भगवान बुद्ध

गौतम बुद्धांचे चरित्र


प्रकरण एक ते बारा 116

महावीरस्वामींच्या मांसाहाराबद्दल वाद

खुद्द महावीरस्वामी मांसाहार करीत होते यासंबंधी सबळ पुरावा सध्या पुढे आला आहे. ‘प्रस्थान’ मासिकाच्या गेल्या कार्तिकाच्या अंकांत (संवत् १९९५, वर्ष १४, अंक १) श्रीयुत गोपाळदास जीवाभाई पटेल यांनी ‘श्री महावीरस्वामींनो मांसाहार’ नावाचा लेख प्रसिद्ध केला आहे. त्यापैकी प्रस्तुत विषयाला लागू पडणारी माहिती संक्षेपाने येथे देतो.

महावीरस्वामी श्रावस्ती नगरीत राहत होते. मक्खलि गोसाल देखील तेथे पोचला. आणि ते दोघे परस्परांच्या जिनत्वाविरुद्ध कडक टीका करू लागले. परिणामी गोसालाने महावीरस्वामीला शाप दिला की, माझ्या तपोबलाने तू सहा महिन्यांच्या अन्ती पितज्वराने मरण पावशील. महावीरस्वामीने त्याला उलटा शाप दिला की, तू सातव्या रात्री पित्तज्वराने पीडित होऊन मरण पावशील. त्याप्रमाणे गोसाल सातव्या रात्री मरण पावला, पण त्याच्या प्रभावाने महावीर स्वामीला अत्यंत दाह होऊन रक्ताचे झाडे सुरू झाले.
त्या वेळी महावीरस्वामीने सिंह नावाच्या आपल्या शिष्याला सांगितले, ‘‘तू मेंढिक गावात रेवती नावाच्या बाईपाशी जा. तिने माझ्यासाठी दोन कबुतरे शिजवून ठेवली आहेत, ती मला नकोत. ‘काल मांजराने मारलेल्या कोंबडीचे मास तू तयार केले आहेस, तेवढे दे,’ असे तिला सांग.’’

श्रीयुत गोपाळदास यांनी, मूळ भगवती सूत्रांतील उतारा आपल्या लेखात दिला नाही. तो येथे देणे योग्य आहे-

‘‘तं गच्छह णं सुमं सीहा, मेढियगामं नगरं रेवतीए गाहावतीणीए गिहे तत्थ णं रेवतीए गाहावतीणीए ममं
अट्ठाए दुवे कवोयसरीरा उवक्खजिया, तेहिं नो अट्ठो।  अत्थि से अन्न परियासिए मज्जारकडए कुक्कुडमंसए तं आहराहि एएणं अट्ठो।’’

ज्याला अर्धमागधीचे अल्पस्वल्प ज्ञान आहे, त्याने नि:पक्षपातीपणाने हा उतारा वाचला, तर तो म्हणेल की श्री. गोपाळदास यांनी केलेला अर्थ बरोबर आहे, पण आजला श्री. गोपाळदास यांच्याविरुद्ध अनेक जैन पंडितांनी कडक टीका चालविली आहे!

बौद्ध आणि जैन श्रमणांच्या मांसाहारात फरक

मांसाहारासंबंधाने जैनांचा आणि बौद्धांचा वाद कशा प्रकारचा होता, याचा विचार केला असताही श्री. गोपाळदास यांचेच म्हणणे बरोबर आहे असे ठरते.

वैशालीतील सिंह सेनापति निग्र्रन्थांचा उपासक होता, या उल्लेख आठव्या प्रकरणात आलाच आहे (पृ. १२७). बुद्धाचा उपदेश ऐकून तो बुद्धोपासक झाला व त्याने बुद्धाला आणि भिक्षुसंघाला आपल्या घरी आमंत्रण देऊन आदरपूर्वक त्यांचे संतर्पण केले. पण निर्ग्रन्थांना ही गोष्ट रुचली नाही. त्यांनी वैशाली नगरीत अशी वदंता उठवली की, सिंहाने मोठा पशु मारून गोतमाला आणि भिक्षुसंघाला मेजवानी दिली आणि गोतमाला हे माहीत असता, सिंहाने दिलेल्या भोजनाचा त्याने स्वीकार केला! ही बातमी एका गृहस्थाने येऊन हळूच सिंहाला सांगितली. तेव्हा तो म्हणाला, ‘‘यात काही अर्थ नाही. बुद्धाची नालस्ती करण्यात निर्ग्रन्थांना आनंद वाटतो. पण मी जाणूनबुजून मेजवानीसाठी प्रश्नण्यांची हिंसा करीन हे अगदीच असंभवनीय आहे.’’

अशाच तऱ्हेचा दुसरा एक उतारा मज्झिमनिकायातील (५५ व्या) जीवनसुत्तात सापडतो तो असा-

एके समयी भगवान राजगृह येथे जीवक कौमारभृत्याच्या आम्रवनात राहत होता. तेव्हा जीवक कौमारभृत्य भगवंताजवळ आला, भगवंताला अभिवादन करून एका बाजूला बसला आणि म्हणाला, ‘‘भदन्त, आपणाला उद्देशून प्रश्नणी मरून तयार केलेले अन्न आपण खात असता, असा आपणावर आरोप आहे, तो खरा आहे काय?’’ भगवान् म्हणाला, ‘‘हा आरोप साफ खोटा आहे. आपल्यासाठी प्रश्नणिवध केलेला आपण पाहिला, ऐकला किंवा तशी आपणास शंका आली, तर ते अन्न निषिद्ध आहे, असे मी म्हणतो.’’

यावरून जैनांचा बुद्धावर आरोप कशा प्रकारचा होता हे समजून येते. बुद्ध भगवंताला कोणी आमंत्रण करून मांसाहार दिला असता जैन म्हणत, श्रमण गोतमाकरिता पशु मरून तयार केलेले (उद्दिस्सकटं) मास तो खातो!  स्वत: जैन साधु कोणाचे आमंत्रण स्वीकारीत नसत. रस्त्यातून जात असताना मिळालेली भिक्षा घेत आणि त्या प्रसंगी मिळालेले मांस खात.