भगवान बुद्ध

गौतम बुद्धांचे चरित्र


प्रकरण एक ते बारा 101

तो प्रकार पाहून चोर लोक घाबरून गेले. यापुढे सरळपणे चोर्‍या करणे धोक्याचे आहे, असे जाणून त्यांनी तीक्ष्ण शस्त्रे तयार करवली व ते उघडपणे दरोडे घालू लागले...

याप्रमाणे दरिद्री लोकांना व्यवसाय न मिळाल्यामुळे दारिद्र्य वाढत गेले. दारिद्र्य वाढल्याने चोर्‍या लुटालुटी वाढल्या, चोर्‍या लुटालुटी वाढल्याने शस्त्रास्त्रे वाढली. शस्त्रास्त्रे वाढल्याने प्राणघात वाढले. प्राणघात वाढल्याने असत्य वाढले, असत्य वाढल्याने चहाडखोरी वाढली, चहाडखोरी वाढल्याने व्यभिचार वाढला आणि त्यामुळे शिवीगाळ आणि वृथा बडबड वाढली. त्यांचा अभिवृद्धि झाल्यामुळे लोभ आणि द्वेष यांची अभिवृद्धि झाली. आणि त्यांच्यामुळे मिथ्यादृष्टि वाढून इतर सर्व असत्कर्मे फैलावली.

महाविजित राजाला पुरोहिताने सांगितलेल्या यज्ञ विधानाचा खुलासा या चक्कवत्तिसीहनाद सुत्तावरून होतो. लोकांकडून जबरदस्तीने जनावरे हिरावून घेऊन त्यांचा यज्ञात वध करणे हा खरा यज्ञ नव्हे. तर राज्यातील लोकांना समाजजोपयोगी कार्याला लावून बेकारी नष्ट करणे हा होय. बलिदानपूर्वक यज्ञयागांचा कधीच लोप होऊन गेला आहे, पण अद्यापि खरा यज्ञ करण्याचा प्रयत्न क्वचित दिसून येतो. बेकारी कमी करण्यासाठी जर्मनीने आणि इटलीने युद्धसामग्री वाढविली; त्यामुळे फ्रान्स, इंग्लंड आणि आता अमेरिका या राष्ट्रांना देखील युद्धसामुग्री वाढवावी लागली आणि आता रसंग हातघाईवर येण्याचा संभव दिसतो. इकडे जपानने चीनवर आक्रमण केलेच आहे, आणि तिकडे मुसोलिनी व हिटलर उद्या काय करतील याचा कोणालाच भरवसा वाटत नाही.* एक गोष्ट खरी की, या सगळ्यांचे पर्यवसान रणयज्ञातच होणार! आणि त्यात इतर प्राण्यांपेक्षा मनुष्यप्राण्यांच्याच आहुति जास्त पडणार! हा रणयज्ञ थांबवावयाचा असेल तर  लोकांना युद्धसामग्रीकडे न लावता समाजोन्नतीच्या कामाकडे लावले पाहिजे. तेव्हाच बुद्ध भगवंताने उपदेशिलेले यज्ञविधान अंमलात येईल. अस्तु. हे थोडे विषयांतर झाले. बुद्धाच्या यज्ञाविधानाच्या स्पष्टीकरणार्थ ते योग्य वाटले. वर दिलेली सुत्ते बुद्धानंतर काही काळाने रचली असली तरी त्यात बुद्धाने उपदेशिलेल्या मुलभूत तत्त्वांचा खुलासा करण्यात आला आहे. असा सुयज्ञ उपदेशिणार्‍या गुरूला वेदनिंदक म्हणून त्याची अवहेलना करणे योग्य आहे की काय याचा विचार सुज्ञांनी करावा.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
*हा मजकूर दुसर्‍या जागतिक महायुद्धापूर्वी लिहिला होता, तो तसाच राहू दिला आहे. सांप्रत देखील परिस्थिती जवळजवळ अशीच आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------