भगवान बुद्ध

गौतम बुद्धांचे चरित्र


प्रकरण एक ते बारा 92

दश कुशल कर्मपंथांत ब्राह्मणांनी केलेला फेरफार

बरेच आढेवेढे घेऊन वैदिक ग्रन्थकाराना व निर्देशिलेल्या कुशल आणि अकुशल कर्मपंथाना मान्यता द्यावी लागली. पण त्यात त्यांनी आपल्या हक्कावर गदा येऊ नये अशी खबरदारी घेतली. मनुस्मृतीत हे दहा अकुशल कर्मपंथ कशा प्रकारे स्वीकारले आहेत ते पाहा.

स तानुवाच धर्मात्मा महर्षीन्मानवो भृगु:।
अस्य सर्वस्य शृणुत कर्मयोगस्य निर्णयम।।


‘तो मनुकुलोत्पन्न धर्मात्मा भृगु त्या महर्षींना म्हणाला, ह्या सर्व कर्मयोगाचा निर्णय ऐका.’

परद्रव्येष्वबिध्यानं मनसानिष्टचिंतनम।
वित्तथाभिनिवेशश्च त्रिविधं कर्म मानसम।।

‘परद्रव्याचा अभिलाष धरणे, दुसर्‍याचे वाईट चिंतणे आणि भलत्याच मार्गाला लागणे (नास्तिकता), ही तीन मानसिक (पापकर्मे) जाणावी.’

पारुष्यमनुतं चैव पैशुन्यं चापि सर्वश:।
असंबद्धपरलपश्च वाङयमयं स्याच्चतुर्विघम्।।

‘कठोर भाषण सत्य भाषण, सर्व प्रकारची चहाडी आणि वृथा बडबड, ही चार वाचिक पापकर्मे होत.’

अदत्तानामूपादानं हिंसा चैवाविधानत;.
परदारोपसेवा च शारीरं त्रिविधं स्मृतम्।।

‘अदततादान (चोरी), वेदविहित नसलेली हिंसा व परदारागमन, ही ती कायिक पापकर्मे होत.’

त्रिविधं च शरीरेण वाचा चैव चतुर्विधम्।
मनसा त्रिविधं कर्म दश कर्मपथास्त्जेत्।।

‘(याप्रमाणे) त्रिविध, कायिक, चतुर्विध वाचसिक आणि त्रिविध मानसिक असे दहा (अकुशल) कर्मपथ त्यजावे.’ (नु. १२।५।९)
यापैकी पहिल्या श्लोकात ‘कर्मयोग’ हा शब्द फार उपयुक्त आहे. मनुस्मृतीच्या कर्त्याला बुद्धाने उपदेशिलेला कर्मयोग पसंत होत खरा, तरी त्याने त्यात एक अपवाद ठेवून दिला. तो हा की, हिंसा वेदविहित नसली तरच ती करावयाची नाही, वेदाच्या आधारे केलेली हिंसा, हिंसा नव्हे.

युद्ध धार्मिक ठरल्याने अकुशल कर्मपथ उपयुक्त ठरले


यज्ञयागातील हिंसा त्याज्ज मानिली असती तर यज्ञयाग करण्याचे कारणच राहिले नसते. आणि ते यज्ञयाग कशासाठी होते? तर युद्धात जय मिळावा व जय मिळाल्यानंतर मिळविलेले राज्य चिरस्थायी व्हावे म्हणून अर्थात युद्धातील हिंसा धार्मिक गणण्यात आली नसती, तर वैदिक हिंसेचे कारणच राहिल नसते, आणि म्हणूनच युद्धाला पावित्र्य देणे भाग पडले.

श्रीकृष्ण म्हणतात—

स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकंपितुमहंसि।
धर्म्याद्धि युद्धोच्छेयोन्यत्क्षत्रियन्य न विद्यते।।

‘आणि स्वधर्माचा विचार करून देखील माघार घेणे तुला योग्य होणार नाही. क्षत्रियांना धर्म्य युद्धापेक्षा अधिक श्रेयस्कर असे दुसरे काही नाही.’

