भगवान बुद्ध

गौतम बुद्धांचे चरित्र


प्रकरण एक ते बारा 55

ब्रह्मदेवाची विनंती

तत्त्वबोध झाल्यानंतर बुद्ध भगवंताने एक आठवडा बोधिवृक्षाखाली (म्हणजे त्या पिंपळाखाली) घालवला, असे वर सांगितलेच आहे. यानंतर दुसरा आठवडा अजपाल न्यग्रोध वृक्षाखाली, तिसरा आठवडा मुचलिन्द वृक्षाखाली आणि चौथा आठवडा राजायतन वृक्षाखाली घालवून बुद्ध भगवान पुन्हा अजपाल वृक्षाखाली आला. तेथे त्याच्या मनात विचार आला की, हा धर्म मी अत्यंत कष्टाने जाणला आहे. तेव्हा तो लोकांना उपदेशून आणखी त्रास सोसणे बरे नव्हे. विचार ब्रह्मदेवाने जाणला, आणि धर्मोपदेश करण्यासाठी भगवंताची प्रार्थना केली. ही कथा सविस्तरपणे महावग्गात आणि मज्झिमनिकायातील अरियपरियेसनसुत्ता आली आहे. पण ती गोतमबुद्धासंबंधाने मुळीच नसावी. कोणी तरी पुराणकाराने ती विपस्सी बुद्धासंबंधाने रचली व नंतर ती जशीच्या तशीच गोतम बुद्धाच्या चरित्रात दाखल झाली. ह्या रूपकाचा अर्थ ‘बुद्ध, धर्म आणि संघ’ या पुस्तकात (पृ. १६-१९) लावण्याचा मी प्रयत्न केला आहे. तेव्हा त्याची चर्चा येथे करीत नाही.

पंचवर्गीय भिक्षूंना उपदेश करण्याचा बेत

आपणाला प्राप्त झालेल्या चार आर्यसत्याचे ज्ञान प्रथमत: कोणाला करून द्यावे असा विचार बुद्ध भगवन्ताला पडला. आळार कालाम व उद्दक रामपुत्त हे दोघे बोधिसत्त्वाचे गुरू जिवंत असते तर हा नवीन धर्ममार्ग त्यांना तात्काळ पटला असता. परंतु ते हयात नव्हते. तेव्हा भगवन्ताने आपल्या पाच साथ्यांना (पंचवर्गीय भिक्षूंना) उपदेश करावा असे ठरविले हे भिक्षू त्या वेळी बनारस जवळ ऋषिपत्तनात राहत होते. भगवान तिकडे जाण्यास निघाला. वाटेत उपक नावाचा आजीवक श्रमण त्याला भेटला. आपणाला तत्त्वबोध झाला आहे, असे बुद्धाने त्याला सांगितले. पण उपकाल त्याबद्दल खात्री वाटली नाही. असेल कदाचित असे म्हणून तो दुसर्‍या मार्गाने चालता झाला. ह्या एका प्रसंगावरूनच दुसर्‍या पंथाच्या श्रमणांना उपदेश करण्याची निर्थकता भगवंताने जाणली असावी.

पंचवर्गीयांची समजूत

आषाढी पूर्णिमेपूर्वी भगवान वाराणसीला पोचला. तो ऋषिपत्तानात आला तेव्हा दुरुनच त्याला पाहून त्याचा कोणत्याही प्रकारे आदरसत्कार करावयाचा नाही, असा पंचवर्गीयांनी भेट ठरविला. पण तो जसजसा जवळ येत गेला तसतसा त्यांचा हा बेत ढासळत गेला. त्यांनी क्रमश: त्याचा योग्य आदरसत्कार केला, पण त्याचा नवीन धर्ममार्ग ऐकून घेण्याला ते तयार नव्हते. आपणाला एक नवीन धर्ममार्ग सापडला आहे असे भगवंताने जेव्हा त्यांना सांगितले तेव्हा ते म्हणाले, “आयुष्मन गोतम, तुझ्या तशा तऱ्हेच्या तपश्चर्येने देखील तुला सद्धर्ममार्गाचा बोध झाला नाही. आता तू तपोभ्रष्ट होऊन खाण्यापिण्याकडे वळला आहेस, त्या तुला सद्धर्माचा बोध कसा होईल?”

भगवान म्हणाला, “भिक्षुहो, यापूर्वी मी भलतीच वल्गना कधी केली होती काय? जर नाही, जर तुम्ही माझ्या म्हणण्याकडे लक्ष द्या. अमृताचा मार्ग मला सापडला आहे. या मार्गाचा अवलंब केला असता तुम्हाला लवकरच विमुक्ति मिळेल.”

अशा रीतीने पंचवर्गीय भिक्षूंची समजूत घालून काही काळाने आपला नवीन धर्म ऐकून घेण्यास भगवंताने त्यांना प्रवृत्त केले. त्या प्रसंगी त्याने केलेल्या उपदेशाला ‘धर्मचक्रप्रवर्तन’ म्हणतात. हे सुत्त सच्चसंयुत्ताच्या दुसर्‍या वग्गात आणि विनयग्रंथातील महावग्गात सापडते. याचे संस्कृत भाषांतर ललितविस्तराच्या सव्विसाव्या अध्यायात दिले आहे. पैकी पालि सुत्ताचे रूपांतर येथे देतो.