भगवान बुद्ध

गौतम बुद्धांचे चरित्र


प्रकरण एक ते बारा 72

श्रामणेरसंस्थेची वाढ

श्रामणेराची संस्था भगवंताच्या परिनिर्वाणानंतर वृद्धिंगत होत गेली आणि होता होता लहानपणी श्रामणेर होऊन भिक्षु होणार्‍यांचीच संख्या फार मोठी झाली. त्यामुळे संघात अनेक दोष शिरले. खुद्ध भगवान बुद्ध आणि त्याचा भिक्षुसंघ यांना प्रपंचाचा अनुभव चांगला होता आणि पुन्हा प्रपंचाकडे त्यांचे मन धावणे शक्य नव्हते. पण लहनपणीच संन्यासदीक्षा देऊन प्रपंचातून ज्यांना बाहेर काढले, त्यांचा ओढा संसाराकडे जाणे साहजिकच होते. पण रूढि त्यांच्या आड येऊ लागली आणि त्यांच्या हातून मानसिक दोष पुष्कळ घडू लागले. संघाच्या नाशाला जी अनेक कारणे झाली त्यापैकी हे एक प्रमुख कारण समजले पाहिजे.

श्रामणेरांच्या धर्तीवरच श्रामणेरीची संस्था उभारली गेली होती. श्रामणेर भिक्षूंच्या आणि श्रामणेरी भिक्षूंच्या आश्रयाने राहात हाच काय तो फरक.

श्रावकसंघाचे चार विभाग

परंतु संघाच्या चार विभागात श्रामणेरांची आणि श्रामणेरांची गणना केलेली नाही. त्यामुळे भगवंताच्या हयातीत त्यांना मुळीच महत्त्व नव्हते, असे समजले पाहिजे. भिक्षु, भिक्षुणी, उपासक आणि उपासिका हेच काय ते बुद्धाच्या श्रावकसंघाचे विभाग आहेत.

भिक्षुसंघाची कमिगरी फार मोठी होती, यात शंका नाही. तथापि, भिक्षुणी, उपासक आणि उपासिका यांनी देखील संघाच्या अभ्युन्नतीत पुष्कळ भर घातल्याचे अनेक दाखले त्रिपिटक वाङमयात सापडतात.

स्त्रियांचा दर्जा

बुद्धाच्या धर्ममार्गात स्त्रियांचा दर्जा पुरुषाएवढा होता, हे सीमा भिक्षुणीच्या माराबरोबर झालेल्या खालील संवादावरून दिसून येईल.

दुपारच्या प्रहरी सीमा भिक्षुणी श्रावस्तीजवळच्या अंधवनात ध्यान करण्यासाठी बसली, तेव्हा मार तिजपाशी येऊन म्हणाला,

यन्तं इसीहि पत्तब्बं ठानं दुरभिसंभवं।
न तं द्वंगुलपञ्ञाय सक्का पप्पोतुमित्थिया।।

‘जे (निर्वाण) स्थान ऋषींना मिळणे कठीण, ते (भात शिजला असता तपासून पाहण्याची) दोन बोटांची जिची प्रज्ञा, त्या स्त्रीला मिळणे शक्य नाही.’ सोम भिक्षुणी म्हणाली,

इत्थिबावो कि कयिरा चित्तम्हि समुमाहिते।
आणम्हि वत्तमानम्हि सम्मा धम्मं विपस्सतो।।
यस्स नून सिया एवं इत्थाहं पुरिसो ति वा।
किञ्चि वा पन अस्मीति तं मारो वततुमरहति।।*

‘चित्त उत्तम प्रकारे समाधान पावले असता आणि ज्ञानलाभ झाला असता सम्यकपणे धर्म जाणणार्‍या व्यक्तीला (निर्वाण मार्गात) स्त्रीत्व कसे आड येणार? ज्या कोणाला मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, किंवा मी कोणी तरी हे, असा अहंकार+ असेल, त्याला माराने या गोष्टी सांगाव्या!’

आपणाला सोमा भिक्षुणीने ओळखले, असे जाणून मार दु:खित अन्त:करणाने तेथेच अन्तर्धान पावला.
हा संवाद काव्यमय आहे. तथापि, त्यावरून बौद्ध संघात स्त्रियांचा दर्जा कसा असे, हे स्पष्ट होते.