भगवान बुद्ध

गौतम बुद्धांचे चरित्र


प्रकरण एक ते बारा 76

उच्छेदवाद

अजित केसकम्बल उच्छेदवादी होता. तो म्हणे, “दान, यज्ञ, होम यात काही नाही, चांगल्या वाईट कर्माचे फळ व परिणाम नाही: उहलोक, परलोक, मातपिता अथवा औपपातिक (देव किंवा नरकवासी) प्राणी नाहीत; इहलोक आणि परलोक जाणून नीट ओळखून दुसर्‍यास शिकवणारे तत्त्वज्ञ  योग्य मार्गाने जाणारे श्रमण-ब्राह्मण या जगात नाहीत. मनुष्य चार भुतांचा बनलेला आहे. तो मरतो तेव्हा त्यातील पृथ्वीधातू पृथ्वीवत, आपोधातू जलात, तेजोधातु तेजात व वायुधातु वायूत जाऊन मिळतो. आणि इंद्रिये आकाशाप्रत जातात. मेलेल्या माणसाला तिरडीवर घालून चार पुरुष स्मशानात नेतात. त्याच्या गुणावगुणांची चर्चा होते, पण अस्थि पांढर्‍या होऊन आहुति भस्मरूप होतात. दानांचे खुळ मूर्ख माणसांनी माजविले आहे. जे कोणी आस्तिकवाद सांगतात त्यांचे तो बोलणे निव्वळ खोटे आणि वृथा बडबड आहे. शरीरभेदानंतर शहाण्यांचा आणि मूर्खांचा उच्छेद होतो, ते विनाश पावतात. मरणानंतर त्यांचे काहीही उरत नाही.”

अन्योन्यवाद


पकुध कच्चायन अन्योन्यवादी होता. तो म्हणे “सात पदार्थ कोणी केलेले, करविलेले, निर्मिलेले किंवा निर्माण करविलेले नसून वन्ध्य, कूटस्थ व नगरद्वारावरील स्तंभाप्रमाणे* (*नगरद्वारावर हत्तीला सरळ हल्ला करता येऊ नये, म्हणून त्याच्या समोर एक बळकट खांब बांधीत, त्याला पालि भाषेत एसिका किंवा इन्दखील म्हणतात.) अचल आहेत. ते हालत नाहीत, बदलत नाहीत. परस्परांना बाधत नाहीत, परस्परांचे सुखदु:ख उत्पन्न करण्यास असमर्थ आहेत ते कोणते? तर पृथ्वी, आप, जल, वायु, सुख, दु:ख व जीव हे होत. यांना मारणारा, मारविणारा, ऐकणारा, सांगणारा, जाणणारा अथवा यांचे वर्णन करणारा कोणीही नाही. जो तीक्ष्ण  शस्त्राने एखाद्याचे डोके कापतो. तो त्याचा जीव घेत नाही. या सात पदार्थांच्या मधल्या अवकाशात शस्त्र शिरले एवढेच काय ते समजावे.”

विक्षेपवाद

संजय बेलट्ठपुत्त विक्षेपवादी होता. तो म्हणे, “परलोक आहे काय, असे मला विचारले, आणि तसे मला वाटत असले तर मी परलोक आहे असे म्हणेन. परंतु तसे मला वाटत नाही. परलोक नाही, असे देखील वाटत नाही. औपपातिक प्राणी आहेत किंवा नाहीत, चांगल्या वाईट कर्माचे फळ असते किंवा नसते. तथागत मरणानंतर राहतो किंवा राहत नाही. यापैकी काही देखील मला वाटत नाही.”* (सामज्यफलसुत्तात निगष्ट नाथपुत्ताचा चातुर्यामसंवरवाद विक्षेपवादापूर्वी घातला आहे, परंतु मज्झिमनिकायातील चुळसारोपम सुत्ता व इतर अनेक सुत्ता नाथसुत्तांचे नाव शेवटी येते.)

चातुर्यामसंवरवाद

निगष्ट नाथपुत्त चातुर्यामासंवरवादी होता. या चार यामांची जी माहिती सामञ्ञफलसुत्ता सापडते ती अपुरी आहे. जैन ग्रंथावरून असे दिसून येते की, अहिंसा, सत्य, अस्तेय आणि अपरिग्रह हे चार याम पार्श्वमुनीने उपदेशिले. त्यात ब्रह्मचर्याची महावीर स्वामीने भर घातली. तथापि बुद्धसमकालीन निग्रंथात (जैन लोकात) वरील चार यामांचीच महती होती. चार यामाच्या व तपश्चर्येच्या योगाने पूर्वजन्मी केलेल्या पातकाचे निरसन करून कैवल्य मोक्ष) मिळवावे हा जैनधर्माचा मथितार्थ होता.

अक्रियवाद व सांख्यमत


पूरण काश्यपाचा अक्रियवाद सांख्य तत्त्वज्ञानासारखा दिसतो. आत्मा प्रकृतीपासून भिन्न आहे आणि मारणे, मारविणे इत्यादि कृत्यांचा परिणाम त्याच्यावर होत नसतो, असे सांख्य मानतात. याचाच प्रतिध्वनि भगवदगीतेत निरनिराळ्या ठिकाणी उमटला आहे.

प्रकृते: क्रियमाणानि गुणै: कर्माणि सर्वश:।
अहंकारविमूढात्मा कर्ताहमिति मन्यते।

प्रकृतीच्या गुणांनी सर्व कर्मे केली जात असता अहंकाराने मोहित झालेला आत्मा मी कर्ता आहे, असे मानतो. (अ. ३, श्लो. २७)

य एनं वेत्ति हन्तारं यश्चैन मन्यते हतम्।
उभी तो न विजानीची नायं हन्ति न हन्यते।।

हा (आत्मा) मारणारा आहे असे जो मानतो किंवा हा मारला जातो असे जो समजतो, त्या दोघांनाही सत्य समजले नाही. कारण हा मारीत नाही किंवा कोणाकडून मारला जात नाही. (अ. २, स्लो. २१).

यस्य नाहंकृतो भावी बुद्धिर्यस्य न लिप्यते।
हत्वापि स इमौल्लोकान्न हन्ति न निवध्यते।

ज्याला अहंभाव नाही, ज्याची बुद्धि (त्यापासून) अलिप्त राहते, त्याने या लोकांना मारले, तरी तो त्यांना मारीत नाही; त्यात बद्ध होत नाही. (अ. १८, श्लो. १७).