भगवान बुद्ध

गौतम बुद्धांचे चरित्र


प्रकरण एक ते बारा 89

“मी एकटाच नव्हे, तर यच्चयावत प्राणी जराधर्मी, व्याधिधर्मी, मरणधर्मी आहेत. त्या सर्वांना प्रियाचा वियोग घडतो आणि ते देखील कर्मदायाद आहेत. असा आर्यश्रावक सतत विचार करतो तेव्हा त्याला मार्ग सापडतो. त्या मार्गाच्या अभ्यासाने त्याची संयोजने नष्ट होतात.”

ह्या उतार्‍यात कर्मस्वकीय म्हणजे कर्मच काय ते माझे स्वकीय आहे. बाकी सर्व वस्तुजात माझ्यापासून कधी विभक्त होईल याचा नेम नाही. मी कर्माचा दायाद आहे, म्हणजे बरी कर्मे केली तर मला सुख मिळेल, वाईट केली तर दु:ख भोगावे लागेल; कर्मयोनि म्हणजे कर्मामुळेच माझा जन्म झाला आहे. कर्मबंधू म्हणजे संकटात माझे कर्मच माझे बांधव आणि कर्मप्रतिशरण म्हणजे कर्मच माझे रक्षण करू शकेल. ह्यावरून बुद्ध भगवंताने कर्मावर किती जोर दिला आहे, हे चांगले समजून येईल. अशा गुरूला नस्तिक म्हणमे कसे योग्य होईल?

सत्कर्मे उत्साहित मनाने करावी, यासंबंधाने धम्मपदाची खालील गाथा देखील विचार करण्याजोगी आहे.

अभित्थरेथ कल्यामे पापा चित्तं नवारये।
दन्धं हि करोतो पुञ्ञं पापम्मिं रमतो मनो।।

‘कल्याणकर्मे करण्यात त्वरा करावी आणि पापापासून चित्त निवारावे. कारण आळसाने पुण्यकर्म करणार्‍याचे मन पापात रमते.’

ब्राह्मणांचा कर्मयोग

एथवर बुद्धाच्या कर्मयोगाचा विचार झाला. आता त्या काळच्या ब्राह्मणांत कोणत्या प्रकारचा कर्मयोग चालू होता. याचा थोडक्यात विचार करणे इष्ट आहे. ब्राह्मणांचे उपजीविकेचे साधन म्हटले म्हणजे यज्ञयाग असत. आणि ते विधिपूर्वक करणे यालाच ब्राह्मण आपला कर्मयोग मानीत. त्यानंतर क्षत्रियांनी युद्ध, वैश्यांनी व्यापार आणि शुद्रांनी सेवा करावी हे त्याचे कर्मयोग होत, असे ते प्रतिपादीत. त्यात एखाद्याला कंटाळा आला तर त्याने सर्वसंगपरित्याग करून रानावनात जे व तपश्चर्या करावी याला संन्यासयोग म्हणत. त्यात त्याच्या कर्मयोगाचा अन्त होत असे. काही ब्राह्मण संन्यास घेऊन देखील अग्निहोत्रादिक कर्मयोग आचरीत असत आणि त्यालाच श्रेष्ठ समजत यासंबंधाने भगवदगीतेत म्हटले आहे –

यज्ञार्थात्कर्मणोन्यत्र लोकोयं कर्मबंधन:।
तदर्थ कर्म कौतेय मुक्तसंग: समाचर।।

‘यज्ञाकरिता केलेल्या कर्माहून इतर कर्म लोकांना बंधनकारक होते. म्हणून हे कौतेया संग सोडून यज्ञासाठी तू कर्म कर.’

सहयज्ञा: प्रजा: सृष्टवा पुरोवाच प्रजपति:।
अनेक रसयिष्यध्वमेष बोस्त्विष्टकामदुक।।

‘पूर्वी (सृष्टीच्या आरंभी) यज्ञासह प्रजा उतपन्न करून ब्रह्मदेव म्हणाला, “तुम्ही या यज्ञाच्या योगाने वृद्धि पावाल, ही तुमची इष्ट कामधेनु होवो.” आणि म्हणून,

एवं प्रवर्तितं चक्रं सानुवर्तयतीह य:।
आधायुरिंद्रियारामो मोघं पार्थ स जीवति।।

‘याप्रमाणे हे सुरू केलेले (यज्ञयागाचे) चक्र या जगात जो चालवीत नाही, त्याचे आयुष्य पापरूप असून तो इंद्रियपट व्यंर्थ जगतो.”