भगवान बुद्ध

गौतम बुद्धांचे चरित्र


प्रकरण एक ते बारा 61

भद्रवर्गीय भिक्षु

वाटेत भद्दवग्गीय नावाचे तीस तरुण एका उद्यानात आपल्या स्त्रियांसह क्रीडा करण्यासाठी आले होते. त्यापैकी एकाची बायको नव्हती म्हणून त्याच्यासाठी एक वेश्या आणली होती. हे तीस आसामी व एकोणतीसांच्या बायका मौजमजेत गुंतून बेसावधपणे वागत असता शक्य तेवढय़ा वस्तु घेऊन ती वेश्या पळून गेली! त्या वेळी बुद्ध भगवान् या उपवनात एका वृक्षाखाली विश्रांतीसाठी बसला होता. उपयुक्त वस्तु घेऊन वेश्या पळून गेली, हे जेव्हा त्या तीस तरुणांना समजले, तेव्हा ते तिचा शोध करीत भगवान् बसला होता तिकडे आले, आणि म्हणाले, ‘‘भदंत, ह्या बाजूने गेलेली एक तरुण स्त्री तुम्ही पाहिली आहे काय?’’

भगवान् म्हणाला, ‘‘तरुण गृहस्थहो, एखाद्या तरुण स्त्रीच्या शोधात लागून फिरत राहावे, किंवा आत्मबोध करावा यापैकी तुम्हाला कोणते बरे वाटते?’’

ते बुद्धाचे वचन ऐकून ते त्याच्याजवळ बसले; आणि बराच वेळ बुद्धाचा उपदेश ऐकून घेतल्यावर गृहस्थाश्रमाचा त्याग करून त्यांनी भिक्षुसंघात प्रवेश केला.

काश्यपबन्धु

त्या उपवनातून भगवान् उरुवेलेला आला. तेथे उरुवेलकाश्यप, नदीकाश्यप व गयाकाश्यप हे तिघे जटिल बन्धु अनुक्रमे पाचशे, तीनशे, व दोनशे जटाधारी शिष्यांसह अग्निहोत्र सांभाळून तपश्चर्या करीत होते. त्यांपैकी वडील बन्धूच्या आश्रमात बुद्ध भगवान् राहिला; आणि अनेक अद्भुत चमत्कार दाखवून त्याने उरुवेलकाश्यपाला आणि त्याच्या पाचशे शिष्यांना आपल्या भिक्षुसंघांत दाखल करून घेतले. उरुवेलकाश्यपाच्या मागोमाग त्याचे धाकटे बंधु आणि त्यांचे सर्व अनुयायी बुद्धाचे शिष्य झाले.

मोठ्या भिक्षुसंघासह राजगृहात प्रवेश

या एक हजार तीन भिक्षूंना बरोबर घेऊन बुद्ध भगवान् राजगृहाला आला. तेथे एवढय़ा मोठय़ा भिक्षुसंघाला पाहून नागरिकांत एकच खळबळ उडून गेली. बिंबिसार राजा आणि त्याचे सर्व सरदार बुद्धाचे अभिनंदन करण्यास आले. बिंबिसाराने बुद्धाला आणि भिक्षुसंघाला दुसर्‍या दिवशी राजवाडय़ात भिक्षा घेण्याला निमंत्रण दिले आणि त्यांचे जेवळ संपल्यावर वेणुवन उद्यान भिक्षुसंघाला दान दिले.

सारिपुत्त आणि मोग्गल्लान

राजगृहाजवळ संजय नावाचा एक प्रसिद्ध परिव्राजक आपल्या पुष्कळ शिष्यांसह वर्तमान राहत असे. सारिपुत्त आणि मोग्गल्लान हे दोघे संजयाचे प्रमुख शिष्य होते. पण त्या संप्रदायात त्यांचे मन रमेना. त्यांनी असा संकेत केला होता की, ‘जर दोघांपैकी एकाला सद्धर्ममार्ग दाखविणारा दुसरा कोणी सापडला तर त्याने दुसर्‍याला ही गोष्ट सांगावी आणि दोघांनी मिळून त्या धर्माची कास धरावी.’

एके दिवशी अस्सजि भिक्षु राजगृहात भिक्षाटन करीत होता. त्याची शांत आणि गंभीर मुद्रा पाहून हा कोणी तरी निर्वाण मार्गाला लागलेला परिव्राजक असावा असे सारिपुत्ताला वाटले; अस्सजीशी संभाषण करून त्याने जाणले की, अस्सजि बुद्धाचा शिष्य आहे आणि बुद्धाचाच धर्ममार्ग खरा आहे. ही गोष्ट सारिपुत्ताने मोग्गल्लानाला कळविली; आणि ते दोघेही संजयाच्या पंथातील दोनशे पन्नास परिव्राजकांसह बुद्धाजवळ येऊन भिक्षुसंघात प्रविष्ट झाले.