भगवान बुद्ध

गौतम बुद्धांचे चरित्र


प्रकरण एक ते बारा 103

जातिभेदाचा निषेध

याप्रमाणे क्षत्रिय जातीला महत्त्व आले असले तरी त्यांचे प्रमुख कर्तव्य जे युद्ध ते बुद्धाला मुळीच पसंत नसल्याकारणाने सर्वच जतिभेद त्याला निरुपयोगी वाटला आणि त्याचा त्याने सर्वथैव निषेध केला. इतर श्रमणांच्या पुढार्‍यांनी बुद्धाप्रमाणे जातीचा निषेध केल्याचा दाखला सापडत नाही. त्यांच्या संघात जातिभेदाला थाराच नव्हता. परंतु त्यांच्या उपासकवर्गात अस्तित्वात असलेल्या जातिभेदाला त्यांनी विरोध केला नसावा. ते काम बुद्धाने केले ते कसे  हे पाहू.

जातिभेदाविरुद्ध बुद्धाने उपदेशिलेले सर्वात प्राचीन असे बासेट्ठसुत्त सुत्तनिपातात आणि मज्झिमनिकायात सापडते. त्याचा सारांश असा—

एके समयी बुद्ध भगवान इच्छानंगल नावाच्या गावाजवळ इच्छानंगल उपवनात रहात होता. त्या काळी पुष्कळ प्रसिद्ध ब्राह्मण इच्छानंगल गावी होते. त्यापैकी वासिष्ठ आणि भारद्वाज या दोन तरुण ब्राह्मणांमध्ये ‘मनुष्य जन्माने श्रेष्ठ होतो किंवा कर्माने’ हा वाद उपस्थित झाला.

भारद्वाज आपल्या मित्राला म्हणाला, “भो वासिष्ठ ज्याच्या आईच्या बाजूला आणि बापाच्या बाजूला सात पिढ्या शुद्ध असतील, ज्याच्या कुलात सात पिढ्यात वर्णसंकर झाला नसेल तोच ब्राह्मण श्रेष्ठ होय.” वासिष्ठ म्हणाला, “भो भारद्वाज, जो मनुष्य शीलसंपन्न आणि कर्तव्यदक्ष असेल त्यालाच ब्राह्मण म्हणावे.” पुष्कळ वादविवाद झाला. तथापि ते दोघे परस्परांचे समाधान करू शकले नाहीत. शेवटी वासिष्ठ म्हणाले, “भो भारद्वाज, आमचा हा वाद येथे तुटावयाचा नाही. हा श्रमण गोतम आमच्या गावाजवळ राहत आहे. तो बुद्ध आहे. पूज्य आहे, आणि सर्व लोकंचा गुरू आहे. अशी त्याची कीर्ति सर्वत्र  पसरली आहे. आपण त्याजपाशी जाऊन आपला मतभेद कळवू, आणि तो जो निकाल देईल तो मान्य करू.”

तेव्हा ते दोघे बुद्धापाशी गेले आणि बुद्धाला कुशलप्रश्नादि विचारून एका बाजूला बसले. आणि वासिष्ठ म्हणाला, “भो गोतम, आम्ही दोघे सुशिक्षित ब्राह्मणकुमार आहोत. हा तारुक्ष्याचा शिष्य आणि मी पौष्करसादीचा शिष्य आहे. आमचा जातिभेदासबंधाने विवाद आहे. हा म्हणतो, जन्मामुळे ब्राह्मण होतो, आणि मी म्हणतो कर्मामुळे ब्राह्मण होतो. आपली किर्ती ऐकून आम्ही येथे आलो आहोत. कारण आमच्या वादाचा निकाल द्यावा.”

भगवान म्हणाला, “हे वासिष्ठा, तृण, वृक्ष इत्यादिक वनस्पतींमध्ये भिन्नभिन्न जाती आढळतात, तशाच या किडे, मुंग्या वगैरे क्षुद्र प्राण्यांमध्येही आहेत. सर्वांच्या श्वापदांच्या, पाण्यात राहणार्‍या मत्स्यांच्या आणि आकाशात उडणार्‍या पक्ष्यांच्या देखील अनेक जाति आहेत. त्यांच्या भिन्नत्वाची चिन्हे त्या त्या प्राणिसमुदायात स्पष्ट दिसतात. पण मनुष्यांमध्ये भिन्नत्वाचे चिन्ह आढळत नाही. केस, कान, डोळे, तोंड, नाक, ओठ, भिवया, मान, पोट, पाठ, हात, पाय इत्यादिक अवयवांनी एक मनुष्य दुसऱया माणसाहून अगदीच भिन्न होऊ शकत नाही. अर्थात पशुपक्ष्यादिकात जशा आकारादिकांनी भिन्नभिन्न जाती आढळतात, तशा त्या मनुष्यप्राण्यात नाहीत. सर्व माणसांचे अवयव जवळजवळ सारखेच असल्यामुळे मनुष्यामध्ये जातिभेद ठरविता येत नाही, परंतु मनुष्याची जात कर्मावरून ठरविता येणे शक्य आहे.”

“एखादा ब्राह्मण गाई पाळून निर्वाह करीत असला तर त्याला गवळी म्हणावे, ब्राह्मण म्हणू नये, जो शिल्पकलेने उपजिवीका करतो तो कारागीर, जो व्यापार करतो तो वाणी, दूताचे काम करतो दूत, चोरीवर उपजीविका करतो तो चोर, युद्धकलेवर उपजीविका करतो तो योद्धा, यज्ञयागंवर उपजाविका करतो तो याजक, आणि जो राष्ट्रावर उपजीविका करतो तो राजा होय. परंतु यापैकी कोणालाही जन्मामुळे ब्राह्मण म्हणता यावयाचे नाही.”