भगवान बुद्ध

गौतम बुद्धांचे चरित्र


प्रकरण एक ते बारा 34

बोधिसत्त्वाचे कुल

बोधिसत्त्वाच्या कुळाची आणि बाळपणाची माहिती त्रिपिटकात फार थोडी सापडते. ती प्रसंगवशात उपगेशिलेल्या सुत्तात आली असून तिचा आणि अट्ठकथांत सापडणार्‍या माहितीचा कधी कधी मुळीच मेळ बसत नाही. यास्तव, या परस्परविरोधी माहितीची नीट छाननी करून त्यातून काय निष्पन्न होते ते पाहणे योग्य आहे.

मज्झिमनिकायाच्या चूळदुवखक्खन्ध सुत्ताच्या अट्ठकथेत गोतमाच्या कुटुंबाची महिती सापडते ती अशी :--
“शुद्धोदन, शुक्लोदन, शाक्योदन, धोतोदन आणि अमितोदन हे पाच भाऊ. अमितादेवी त्यांची बहीण. तिष्यस्थविर तिचा मुलगा तथागत आणि नंद शुद्धोदनाचे मुलगे. महानाम आणि अनुरुद्ध शुक्लोदनाचे आणि आनन्दस्थविर अमितोदनाचा मुलगा. तो भगवंतापेक्षा लहान आणि महानाम मोठा.” येथे दिलेल्या अनुक्रमाप्रमाणे अमितोदन शेवटला भाऊ दिसतो व त्याचा मुलगा आनंद भगवंतापेक्षा वयाने लहान होता, हे ठीकच आहे. परंतु मनोरथपूरणी अट्ठकथेत अनुरुद्धासंबंधाने लिहिताना ‘अमितोदनसक्कस गेहे पटिसंधिगण्हि’ (अमितोदन शाक्याच्या घरी जन्मला) असे म्हटले आहे.!* एकाच बुद्धघोषाचार्याने लिहिलेल्या या दोन अट्ठकथांत असा विरोध दिसतो. पहिल्या अट्ठकथेत आनंद अमितोदनाचा मुलगा होता असे म्हणतो. आणि दुसर्‍या अट्ठकथेत अनुरुद्ध त्याचा मुलगा म्हणतो. तेव्हा शुक्लोदन इत्यादी नावे देखील काल्पनिक आहेत की काय असा संशय येतो.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
*बौद्धसंघाचा परिचय, पृ. १५२ पाहा
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
बोधिसत्त्वाचे जन्मस्थान

सुत्तनिपाताच्या वर दिलेल्या वातरणात बुद्धाचा जन्म लुम्बिनी जनपदात झाला असे आहे. आजला देखील या ठिकाणाला लुम्बिनीदेवी असे म्हणतात आणि त्या ठिकाणी जो जमिनीत गाडून गेलेला अशोकाचा शिलास्तंभ सापडला, त्याच्यावरील लेखात ‘लुम्बिनीगामे उबालिके कते” हे वाक्य आहे. अर्थात बोधिसत्त्वाचा जन्म लुम्बिनी गावात झाला असे पूर्णपणे सिद्ध होते.

दुसर्‍या अनेक सुत्तांतून महानाम शाक्य कपिलवस्तूचा राहणारा होता अशा अर्थाचा उल्लेख सापडतो. पण शुद्धोदन कपिलवस्तूत होता असा महावग्गात तेवढा उल्लेख आहे. लुम्बिनीग्राम आणि कपिलवस्तू यांच्यामध्ये १४।१५ मैलाचे अंतर होते. तेव्हा शुद्धोदन कधी कधी लुम्बिनी गावाच्या आपल्या जमीनदारीत राहात होता व तेथेच बोधिसत्त्व जन्मला असे म्हणावे लागेल. पण खाली दिलेल्या अंगुत्तरनिकायाच्या तिकनिपातातील १२४ व्या सुत्तावरून या विधानालाही बळकट बाधा येते.

कालामाचा आश्रय

एके समयी भगवान कोसल देशात प्रवास करीत करीत कपिलवस्तूला आला. तो आल्याचे वर्तमान ऐकून महानाम शाक्याने त्याची भेट घेतली. तेव्हा महानामाला त्याने आपणाला एक रात्र राहण्यासाठी जागा पाहण्यास सांगितले. परंतु भगवंताला राहण्यासाठी योग्य जागा महानामाला कोठेच सापडली नाही. परत येऊन तो भगवंताला म्हणाला. “भदन्त आपणासाठी योग्य जागा मला सापडत नाही. आपला पूर्वीचा सब्रह्मचारी भरण्डू कालाम याच्या आश्रमात आपण एक रात्र राहा.” भगवंताने महानामाला तेथे आसन तयार करावयास सांगितले व तो त्या रात्री त्या आश्रमात राहिला.

दुसर्‍या दिवशी सकाळी महानाम भगवंताच्या भेटीला गेला. तेव्हा भगवान त्याला म्हणाला, “या लोकी, हे महानाम तीन प्रकारचे धर्मगुरू आहेत. पहिला कामपभोगाचा समतिक्रम (त्याग) दाखवितो. पण रूपांचा आणि वेदनांचा समतिक्रम दाखवीत नाही. दुसरा कामोपभोगांचा व रूपांचा समतिक्रम दाखवितो, पण वेदनांचा समतिक्रम दाखवीत नाही. तिसरा ह्या तिहींचाही समतिक्रम दाखवितो. ह्या धर्मगुरूचे ध्येय एक आहे की भिन्न आहे?”

त्यावर भरण्डू कालाम म्हणाला, “हे महानाम, या सर्वांचे ध्येय एकच आहे असे म्हण.” पण भगवान म्हणाला, “महानामा त्यांचे ध्येय भिन्न आहे असे म्हण.” दुसर्‍यांदा व तिसर्‍यांदाही भरण्डूने त्यांचे एकच ध्येय असे म्हणण्यास सांगितले व भगवंताने त्यांची ध्येय भिन्न आहेत असे म्हणण्यास सांगितले. महानामासारख्या प्रभावशाली शाक्यासमोर सश्रण गोतमाने आपला उपमर्द केला असे वाटून भरण्डू कालाम जो कलिपवस्तूहून चालता झाला, तो कधीही परत आला नाही.