भगवान बुद्ध

गौतम बुद्धांचे चरित्र


प्रकरण एक ते बारा 99

प्राचीन काळी महाविजित नावाचा एक प्रख्यात राजा होऊन गेला. एके दिवशी एकान्तामध्ये बसला असता त्या राज्याच्या मनात असा विचार आला की, आपणापाशी पुष्कळ संपत्ति आहे तिचा महायज्ञात व्यय केला तर ते कृत्य आपणास चिरकल हितावह आणि सुखावह होईल. हा विचार त्याने आपल्या पुरोहिताला सांगितला आणि तो म्हणाला, “हे ब्राह्मणा मी महायज्ञ करू इच्छितो. तो कोणत्या प्रकारे केला असता मला हितावह आणि सुखावह होईल ते सांग.”

पुरोहित म्हणाला, “सध्या आपल्या राज्यात शांतता नाही, गावे आणि शहरे लुटली जात आहेत. वाटमारी होत आहे. अशा स्थितीत जर आपण लोकांवर कर बसविला तर कर्तव्यापासून विमुख व्हाल आपणाला असे वाटेल की, शिरच्छेद करून, तुरुंगात घालून दण्ड करून किंवा आपल्या राज्यातन हाकून देऊन चोरांचा बंदोबस्त करता येईल, परंतु या उपायांनी बंडाळीचा पूर्णपणे बंदोबस्त होणार नाही. का की, जे शिल्लक राहतील ते चोर पुन्हा बंडे उपस्थित करतील. ती साफ नाहीशी करण्याचा खरा उपाय आहे तो असा— जे आपल्या राज्यात शेती करू इच्छितात त्यांना बीबियाणे भरपूर मिळेल अशी व्यवस्था करा. जे व्यापार करू इच्छितात, त्यांना भांडवल कमी पडू देऊ नका. जे सरकारी नोकरी करू इच्छितात त्यांना योग्य वेतन देऊन यथायोग्य कार्याला लावा अशा रीतीने सर्व माणसे आपापल्या कामात दक्ष राहिल्यामुळे राज्यात बंडाळी उत्पन्न होणयाचा संभव राहणार नाही. वेळोवेळी कर वसूल होऊन तिजोरीची अभिवृद्धि होईल. बंडवाल्यांचा उपद्रव नष्ट झाल्यामुळे लोक निर्भयपणे आपले दरवाजे उघडे टाकून मुलाबाळांसकट मोठ्या आनंदाने कालक्रमणा करतील.”

पुरोहित ब्राह्मणाने सांगितलेला बंडाळीचा नाश करण्याचा उपाय महाविजित राजाला पसंत पडला. आपल्या राज्यात शेती करण्याला समर्थ लोकांना बीबियाणे पुरवून त्याने शेती करावयास लावले, जे व्यापार करण्याला समर्थ होते. त्यांना भांडवल पुरवून व्यापाराची अभिवृद्धि केली आणि जे सरकारी नोकरीला योग्य होते त्यांची सरकारी कामावर यथायोग्य स्थळी योजना केली. हा उपाय अंमलात आणल्याने महाविजिताचे राष्ट्र अल्पावकाशातच समृद्ध झाले. दरोडे आणि चोर्‍या नामशेष झाल्यामुळे कर वसूल होऊन तिजोरी वाढली. आणि लोक निर्भयपणे दरवाजे उघडे टाकून आपल्या मुलांना खेळवीत काळ कंठू लागले.
एके दिवशी महाविजित राजा पुरोहिताला म्हणाला, “भो ब्राह्मणा, तुम्ही सांगितलेल्या उपायाने माझ्या राज्यातील बंडाळी नष्ट झाली आहे. माझ्या तिजोरीची सांपत्तिक स्थिती फार चांगली असून राष्ट्रातील सर्व लोक निर्भयपणे आणि आनंदाने राहतात. आता मी महायज्ञ करू इच्छितो, त्याचे विधान मला सांगा.” पुरोहित म्हणाला, “आपणाला महायज्ञ करावयाचा असेल तर त्या कामी प्रजेची अनुमती घेतली पाहिजे. यास्तव प्रथमत: राज्यातील सर्व लोकांना जाहीर रीतीने आपली इच्छा दर्शवून त्या कामी त्यांची सम्मति मिळवा.”

राज्याच्या इच्छेला अनुसरून सर्व लोकांनी यज्ञाला अनुमति दिली. आणि तयाप्रमाणे पुरोहिताने यज्ञाची तयारी केली व तो राजाला म्हणाला, “या यज्ञात पुष्कळ संपत्ति खर्च होणार असा विचार यज्ञारंभी मनात आणू नका. यज्ञ चालला असता आपली संपत्ति नाश पावत आहे, आणि यज्ञ संपल्यावर आपली संपत्ति नाश पावली, असा विचार तुम्ही मनात आणता कामा नये, आपल्या यज्ञात बरेवाईट लोक येतील. पण त्यातील सत्पुरुषांवर दृष्टि देऊन यज्ञ करावा व आपले चित्त आनंदित ठेवावे.”

त्या महाविजिताच्या यज्ञामध्ये गाई, बैल, बकरे आणि मेंढे मारण्यात आले नाहीत. झाडे तोडून यूप करण्यात आले नाहीत; दर्भाची आसने बनविण्यात आली नाहीत; दासांना, दूताना आणि मजुरांना जबरदस्तीने कामावर लावण्यात आले नाही. ज्यांची इच्छा होती, त्यांनी कामे केली व ज्यांची नव्हती त्यांनी केली नाहीत. तूप, तेल, लोणी, मध आणि काकवी या पदार्थांनीच तो यज्ञ समाप्त करण्यात आला. तदनंतर राट्रांतील श्रीमंत लोक मोठमोठे नजराणे घेऊन महाविजित राजाच्या दर्शनाला आले. त्यांना राजा म्हणाला, “गृहस्थहो, मला तुमच्या नजराण्यांची मुळीच गरज नाही. धार्मिक कराच्या रूपाने माझ्याजवळ पुष्कळ द्रव्य साठले आहे, त्यापैकी तुम्हाला काही पाहिजे असेल तर खुशाल घेऊन जा.” याप्रमाणे राजाने या धनाढ्य लोकांचे नजराणे घेण्याचे नाकारल्यावर त्यांनी ते द्रव्य खर्चून यज्ञशाळेच्या चारी बाजूंना धर्मशाळा बांधून गोरगरिबांना दानधर्न केला.

ही भगवंताने सांगितलेली यज्ञाची गोष्ट ऐकून कूटदन्ताबरोबर आलेले ब्राह्मण उद्गारले, “फारच चांगला यज्ञ! फारच चांगला यज्ञ!”
त्यानंतर भगवंताने कूटदन्त ब्राह्मणाला आपल्या धर्माचा विस्ताराने उपदेश केला. आणि तो ऐकून कूटदन्त ब्राह्मण भगवंताचा उपासक झाला व म्हणाला, “भो गोतम, सातशे बैल, सातशे गोहरे, सातशे कालवडी, सातशे बकरे आणि सातशे मेंढे या सर्व प्राण्याना मी यूपांसून मोकळे करतो, त्यांना जीवदान देतो, ताजे गवत खाऊन आणि थंड पाणी पिऊन ते शीतल छायेत आनंदाने राहोत!”