भगवान बुद्ध

गौतम बुद्धांचे चरित्र


प्रकरण एक ते बारा 123

मिताहार

बुद्ध भगवंताचा आहार अत्यंत नियमित होता. कधी खाण्यापिण्यात त्याने अतिरेक केला नाही. आणि हा उपदेश तो पुन:पुन: भिक्षूंना करी. भगवान आरंभी रात्री जेवीत असे, असे मज्झिमनिकायातील (नं. ७०) कीटागिरीसुत्तावरून दिसून येते. त्यात भगवान म्हणतो ‘‘भिक्षुही, मी रात्रीचे जेवण सोडले आहे, आणि त्यामुळे माझ्या शरीरात व्याधि कमी झाली आहे, जाड्या कमी झाले आहे, अंगी बळ आले आहे आणि चित्ताला  स्वास्थ्य मिळत आहे. भिक्षूहो, तुम्ही देखील याप्रमाणे वागा. तुम्ही पात्रीचे जेवण सोडले, तर तुमच्या शरीरात व्याधि कमी होईल, जाडय़ कमी होईल, अंगी शक्ति येईल आणि तुमच्या चित्ताला स्वास्थ मिळेल.

तेव्हापासून भिक्षूंची दुपारचे बारा वाजण्यापूर्वी जेवण्याची वहिवाट सुरू झाली, आणि बारा बाजल्यानंतर जेवणे निषिद्ध मानण्यात येऊ लागले.

चारिका

चारिका म्हणजे प्रवास. ती दोन प्रकारची, शीघ्र चारिका आणि सावकारा तारिका. यासंबंधाने अंगुत्तरनिकायाच्या पंचकनिपातात तिसर्या वग्गाच्या आरंभी सुत्त आहे ते असे---

भगवान म्हणतो, ‘‘भिक्षुहो, शीघ्र चारिकेमध्ये हे पाच दोष आहेत. ते कोणते? पूर्वी जे धर्मवाक्य ऐकले नसेल, ते ऐकू शकत नाही; जे एकले असेल, त्याचे संशोधन होत नाही; काही गोष्टीचे पूर्ण ज्ञान मिळत नाही; त्याला कधी कधी भयंकर रोग जडतो; आणि गोष्टींचे पूर्ण ज्ञान मिळत नाही; त्याला कधी कधी भयंकर रोग जडतो; आणि मित्र मिळत नाहीत. भिक्षुहो, शीघ्र चारिकेत हे पाच दोष आहेत.

‘‘भिक्षुहो, सावकाश चारिकेत हे पाच गुण आहेत. ते कोणते? पूर्वी जे धर्मनाक्य ऐकले नसेल, ते ऐकू शकतो; जे ऐकले असेल, त्याचे संशोधन होते; काही गोष्टीचे पूर्ण ज्ञान मिळते; त्याला भयंकर रोग नाहीत; आणि मित्र मिळतात. भिक्षूहो, सावकाश चारिकेत हे पाच गुण आहेत.’’

बुद्ध भगवंताने बोधिसत्त्वावस्थेतील हा आपला अनुभव सांगितला असला पाहिजे. त्वरित प्रवास करण्यापासून फायदा होत नसून सावकाश प्रवास करण्यास फायदा होतो, हा त्याचा स्वत:चा अनुभव होता. अशा रीतीने सावकाश प्रवास करूनच इतर श्रवणांकडून त्याने ज्ञान संपादन केले आणि शेवटी आपला नवा मध्यम मार्ग शोधून काढला.