भगवान बुद्ध

गौतम बुद्धांचे चरित्र


प्रकरण एक ते बारा 48

हठयोग

बोधिसत्त्वाला ह्या उपमा सुचल्या. तरी त्याने त्या काळच्या श्रमणव्यवहाराला अनुसरून तीव्र तपश्चर्या करण्याचा निश्चय केला. प्रथमत: त्याने हठयोगावर भर दिला. भगवान सच्चकाल म्हणतो, “हे अग्गिवेस्सन, मी जेव्हा दातावर दात दाबून आणि जीभ टाळूला लावून माझ्या चित्ताचे दमन करी, तेव्हा माझ्या काखेतून घाम सुटे. ज्याप्रमाणे एखादा बलवान पुरुष दुर्बल माणसाला डोक्याला किंवा खांद्याला धरून दाबतो, त्याचप्रमाणे मी माझे चित्त दाबीत होतो.”

“हे अग्गिवेस्सन त्यानंतर आश्वासप्रश्वास दाबून मी ध्यान करू लागलो त्या वेळी माझ्या कानातून श्वास निघण्याचा शब्द होऊ लागला. जस लोहाराचा भाता चालतो, तसा माझ्या कानातून आवज येऊ लागला. तरी पण हे अग्गिवेस्सन मी आश्वासप्रश्वास आणि कान दाबून ध्यान करू लागलो. तेव्हा तीक्ष्ण तरवारीच्या टोकाने माझे डोके कोणी मंथन करीत आहे. असा मला भास झाला. तथापि हेच ध्यान मी पुढे चालविले आणि माझ्या डोक्याला चामड्याच्या पट्ट्याचे वेष्टन देऊन कोणी घट्ट आवळीत आहे असे वाटू लागले, तरी तेच ध्यान मी पुढे चालू ठेवले. त्यामुळे माझ्या उदरात वेदना उठल्या. कसाई शस्त्राने जसे गाईचे पोट कोरतो तसे माझे पोट कोरले जात हे असे मला वाटले. या सर्व प्रसंगी माझा उत्साह कायम होता. स्मृति स्थिर होती, पण शरीरामध्ये त्राण कमी झाले. तथापि त्या कष्टप्रद वेदना माझ्या चित्ताला बाधू शकल्या नाहीत.”

तिसर्‍या प्रकरणात श्रमणांच्या नानाविध तपश्चर्या दिल्या आहेत. त्यांच्यात हठयोगाचा समावेश झालेला नाही. तथापि त्या काळी वरच्या सारख्या हठयोगाचा अभ्यास करणारे तपस्वी होते, असे गृहीत धरावे. लागते नाही तर बोधिसत्त्वाने तसा योगाचा अभ्यास आरंभिला नसत.

उपोषणे

याप्रमाणे हठयोगाचा अभ्यास करून त्याच्यात तथ्य नाही असे दिसून आल्यावर बोधिसत्त्वाने उपोषणाला सुरुवात केली. अन्नपाणी, साफ सोडून देणे त्याला योग्य वाटले नाही. पण तो अत्यंत अल्पाहार सेवन करू लागला. भगवान सच्चकाला म्हणतो, “हे अग्गिवेस्सन मी थोडा थोडा आहार खाऊ लागलो. मुगांचा काढा, कुळ्यांचा काढा, वाटाण्याचा काढा किंवा हरभर्‍यांचा (हरेणु) काढा पिऊनच मी राहत होतो. तो देखील अत्यंत अल्प असल्यामुळे माझे शरीर फारच कृश झाले. आसीतकवल्लीच्या किंवा कालवल्लीच्या गाठीप्रमाणे माझ्या अवयवांचे सांधे दिसू लागले. उंटाच्या पावलाप्रमाणे माझा कटिबंध झाला. सुताच्या चात्यांच्या माळेप्रमाणे माझा पाठीचा कणा दिसू लागला. मोडक्या घराचे वासे जसे खालीवर होतात तशा माझ्या बरगड्या झाल्या. खोल विहिरीत पडलेल्या नक्षत्रांच्या छायेप्रमाणे माझी बुबुळे खोल गेली. कच्चा भोपळा कापून उन्हात टाकला असता जसा कोमेजून जातो. तशी माझ्या डोक्याची चामडी कोमेजून गेली. मी पोटावरून हात फिरविला तर पाठीचा कणा माझ्या हाती लागे आणि पाठीच्या कण्यावरून हात फिरविला म्हणजे पोटाची चामडी हाती लागत असे. याप्रमाणे पाठीचा कणा आणि पोटाची चामडी एक झाली होती. शौचाला किंवा लघवीला बसलो, तर मी तेथेच पडून राही. अंगावरून हात फिरविला असता माझे दुर्बळ झालेले लोम आपोआप खाली पडत.”