भगवान बुद्ध

गौतम बुद्धांचे चरित्र


प्रकरण एक ते बारा 71

राहुलाला श्रामणेर कशा प्रकारे करण्यात आले, ह्याचे अनुमान सुत्तानिपातातील राहुलसुत्तावरून करता येण्याजोगे आहे, म्हणून त्या सुत्ताचे भाषांतर येथे देतो.

(भगवान-) (१) सतत परिचयाने तू पंडिताची अवज्ञा करीत नाहीस ना? मनुष्यांना ज्ञानप्रद्योत दाखवणार्‍याची (त्याची) तू योग्य सेवा करतोस काय?
(राहुल-) (२) मी सतत परिचयामुळे पंडिताची अवज्ञा करीत नाही. मनुष्यांना ज्ञानप्रद्योत दाखवणार्‍यांची मी संदोदित योग्य सेवा करतो.
(ह्या प्रास्ताविक गाथा होत.)
(भगवान-) (३) प्रिय वाटणारे मनोरम (पंचेदन्द्रियाचे) पाच कामोपभोग सोडून श्रद्धापूर्वक घरातून बाहेर नीघ आणि दु:खाचा अन्त करणारा हो.
(४) कल्याण मित्रांची संगति धर. येथे फारशी गडबड नाही अशा एकांत स्थळी तुझे वसतिस्थान असू दे, आणि मितहारी हो.
(५) चीवर (श्वस्त्र), पिण्डपात (अन्न), औषधि पदार्थ आणि राहण्याची जागा, यांची तृष्णा धरू नकोस, आणि पुनर्जन्म घेऊ नकोस.
(६) विनयाच्या नियमांत आणि पंचेन्द्रियांत संयम ठेव; कायग्रता स्मृति असू दे; आणि वैराग्यपूर्ण हो.
(७) कामविकाराने मिश्रित असे विषयांचे शुभ निमित्त सोडून दे व एकाग्रता आणि समाधि प्राप्त करून देणार्‍या अशुभ निमित्ताची भावना* कर.
(८) आणि अनिमुत्ताची (निर्वाणाची) भावना कर व अहंकार सोड. अहंकाराचा नाश केल्यावर तू शांतपणे राहशील.

याप्रमाणे भगवान ह्या गाथांनी राहुलाला पुन: पुन: उपदेश करता झाला.

ह्या सुत्तांत एकंदरीत आठ गाथा आहेत. पैकी दुसरी राहुलाची व बाकीच्या भगवंताच्या असे अट्टकथाकाराचे म्हणणे आहे. पहिल्या गाथेत भगवंताने ज्याला पंडित म्हटले आहे, तो सारिपुत्त होता. असेही अट्ठकथाकार म्हणतो, आणि ते बरोबर असावे असे वाटते. राहुल अल्पवयस्क असतानाच त्याच्या शिक्षणाकडे भगवंताने त्याला सारिपुत्ताच्या स्वाधीन केले, आणि एक दोन वर्षांनी राहुल वयात आल्यावर त्याला भगवंताने हा उपदेश केला असावा. का की, ह्या सुत्तात सांगितलेल्या गोष्टी अल्पवयस्क मुलाला समजण्याजोग्या नाहीत. राहुल श्रामणेर झाला असता, तर त्याला ‘श्रद्धापूर्वक घरातून बाहेर निघून दु:खाचा अन्त करणारा हो’ असा उपदेश करण्याची जरूरच नव्हती.

ब्राह्मण तरुण गुरुगृही जाऊन ब्रह्मचर्यपूर्वक वेदाध्यायन करीत आणि त्यानंतर यथारुचि गृहस्थाश्रम किंवा तपश्चर्येचा मार्ग अवलंबीत. तसाच प्रकार राहुलाच्या बाबतीत घडून आला असावा. त्याला सर्वसाधारण ज्ञान मिळावे या उद्देशाने भगवंताने सारिपुत्ताच्या स्वाधीन केले. आणि सारिपुत्ताबरोबर तो राहत असल्यामुळे त्याला ब्रह्मचर्य पाळणे आवश्यकच होते. वयात आल्यावर त्याने पुनरपि गृहस्थाश्रमात जाऊ नये म्हणून भगवंताने त्याला हा उपदेश केला. आणि ह्या राहुलाच्या गोष्टीच्या पायावर महावग्गकाराने श्रामणेराची विस्तृत कथा रचली.

इतर श्रामणेर

बुद्ध भगवंताच्या हयातीत अल्पवयात संघात दाखल झालेले श्रामणेर फारच थोडे होते. पण दुसर्‍या संप्रदायातून जे परिव्राजक येत त्यांना चार महिने उमेदवारी करावी लागे, आणि अशा प्रकारच्या श्रामणेकरांचाच भरणा जास्त होता असे दिसते. दीघनिकायातील महासीहनाद सुत्ताच्या शेवटी काश्यप परिव्राजक बुद्धाच्या भिक्षुसंघात प्रवेश करु इच्छितो, तेव्हा भगवान त्याला म्हणतो, “काश्यपा, या संप्रदायात जो प्रव्रज्या घेऊन संघात प्रवेश करू इच्छितो, त्याला चार महिने उमेदवारी करावी लागते. चार महिन्यांनंतर भिक्षूंची खात्री झाली, म्हणजे ते त्याला प्रव्रज्या देऊन संघात दाखल करतात. ह्या बाबतीत काही अपवाद आहेत हे मी जाणतो.” त्याप्रमाणे काश्यपाने चार महिने उमेदवारी केली आणि भिक्षूंची खात्री झाल्यावर त्याला संघात दाखल करून घेण्यात आले.