भगवान बुद्ध

गौतम बुद्धांचे चरित्र


प्रकरण एक ते बारा 124

भिक्षुसंघासह चारिका

बुद्धत्व प्राप्त झाल्यावर भगवंताने बुद्धगयेहून काशीपर्यंत प्रवास केला आणि तेथे पंचवर्गीय भिक्षूंना उपदेश करून त्याचा संघ स्थापला. त्यांना काशीला सोडून भगवान एकटाच परत राजगृहेाला गेला, अशी कथा महावग्गांत वर्णिली आहे. पण हे पाचही भिक्षु त्या चातुर्मासानंतर भगवंताबरोबर होते. असे समजण्याला बळकट आधार आहे. राजगृह येथे सारिपुत्त आणि मोग्गलान हे दोघे प्रसिद्ध परिव्राजक बुद्धाचे शिष्य झाल्यानंतर बौद्ध संघाच्या भरभराटीला आरंभ झाला. आणि तेव्हापासून बेुद्ध भगवंताबरोबर बहुधा लहानमोठा भिक्षुसंघ राहत असे, व त्याची चारिका भिक्षुसंघासहवर्तमान होत असे. असे क्वचितच प्रसंग आहेत की, भगवान भिक्षुसंघाला सोडबन एकटा राहिला.

फिरती गुरुकुले

बुद्धसमकालीन सगळे श्रमणसंघ व त्याचे पुढारी अशाच रीतीने प्रवास करीत असत. बुद्धापूर्वी आणि बुद्धसमकाली ब्राम्हणांची गुरुकुले होती. त्या ठिकाणी वरिष्ठ जातीचे तरुण जाऊन अध्ययन करीत असत. परंतु त्या गुरुकुलांचा फायदा बहुजन समाजाला फार थोडा मिळे; ब्राम्हण वेदाध्यन करून बहुधा राजाश्रय धरीत; क्षत्रिय धनुर्विद्या शिकून राजाच्या नोकरीत दाखल होत, आणि जीवक कौमारभृत्यासारखे तरुण आयुर्वेद शिकून वरिष्ठ जातीच्या उपयोगी पडत व अखेरीस राजाश्रय मिळविण्याची खटपट करीत . परंतु श्रमणांची गुरुकुले अशी मुळीच नव्हती. ते प्रवास करता करताच शिक्षण घेत आणि सामान्य जनात मिसळून घर्मोपदेश करीत. येणेकरून बहुजनसमाजावर त्यांचे वजन फार पडले.

भिक्षुसंघात शिस्त

बुद्ध भगवंताच्या भिक्षुसंघात उत्तम शिस्त होती. भिक्षूंनी अव्यवस्थितपणे वागणे त्याला मुळीच पसंत नव्हते. यासंबंधी चातुमसुत्तात(मज्झिमनिकाय नं. ६७) आलेली कथा येथे थोडक्यात देणे योग्य वाटते.
भगवान चातुमा नावाच्या शाक्याच्या गावी आमलेकीवनात राहत होता. त्या वेळी सारिपुत्त आणि मोग्गल्लान पाचशे भिक्षूंना बरोबर घेऊन चातुमेला आले. चातुमेतील रहिवाशी भिक्षूंच्या आणि सारिपुत्त मोग्गल्लानाबरोबर आलेल्या भिक्षूंच्या परस्परांशी आगतस्वागतादिक गोष्टी सुरू झाल्या. बसण्या-उठण्याच्या जागा कोठे, पात्रचीवरे कोठे ठेवावी इत्यादिक विचारपूस करीत असता गडबड होऊ लागली. तेव्हगा भगवान आनंदाला म्हणाला, ‘‘कोळी मासे पकडताना जशी आरडाओरड होते, तशी येथे का चालली आहे?’’

आनंद म्हणाला, ‘‘भदंत, सारिपुत मोग्गल्लान यांजबरोबर आलेल्या भिक्षूंच्या गोष्टी चालल्या आहेत. त्यांच्या राहण्याच्या आणि वात्रचीवरे ठेवण्याच्या जागेसंबंधाने गडबड होत आहे.’’

भगवंताने आनंदाला पाठवून सारिपुत मोग्गल्लानाला व त्या भिक्षूंना बोलावून आणले, आणि त्यांनी आपल्याजवळ न राहता तेथून निघून जावे असा दंड केला. ते सर्व वरमले, आणि बुद्धाला नसम्कार करून तेथून जावयास निघाले. चातुमासेतील शाक्य त्या वेळी आपल्या संस्थागारात काही कामानिमित्त जमले होते. आजच आलेले भिक्षु परत जात आहेत, हे पाहून त्यांना आश्चर्य वाटले, आणि ते का जातात याची त्यांनी विचारपूस केली. ‘बुद्ध भगवंताने आम्हास दंड केल्यामुळे आम्ही येथून जात आहेत’, असे त्या भिक्षूंनी शाक्यांना सांगितले. तेव्हा चातुमेतील शाक्यांनी त्या भिक्षूंस तेथेच राहावयास सांगितले आणि बुद्ध भगवंताला विनंती करून त्यांना क्षमा करविली.