भगवान बुद्ध

गौतम बुद्धांचे चरित्र


प्रकरण एक ते बारा 86

नास्तिकतेचा आरोप

या सुत्तात बुद्धावर मुख्य आरोप अक्रियावादाचा केलेला आहे. तो खुद्द महावीर स्वामींनी केला असेल किंवा नसेल. तथापि त्या वेळी अशा प्रकारचा आरोप बुद्धावर करण्यात येत असे, यात शंका नाही. गोतम क्षत्रिय कुलात जन्मला. शाक्य क्षत्रियांचे शेजारी आणि आप्त कोलिय क्षत्रिय. या दोघांमध्ये रोहिणी नदीच्या पाण्यासंबंधाने वारंवार मारामार्‍या होत. हे मागे सांगितलेच आहे. (पृ. ६३ पाहा) दुसर्‍या एकाद्या टोळीने आपल्या टोळीतील माणसाचे नुकसान केले किंवा खून केला, तर त्याचा मोबदला त्या टोळीतील माणसाचे नुकसान करून किंवा खून करून घेण्याची पद्धति आजला सरहद्दीवरील पठाण लोकात चालू आहे; तशीच ती

प्राचीन काळी हिंदुस्थानातील क्षत्रियांत असली तर त्यात आश्चर्य मानण्याजोगे काही नाही. खरे आश्चर्य हे की, या क्षत्रियांच्या एका टोळीत जन्मलेल्या गोतमाने आपल्या शेजार्‍यांचा आणि आप्तांचा सूड उगवणे साफ नाकारले, आणि एकदम तपस्वी लोकांत प्रवेश केला.

गृहस्थाश्रमाचा कंटाळा आला, तर त्या काळचे ब्राह्मण आणि क्षत्रिय गृहत्याग करून परिव्राजक बनत, आणि खडतर तपश्चर्या करीत तेव्हा गोतम तपस्वी झाला. यात कोणालाही विशेष वाटले नसावे. फार झाले तर हा तरुण गृहस्थ स्वाश्रयाला निरुपयोगी ठरला, असे लोकांनी म्हटले असेल. पण जेव्हा सात वर्षे तपश्चर्या करून गोतम बोधिसत्व बुद्ध झाला. आणि गृहस्थामातील चैनीचा व संन्यासाश्रमातील तपश्चर्येचा सारखाच निषेध करू लागला तेव्हा त्याच्यावर टीका होऊ लागल्या.

ब्राह्मणांना चालू समाजपद्धति पाहिजे होती. त्यांचा कर्मयोग म्हटला म्हणजे ब्राह्मणांनी यज्ञायाग करावे, क्षत्रियांनी युद्ध करावे, वैश्यांनी व्यापार आणि शुद्रांनी सेवा करावी. हा कर्मयोग ज्याला पसंत नसेल त्याने अरण्यवास पत्करून तपश्चर्येच्या योगाने आत्मबोध करून घ्यावा, आणि मरून जावे; समाजाची घडी बिघडेल असे कोणतेही कृत्य करू नये.

निरनिराळ्या श्रमणसंघात भिन्न भिन्न तत्त्वज्ञाने प्रतिपादिली जात असत, तथापि तपश्चर्येच्या संबंधाने त्यापैकी अधिकतर श्रमणांची एकवाक्यता होती. यात निर्ग्रनथांनी कर्माला विशेष महत्त्व दिले. हा जन्म दु:खकारक आहे आणि तो पूर्वजन्मीच्या पापकर्मानी आला असल्यामुळे ती पापे नष्ट करण्यासाठी खडतर तपश्चर्या केली पाहिजे, असे त्यांचे पुढारी प्रतिपादीत आणि बुद्ध तर तपश्चर्येचा निषेध करणारा. तेव्हा त्याला निर्ग्रन्थानी अक्रियवादी (अकर्मवादी) म्हणणे अगदी साहजिक होते. ब्राह्मणांच्या दृष्टीने बुद्धाने शस्त्रत्याग केला, म्हणून तो अक्रियवादी ठरतो तर तपस्व्यांच्या दृष्टीने तपश्चर्या सोडली म्हणून अक्रियवादी ठरतो!

क्रान्तिकारक तत्त्वज्ञान

येथे हे लक्षात ठेवले पाहिजे की, गोतमाने गृहत्याग केला तो केवळ आत्मबोध करून घेऊन मोक्ष मिळविण्यासाठी नव्हे. आपल्या शेजार्‍यांवर शस्त्र उगारणे त्याला योग्य वाटले नाही. शस्त्रावाचून परस्परंच्या सलोख्याने चालणारी अशी एक समाजरचना करता येईल की, काय यासंबंधाने त्याच्या मनात सतत विचार चालू होते. तपश्चर्येने आणि तपस्वी लोकांच्या तत्त्वज्ञानाने मनुष्यजातीसाठी असा एखादा सरळ मार्ग काढता येईल असे वाटल्यामुळेच त्याने गृहत्याग करून तपश्चर्या आरंभिली. आणि तिच्या योगे काही निष्पन्न होत नाही असे जाणून त्याने ती सोडून दिली, व एक नवीन अभिनव मध्यम मार्ग शोधून काढला.

आजकालच्या क्रांतिकारी लोकांना राजकारणी आणि धार्मिक लोक असे विनाशक (nihilist) वगैरे विशेषणे लावतात, आणि त्यांचा अडाणीपणा समाजासमोर मांडतात. त्याप्रमाणे बुद्धाला तत्समकालीन टीकाकार, अक्रियवादी म्हणत, आणि त्याच्या नवीन तत्त्वज्ञानाची निरर्थकता लोकांपुढे मांडीत, असे समजण्यास हरकत नाही.