भगवान बुद्ध

गौतम बुद्धांचे चरित्र


प्रकरण एक ते बारा 63

भिक्षूंची संख्या

आता राजगृहापर्यंत बुद्धाने गोळा केलेल्या भिक्षूंची संख्या या पंधरा भिक्षूंपेक्षा अधिक होती की, काय याचा थोडक्यात विचार करू. बुद्धाला वाराणसी येथे साठ भिक्षु मिळाले; उरुवेला जात असताना वाटेत तीस आणि उरुवेला येथे एक हजार तीन, मिळून एकंदरीत १०९३ भिक्षुंचा संघ एकत्रित झाल्यावर भगवंताने राजगृहात प्रवेश केला. तेथे सारिपुत्त आणि मोग्गस्लान यांजबरोबर संजय परिद्राजकाचे अडीचशे शिष्य येऊन बौद्ध संघाला मिळाले. म्हणजे त्या वेळी भिक्षुसंघाची संख्या १३४५ झाली. परंतु तेवढा भिक्षुसंघ बुद्धापाशी असल्यचा उल्लेख सुत्तपिटकात कोठेही सापडत नाही. बुद्ध भगवान परिनिर्वाणापूर्वी एकदोन वर्षे राजगृहाला आला तेव्हा त्याच्याबरोबर १२५० भिक्षु होते, असे सामञ्ञफलसुत्तात म्हटले आहे. परंतु दीघनिकायाच्या दुसर्‍या आठ सुत्तात भिक्षुसंघाची संख्या ५०० दिली आहे; आणि भगवंताच्या शेवटच्या प्रवासात देखील त्याच्याबरोबर ५०० च भिक्षु होते असे दिसते. भगवंताच्या परिनिर्वाणानंतर राजगृह येथे जी भिक्षुंची पहिली परिषद भरली तिच्या देखील ५०० च भिक्षु होते. तेव्हा भगवंताच्या परिनिर्वाणापर्यंत भिक्षुसंघाची संख्या ५०० वर गेली नव्हती; असे अनुमान करता येते.

बुद्ध भगवंताच्या परिनिर्वाणानंतर ही संख्या फुगविण्याचा क्रम सुरू झाला असावा. ललितविस्तराच्या आरंभीच श्रावस्ती येथे भगवंताबरोबर बारा हजार भिक्षु आणि बत्तीस हजार बोधिसत्व होते, असे म्हटले आहे. अशा रीतीने आपल्या संप्रदायाचे महत्त्व वाढविण्यासाठी त्या काळच्या भिक्षुंनी पूर्वकालीन भिक्षुंची संख्या वाढविण्यास आरंभ केला, आणि महायान पंथाच्या ग्रंथकारांनी तर त्यात वाटेल तेवढ्या बोधिसत्त्वाची भर घातली! बौद्ध धर्माच्या अवनतीला जर कोणते प्रमुख कारण झाले असेल तर ते हेच होय. आपल्या धर्माचे आणि संघाचे स्तोम माजविण्यासाठी बौद्ध भिक्षुंनी भरमसाट दंतकथा रचण्यास सुरुवात केली आणि ब्राह्मणांनी त्याच्याहीपेक्षा विलक्षण दंतकथा रचून भिक्षूंचा पूर्ण पराभव केला!

प्रसिद्ध सहा श्रमणसंघ

बुद्धसमकालीन बुद्धाच्या संघापेक्षा मोठे आणि प्रसिद्ध असे सहा श्रमणसंघ अस्तित्वात होते आणि पूरण कास्सप, मक्खलि, गोसाल, अजित केसकम्बल, पकुध कच्चायन, संजय बेलट्ठपुत्त व निगष्ठ नाथपुत्त या त्या सहा संघाच्या पुढार्‍यांचा लोकांत फार मान असे. यासंबंधी मञ्ञिमनिकायातील चूळसारोपमसुत्तात खालील उतारा सापडतो.

येथे भी गोतम मसणब्राह्मणा संदिनो गणिनो गणाचरिया त्राता यसस्सिनो तित्थकरा साधुसम्मता बहुजनस्स, सय्यथीदं पूरणो कस्सपी, मक्खलि गोसालो, जितो केसकम्बलो, एकुधी कच्चयनो, सञ्ञयो बेलट्टपुत्ती, निगष्टो नाथपुत्तो.

(पिंगल कौल्स भगवताला म्हणतो), “भो गोतम हे जे संधी, गणी गणाचार्य, प्रसिद्ध, यशस्वी, तीर्थकार आणि बहुजनाना मान्य असलेले (सहाजण आहेत), ते कोणते? पूरण कस्सप, मक्खलि गोसाल, अजित केसकम्बल, पकुध कच्चायन, संजय बेलट्ठपुत्त व निगंठ नाथपुत्त.”