भगवान बुद्ध

गौतम बुद्धांचे चरित्र


प्रकरण एक ते बारा 75

प्रकरण सातवे

आत्मवाद
आत्मवादी श्रमण


निवापसुत्तात बुद्धसमकालीन श्रमण ब्राह्मणाचे स्थूल मानाने चार वर्ग करण्यात आले आहेत. त्यात पहिला वर्ग यज्ञयाग करून सोम पिणार्‍या ब्राह्मणांचा. अशा चैनीनेच मोक्ष मिळतो, ही त्यांचे मति. यज्ञयागाला आणि सोमपानाला कंटाळून जे अरण्यात शिरले, आणि खडतर तपश्चर्या करू लागले  ऋषिमुनी दुसर्‍या वर्गात येतात. ते चिरकाल अरण्यात टिकू शकले नाहीत. पुन्हा प्रपंचात आले आणि चैनीत सुख मानू लागले, पराशर, ऋष्यशूज्ञ वगैरे ऋषींची उदाहरणे आहेतच. तिसरे श्रमणब्राह्मण म्हटले म्हणजे गावाच्या आसपास राहून मित भोज करणारे श्रमण, पण ते आत्मवादात शिकले. कोणी आत्मा शाश्वत, तर की आत्मा अशाश्वत, अशा वादात पडल्यामुळे ते देखील माराच्या जाळ्यात सापडले. बुद्ध भगवंताने हा आत्मवाद सोडून दिला आणि आपले तत्त्वज्ञान सत्याच्या पायावर उभारले. त्यामुळे त्याचे श्रावक माराच्या जाळ्यात सापडले नाहीत म्हणून त्यांचा समावेश चौथ्या श्रमणब्राह्मणांत केला आहे.

बुद्ध भगवंताने हा आत्मवाद का सोडून दिला याचा विचार करण्यापूर्वी तत्समकालीन श्रमणब्राह्मणांचे आत्मवाद कसा प्रकारचे होते हे पाहिले पाहिजे. त्या काळी एकंदरीत ६२ श्रमणपंथ होते, हे तिसर्‍या प्रकरणात सांगितलेच आहे. त्यातला कोणताही पंथ आत्मवादापासून मुक्त नव्हता. पण त्या सर्वांचे तत्त्वज्ञान आज उपलब्ध नाही. यापैकी जे सहा मोठे संघ होते त्यांच्या तत्त्वज्ञानाचा बराच अंश पालि वाङमयात शिल्लक राहिला आहे; आणि त्यावरून इतर श्रमणब्राह्मणांच्या आत्मवादाचे अनुमान करता येणे शक्य हे. वास्तव प्रथमत: त्यांच्या तत्त्वज्ञानाचा विचार करणे योग्य वाटते.

अक्रियवाद

या सहांपैकी पहिला पूरण कस्सप अक्रियवादाचा पुरस्कर्ता होता. तो म्हणे, “एखाद्याने काही केले किंवा करविले, कापले किंवा कापविले, कष्ट दिले किंवा देवविले, शोक केला  किंवा करवला, एखाद्यास त्रास झाला अथवा दिला, भय वाटले किंवा त्याने दुसर्‍यास भय दाखविले, प्राण्यास ठार मारले, चोरी केली, घरफोडी केली, दरवडा घातला, एकाच घरावर घाला घातला, वाटमारी केली, परद्वारागमन केले किंवा अगत्य भाषण केले, तरी त्यास पाप लागत नाही. तीक्ष्ण धारेच्या चक्राने एकाद्याने जरी या पृथ्वीवरील प्राण्यांच्या मासाची एक रास केली, एक ढीग केला, तरी त्यात मुळीच पाप नाही. त्यापासून काहीही दोष नाही. गंगा नदीच्या दक्षिण तीरावर अजून जरी एखाद्याने हाणमार केली. कापले, कापविले, त्रास दिला अथवा देवविला, तरी त्यात मुळीच पाप नाही. गंगा नदीच्या उत्तर तीरावर जाऊन जरी एखाद्याने दाने दिली व देवविली, यज्ञ केले अथवा करविले. तरी त्यापासून मुळीच पुण्य लागत नाही. दान, धर्म, संयम, सत्यभाषण यांच्यामुळे पुण्य प्राप्त होत नाही.”

नियतिवाद

मक्खलि गोसाल संसारशुद्धिवादी किंवा नियतीवादी होता. तो म्हण, “प्राण्यांच्या अपवित्रतेस काही हेतु नाही, काही कारण नाही. हेतूशिवाय कारणाशिवाय प्राणी अपवित्र होतात. प्राण्याच्या शुद्धीला काही हेतु नाही. काही कारण नाही. हेतूवाचून, कारणावाचून प्राणी शुद्ध होतात. स्वत:च्या सामर्थ्याने काही होत नाही. दुसर्‍याच्या सामर्थ्याने काही होत नाही. पुरुषाच्या सामर्थ्याने काही होत नाही. बल नाही, वीर्य नाही, पुरुषशक्ति नाही, पुरुषपराक्रम नाही, सर्व सत्त्व, सर्व प्राणी, सर्व भुते, सर्व जीव अवश, दुर्बल  निर्वीर्य आहे. ते नियति (नशीब), संगति व स्वभाव यांच्या योगाने परिणत होतात, आणि सहांपैकी कोणत्या तरी एका जातीत (वर्गात) राहून सुखदु:खाचा उपभोग घेतात. शहाणे व मूर्ख दोघेही चौर्‍यांशी लक्ष महकर्त्याच्या फेर्‍यांतून गेल्यावर त्यांच्या दु:खाचा नाश होतो. या शीलाने, व्रताने, तपाने अथवा ब्रह्मश्चर्याने मी अपरिपक्व कर्म पक्व करीन, किंवा परिपक्व झालेल्या कर्माची फळे भोगून ते नष्ट करून टाकीन, असे जर एखाद्या म्हणाला, तर ते त्याच्याकडून व्हावयाचे नाही. या संसारात सुखदु:खे परिमित द्रोणांनी (मापांनी) मोजता येण्यासारखी ठराविक आहे. तो कमीजास्ती किंवा अधिकउणी करता येणार नाहीत. ज्याप्रमाणे सुताची गुंडी फेकली असता ती समय उलगडेपर्यंत जाईल, त्याप्रमाणे शहाणे व मूर्ख (संसाराच्या) समग्र फेर्‍यांतून गेल्यावरच त्याच्या दु:खाचा नाश होईल.”