. माझ्याजवळ एका तेवढ्या पिण्डापात आणणार्‍या भिक्षूशिवाय दुसर्‍या कोणी येऊ नये.’’ त्या तीन महिन्यानंतर भगवान एकान्तातून बाहेर आला आणि भिक्षूंना म्हणाला, ‘‘जर अन्य संप्रदायाचे परिव्राजक तुम्हाला विचारतील की, ह्या वर्षाकाळात भगवान कोणती ध्यानसमाधी करीत होता? तर त्यांना म्हणा, भगवान आनापानस्मृतिसमाधि करून राहिला.’’ वरच्या सुत्तात देखील भगवान पंधरा दिवस आनापानस्मृतिसमाधि करीत होता असे म्हटले आहे.  याचा अर्थ एवढाच की, त्या समाधीचे महत्त्व लोकांना समजून यावे. पंधरा दिवस किंवा तीन महिने देखील तिची भावना केली, तरी कंटाळा येत नाही आणि तिच्यामुळे शरीरस्वास्थ राहते.

दुसर्‍या एका प्रसंगी भगवान भिक्षुसंघ सोडून एकटाच पारिलेय्यक वनात जाऊन राहिल्यांचा उल्लेख सहाव्या प्रकरणात (पू. १०१) आलाच आहे यावरून असे दिसते, की भगवान कधी कधी जेथे आपणास कोणी ओळखत नसे, अशा ठिकाणी एकान्तात जाऊन राही. पण जेव्हा त्याची सर्व प्रसिद्धी झाली आणि सर्व लोक त्याला ओळखू लागले, तेव्हा संघात असतानाच काही काळ संघापासून अलिप्त राहण्याचा उपक्रम त्याने सुरू केला असावा. परंतु त्याच्या पंचेचाळीस वर्षाच्या कारकीर्दीत असे प्रसंग फार नसावेत.

आजकाल कायाकल्पाची बरीच ख्याती झाली आहे. महिना दीड महिना माणसाला एका कोठडीत कोंडून आणि पथ्यावर ठेवून औषधोपचार करण्यात येतो. त्यामागे मनुष्य पुन्हा होतो अशी समजूत आहे. या कायाकल्पाचा आणि भगवंताच्या एकान्तवासाचा संबंध नाही. का की, भगवान त्या अवधीत औषधोपचार करीत नसे; केवळ आनापानस्मृतिसमाधीचेी भावना करी.

एकान्तात पुष्कळ काळ राहण्याची प्रथा सिंहलद्वीपात, ब्रह्मदेशात किंवा सयामात क्वचितच आढळते; पण तिबेटात मात्र ती चालू आहे. एवढेच नव्हे, तर काही ठिकाणी तिचा अतिरेक झाल्याचे दिसून येते. काही तिबेटी लामा वर्षाची वर्षे एखाद्या गुहेत किंवा अशाच दुसर्‍या ठिकाणी आपणाला कोंडून घेतात आणि सर्व सिद्धि मिळविण्याचा प्रयत्न करतात.