यदृच्छ्या चोपपन्नं स्वर्गद्वारपमावृतम।
सुखिन: क्षत्रिया: पार्थ लभन्ते युद्धमीदृशम्।।


‘आणि हे पार्था, सहज दैवगत्या उघडलेले स्वर्गाचे द्वार असे हे युद्ध भाग्यवान क्षत्रियांना लाभते.’

अथ येत्त्वमिमं धर्म्य संग्रामं न करिष्यासि।
तत्त्: स्वधर्म कीर्ति च हित्वा पापमाप्स्यसि।।

‘आणि जर हा धार्मिक संग्राम तू करणार नाहीस तर स्वधर्म आणि कीर्ति गमावून पाप पावशील. (गीता, अ. २।३१-३३)

युद्ध धार्मिक ठरल्याने सर्व अकुशल कर्मपथ धार्मिक होणे साहजिक होते. म्हणजे युद्धावाचून इतर ठिकाणी हिंसा करू नये, युद्धावाचून लूटफाट करू नये युद्धावाचून व्यभिचार करू नये, त्याचप्रमाणे सत्य भाषण, चहाडी, कर्कश वचन हे युद्धाला उपयोगी असल्याशिवाय म्हणजे राजकारणावाचून योगात आणू नये. परद्रव्याचा लोभ तर युद्धात फारच उपयोगी आहे. आपल्या सैन्यात परक्यांविषयी द्वेष फैलावल्याशिवाय सैनिक युद्धाला तयार व्हावयाचेच नाहीत आणि आपण स्वधर्मासाठी, स्वराष्ट्रासाठी, किंवा अशाच कोणत्या तरी कल्पनिक पवित्र कार्यासाठी भांडत आहोत अशी तीव्र मिथ्यादृष्टि उत्पन्न झाल्याशिवाय युद्धात जय मिळणे शक्य नाही. तात्पर्य, एका युद्धासाठी सगळ्या कुशल कर्मावर पाणी सोडणे पवित्र ठरते! अस्वत्थामा मेला असे स्पष्ट खोटे बोलण्यास युधिष्ठिर तयार नव्हता. तेव्हा त्याला श्रीकृष्णाने ‘नरो वा कुंजरो वा’ (माणूस किंवा हत्ती मेला) असे म्हणावयास लावले. आजकालचे राजकारण अशाच प्रकारचे असते, अर्धवट खरे आणि अर्धवट खोटे आणि आपल्या देशाचे घोडे पुढे घालता आले तर कोणतेही अकुशल कर्म अत्यंत पवित्र ठरू शकते! धार्मिक युद्धाचा विकास जैन आणि बौद्ध धर्माच्या प्रभावाने वैदिक हिंसा बंद पडली. पण क्षत्रियाक्षत्रियातील धार्मिक युद्ध या देशात कायम राहिले; त्यांच्या भाऊबंदकीला उत्तेजन मिळाले. तशा धार्मिक युद्धाचा विकास महंमद पैगंबराने केला. आपसात युद्ध करणे योग्य नसून इतर संप्रदायाच्या लोकांवर जिहाद (युद्ध) पुकारणे अत्यंत धार्मिक आहे, असे त्याने प्रतिपादिले. त्याची प्रतिक्रिया ख्रिस्ती धर्मयुद्धांनी (क्रुसेडनसनी) घडून आली, आणि त्या सर्वांचा लोप देशाभिमानाने केला. आज तो अभिमान अत्यंत धार्मिक समजला जातो. त्याच्यासाठी कोणतेही कुकर्म करणे योग्य ठरते. पण त्यामुळेच सर्व मनुष्यजाति विषम मार्गात सापडली आहे. त्यातून बाहेर निघण्याला बुद्धाच्या कर्मयोगाशिवाय दुसरा मार्ग असू शकेल काय?