भगवान बुद्ध

गौतम बुद्धांचे चरित्र


प्रकरण एक ते बारा 120

प्राणिवधाविरुद्ध अशोकाचा प्रसार

प्राणिहिंसेविरुद्ध प्रचार करणारा पहिला ऐतिहासिक राजा म्हटला म्हणजे अशोक होय. त्याचा पहिलाच शिलालेख असा आहे-

‘ही धर्मलिपि देवांचा प्रिय प्रियदर्शिराजाने लिहविली. ह्या राज्यात कोणत्याही प्राण्याला मारून होमहवन करू नये आणि जत्रा करू नये. कारण जत्रेत देवांचा प्रिय प्रियदर्शिराजा पुष्कळ दोष पाहतो. काही जत्रा देवांच्या प्रिय प्रियदर्शिराजाला पसंत आहेत. पूर्वी प्रियदर्शिराजाच्या पाकशाळेत स्वयंपाकासाठी हजारो प्राणी मारले जात असत. जेव्हा हा धर्मलेख लिहिला, तेव्हापासून दोन मोर आणि एक मृग असे तीनच प्रश्नणी मारले जातात. तो मृगहि रोज मारण्यात येत नाही. आणि पुढे हे तीन प्रश्नणीदेखील मारण्यात येणार नाहीत.’

ह्या लेखात अशोकाने गाईबैलांचा उल्लेख केला नाही. यावरून असे अनुमान करता येते की, ब्राह्मणेतर वरिष्ठ जातीत त्या काळी गोमांसाहार जवळ जवळ बंदच पडला होता. इतकेच नव्हे, तर अशोकाने अन्नासाठी देखील कोणत्याहि प्राण्याचा वध करू नये, असा प्रचार चालविला. समाज या शब्दाचे भाषांतर मी जत्रा असे केले आहे. ते जरी तंतोतंत नसले तरी साधारणपणे ग्राह्य वाटले. आजकाल जशा महाराष्ट्रात जत्रा किंवा उत्तर हिंदुस्थानात मेळे होतात, तशा प्रकारचे अशोकाच्या वेळी समाज होत असावेत. त्यांत देवदेवतांना प्रश्नण्यांचे बळी देऊन मोठा उत्सव करणारे समाज अशोकाला पसंत नव्हते. ज्यांत प्राण्यांचा बळी देण्यात येत नसे, अशा जत्रा भरवण्यास त्याची हरकत नव्हती. यज्ञात काय किंवा जत्रेत काय, प्राण्याचे बलिदान होऊ नये, यावर त्याचा मुख्य कटाक्ष होता.

आमचे पूर्वज निवृत्तमांस नव्हते


आजकाल यज्ञयाग बंद पडल्यासारखेच झाले आहेत. पण जत्रांतील बलिदान अनेक ठिकाणी अद्यापिही चालू आहे. तथापि इतर कोणत्याही देशापेक्षा हिंदुस्थानचे लोक अधिक निवृत्तमांस आहेत. या कामी जैनांचा आणि बौद्धांच्चा धर्मप्रचार कारणीभूत झाला, यात शंका नाही. अर्थात् आजला आम्ही शाकाहारी आहोत, म्हणून आमचे पूर्वज तसेच शाकाहारी होते, असे प्रतिपादन करणे वस्तुस्थितीला धरून नाही.

चिनात डुकरांचे महत्त्व

आता खास डुकराच्या मांसासंबंधी चार शब्द लिहिणे योग्य वाटते. प्रश्नचीन कालापासून चिनी लोक डुकराला संपत्तीचे लक्षण समजतात. त्यांची लिपि आकारचिन्हांनी बनलेली आहे. ह्या चिन्हांच्या मिश्रणाने भिन्न भिन्न शब्द तयार करता येतात. उदाहरणार्थ, माणसाचे चिन्ह काढून त्यावर तलवारीचे चिन्ह काढले, तर त्याचा अर्थ शूर असा होतो. घराच्या चिन्हाखाली मुलाचे चिन्ह काढले, तर त्याचा अर्थ अक्षर, स्त्रीची दोन चिन्हे काढली, तर भांडण आणि डुकराचे चिन्ह काढले, तर त्याचा अर्थ संपत्ति असा होतो. म्हणजे घरात डुकर असणे हे संपत्तीचे लक्षण आहे, असे प्राचीन चिनी लोक समजत; आणि सध्यादेखील चिनात डुकराला तेवढेच महत्त्व आहे.