भगवान बुद्ध

गौतम बुद्धांचे चरित्र


प्रकरण एक ते बारा 84

प्रजापतीची उत्पत्ति

प्रजापति म्हणजे जगत्कर्ता ब्रह्मा, त्याची उत्पत्ति बृहदारण्यकात सांगितली आहे, ती येणेप्रमाणे :--
आप एवेदमग्न आसुस्त: आप. सत्यमसृदन्त सत्यं ब्रह्म, ब्रह्म प्रजापति, प्रजापतिदेवास्ते देवा: सत्यमेव पासते।। (५।५।१)

‘सर्वांपूर्वी पाणी तेवढे होते. त्या पाण्याने सत्य, सत्याने ब्रह्मा, ब्रह्माने प्रजापती व प्रजापतीने देव उत्पन्न केले, ते देव सत्याचीच उपासना करतात.’

बायबलात देखील जलप्रलयानंतर सृष्टीची उत्पत्ति पुनरपि झाल्याची कथा आहे. पण देवाने आगाऊच मोहाचे कुटुंब  पशुपक्षदिकांच्या नर व माद्य जहाजात भरून ठेवावयास लावल्या आणि मग जलप्रलय केला.* उपनिषदात जलप्रलयापूर्वी काय होते ते मुळीच सांगितले नाही. एवढेच नाही तर सत्य ब्रह्मदेवाच्या आणि ब्रह्मतत्त्वाच्या देखील वरच्या पायरीवर ठेवले आहे. ब्रह्मजालसुत्तात दिलेली ब्रह्मोत्पत्तीची कथा या कथेशी निकटतर आहे.

ईश्वर जगापासून भिन्न असून त्याने जग निर्माण केले, ही कल्पना हिंदुस्थानात शकांनी आणली असावी. का की, त्यापूर्वीच्या वाङमयात तो तशा रूपाने आढळत नाही. तेव्हा बुद्ध ईश्वर मानीत नसल्यामुळे नास्तिक होता, असा त्याच्यावर आळ आणणे संभवनीय नव्हते. तो वेदनिदक असल्यामुळे नास्तिक आहे, असा ब्राह्मण आरोप करीत, पण बुद्धाने वेदाची निंदा केलेली कोठे आढळत नाही आणि ब्राह्मणांना मान्य झालेल्या संख्यकारिकेसारख्या ग्रन्थात वेदनिंदा काय कमी आहे?

दृष्टवदानुश्रविक: स ह्यविशुद्विश्रक्षयातिशयकुत्:

‘दृष्ट उपायाप्रमाणेच वैदिक उपाय देखील (निरुपयोगी) आहे. कारण तो अवशुद्धि, नाश आणि अतिशय यांनी युक्त आहे.’
आणि ‘त्रैगुण्यविषया वेदा:’ इत्यादिक वेदनिंदा भगवतगीतेत सापडत नाही काय? पण साख्याने ब्राह्मणांच्या जातिभेदावर हल्ला केला नाही, आणि भगवदगीतेने तर त्या जातिभेदाला उघड उघड उचलून धरले आहे. तेव्हा त्यांना वेदनिंदा पचणे शक्य होते.
याच्या उलट बुद्धाने वेदनिंदा केली नसली तरी जातिभेदावर जोराचा हल्ला केला, मग ती वेदनिंदक कसा ठरणार नाही? वेद म्हणजे जातिभेद आणि जातिभेद म्हणजे वेद, असे या दोहोंचे ऐक्य आहे! जातिभेद नसला तर वेद राहील कसा? आणि जातिभेद अस्तित्वात राहून वेदाचे एक अक्षरसुद्धा कोणाला माहीत नसले तरी वेदप्रामाण्यबुद्धि कयम असल्यामुळे वेद राहिलाच म्हणावयाचा!

बुद्धसमकालीन श्रमणब्राह्मणांत ईश्वरवादाला मुळीच महत्त्व नव्हते. हे वरील विवेचनवरून दिसून येईलच. त्यापैकी काही ईश्वरच्या जागी कर्माला मानीत आणि कधी कधी बुद्ध कर्मवादी नाही, अतएव नास्तिक आहे, असा बुद्धावर आरोप करीत त्याचे निरसन पुढील प्रकरणात करण्यात येईल.