भगवान बुद्ध

गौतम बुद्धांचे चरित्र


प्रकरण एक ते बारा 62

ऐतिहासिक कसोटी

यश आणि इतर ५४ तरुण भिक्षु झाले, या कथेपासून येथपर्यंत कथन केलेला मजकूर हा महावग्गातून सारांशरूपाने घेतलेला आहे.* आता या कथेला ऐतिहासिक कसोटी लावून पाहिली पाहिजे. बोधिसत्त्वाने उरुवेला येथे तपश्चर्या केली आणि तत्त्वबोध प्राप्त करून घेतला. अर्थात् बुद्ध भगवंताला उरुवेलेच्या प्रदेशाची चांगली माहिती असली पाहिजे. उरुवेलकाश्यप आणि त्याचे दोघे धाकटे बंधु हजार जटाधारी शिष्यांसहवर्तमान त्याच

प्रदेशांत रहात होते. त्यांना अदभुत चमत्कार दाखवून जर भगवंताला आपले शिष्य करायाचे होते, तर त्यांना सोडून भगवान काशीपर्यंत का गेला? आपला धर्म पंचवर्गीयांशिवाय दुसरे कोणी जाणणार नाहीत, असे त्याला का वाटले? त्यावेळी त्याला अदभुत चमत्कार दाखविण्याची शक्ति नव्हती, आणि काशीला जाऊन पंचवर्गीयांना उपदेश केल्यानंतर ती शक्ति मिळाली, असे समजावे की काय? ऋषिपत्तनात पंचवर्गीयांशिवाय जे पचावन भिक्षू वृद्धाला मिळाले, त्यापैकी फक्त पांचांचीच नावे महावग्गात दिली आहेत; बाकी पन्नासापैकी एकाचे देखील नाव नाही. तेव्हा भिक्षुची संख्या फुगविण्यासाठी पन्नासाठी भर घातली असावी असे वाटते.

वाटेत तीन तरुण पुरुष स्त्रियांसह क्रीडा करीत असता चुटकीसरशी वृद्ध भगवंताने त्यां भिक्षू बनवले, हे संभवत नाही. तसे करावयाचे होते, तर उरुवेलेहून काशीला जाण्याची त्याने प्रयास का केले? उरुवेलेच्या आसपास मौजमजा करणारे कोणी तरुण त्याला सापडले नसते काय? मध्येच या तीस तरुणाची गोष्ट का घुसडून दिली, हे समजत नाही.

वृद्ध भगवान एक हजार तीन जटिलांना भिक्षु करून आणि बरोबर घेऊन राजगृहाला आला, त्या वेळी सर्व राजगृह उचंबळून गेले असता सारिपुत्ताला बुद्ध कोण आहे याची बिलकुल माहिती नव्हती, हे कसे? अस्सजि पंचवर्गीयांपैकी एक. त्याला इतर पंचवर्गीयांबरोबर काशीच्या आसपास धर्मोपदेश करण्याला पाठवून भगवान उरुवेलेला व तेथून राजगृहाला आला, असे असता हा अस्साजि एकाएकी राजगृहाला कसा पोचला? तात्पर्य, पंचवर्गीयांना, यशाला आणि त्याच्या चार माथ्यांना भिक्षुसंघात दाखल करून घेतल्यानंतर काशीहून राजगृहापर्यंत भगवंतांच्या प्रवासाची महावग्गात आलेली हकीकत बहुतांशी तंदकथात्मक आहे, असे म्हणावे लागते.

ललितविस्तरांतील यादी

खरा प्रकार काय घडला हे जरी निश्चित सांगता आले नाही, तर ललितविस्तराच्या आरंभी जी भिक्षुची यादी दिली आहे, तिच्यावरून भिक्षुसंघाची प्राथमिक माहिती अल्प प्रमाणात जुळविता येण्याजोगी असल्यामुळे ती यादी येथे देण्यात येत आहे.

१ ज्ञानकौण्डिन्य (अञ्ञाकौण्डञ्ञ), २ अश्वजित (अस्सजि), ३ बाष्प (वप्प), ४ महानाम, ५ भद्रिक (भदद्य), ६ यशोदेव (यस), ७ विमल, ८ सुबाहु, ९ पूर्ण (पुण्यज), १० गवाम्पत्ति (गवम्पति), ११ उरुवेलाकाश्यप (पुरुवेलकस्सप), १२ नदीकाशयम, १३ गयाकश्यप, १४ सापिपुत्र (सारुपुत्त), १५ महामौदगल्यायन (महामोग्गल्लान), १६ महाकाश्यप (महाकस्सप), १७ महाकात्यायन (महाकच्चान), १८ कफि (?) १९ कौलढन्य (?), २० चुन्डिद (चुन्द), २१ पूर्ण मैत्रायणीफ (पुण्य मन्तणिपुत्त), २२ अनिरुद्ध (अनुरुद्ध), २३ नन्दिक (नन्दक), २४ कस्फिल (कप्पिन), २५ सुभूति, २६ रेवत २७ खदिरवनिक,  २८ अमोघराज (मोघराज), २९ महापारणिक (?), ३० वक्कुल (वक्कुल), ३१ नन्द, ३२ राहुल, ३३ स्वागत (सागत), ३४ आनन्द.

महावग्गात दिलेल्या नाव नसलेल्या भिक्षूंची संख्या वगळली तर या यादीतील पंधरा भिक्षूंच्या परंपरेचा आणि महावग्गाच्या कथेचा मेळ बसतो; आणि त्यावरून असे अनुमान करता येते ती, पंचवर्गीयानंतर भगवंताला यश आणि त्याचे चार मित्र मिळाले. या दहांना बरोबर घेऊन भगवान उरुवेलेला गेला आणि तेथे त्याच्या संघात तिघे काश्यपबंधू शिष्यापैकी सारिपुत्त व मोगल्लान संजयाचा पंथ सोडून बुद्ध भगवंताचे शिष्य झाले. या दोघांच्या आगमनामुळे भिक्षुसंघाची महती फार वाढली, का की, राजगृहात त्यांची बरीच प्रसिद्धि होती. बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा या दोघांनीही कसा विकास केला, याची साक्ष सुत्त आणि विनयपिटक देत आहेत. बहुतेक अभिधम्मपिटक तर सारिपुत्तानेच उपदेशिला असे समजण्यात येते. यानंतर आलेल्या २९ भिक्षूंची परंपरा मात्र ऐतिहासिक दिसत नाही. आनंद आणि अनुरुद्ध एकाच वेळी भिक्षु झाले, असे चुल्लवग्गात (भा. ७) सांगितले असता येथे अनुरुद्धाचा नंबर २२, आनंदाचा ३४ दिला आहे. यांच्या बरोबर उपालि न्हाव्याने प्रव्रज्या घेतली, आणि तो पुढे विनयधर झाला, असे असता या यादीत त्याचे नाव सापडत नाही. तेथे दिलेल्या बहुतेक भिक्षुची चरित्र ‘बौद्धसंघाचा परिचय’ या पुस्तकाच्या तिसऱया भागात आली आहेत. जिज्ञासु वाचकांनी ती वाचावी.