भगवान बुद्ध

गौतम बुद्धांचे चरित्र


प्रकरण एक ते बारा 30

उपनिषदृषि जरी जातिभेद पाळीत असत, तरी जातीपेक्षा सत्याला ते विशेष मान देत हे सत्यकामाच्या गोष्टीवरून सिद्ध होते. परंतु त्याच उपनिषदांचा समन्वय करू पाहणारे बादरायण व्यास आणि भाष्यकार शंकराचार्य जातिभेदाचे किती स्तोम माजवतात पाहा:--

श्रवणाध्ययनार्थप्रतिषेधात्समृतेश्च। अ. १।३।३८ इतस्छ न शुद्रस्याधिकार:। यदस्य स्मृते: श्रवणाध्ययनार्थप्रतिषेधी मवति। वेदश्रवणप्रतिषेधी वेदाध्ययनप्रतिपेधसतदर्थज्ञानानुष्ठानयोश्चप्रतिषेध: शूद्रस्य स्मर्यते। श्रवणप्रतिषेधस्तावत ‘अथास्य वेदमुपशृण्वतस्त्रपुजतुभ्यां श्रोत्रप्रपूरणम’ इति। ‘पद्युह वा एतत स्मसानं यच्छुद्रस्तस्मच्छूद्रसमीपे नाद्येतव्यम’ इति च। त एवाध्ययनप्रतिषेध:। यस्य हि समीपेपि नाध्येतव्य भवत, स कथम(तमदीयीत। भवति च वेदोच्चारणे जिह्माच्छोदे धारणे शरीरेद इति त एव चार्थादर्थज्ञानानुष्ठानयो: प्रतिषेधो भवति ‘न सूदराय मतिदद्यात” इति। (ब्रह्मसूत्रशांकरभाष्य अ. १।३।३८)
“आणि म्हणूनच शूद्राला (ब्रह्मज्ञानाचा) अधिकार नाही. कारण, स्मृतीने त्याला वेद ऐकण्याचा व अध्ययन करण्याचा प्रतिषेध केला आहे. वेदश्रवणाचा प्रतिषेध, वेदध्ययनाचा प्रतिषेध आणि त्याचे अर्थज्ञान व अनुष्ठान यांचा प्रतिषेध स्मृतीने शूद्राला केला आहे. श्रवणप्रतिषेध असा, त्याने वेदावाक्य ऐकले तर त्याचे कान लाखेने आणि शिशाने भरावे.’ शुद्र म्हणजे पाय असलेले स्मशान होय. म्हणून शुद्राच्या जवळपास अध्ययन करू नये. आणि म्हणूनच अध्ययनप्रतिषेध देखील होतो. कारण ज्याच्या जवळपास देखील अध्ययन करता कामा नये, तो स्वत: श्रुतीचे अध्ययन कसे करील? आणि त्याने वेदोच्चारण केले असता त्याचा जिव्हाच्छेद करावा. (वेदमंत्राचे) धारण केले असता ठार मारावे (शरीरभेद करावा). असे सांगितले आहे. यास्तव त्याने वेदाचे अर्थज्ञान आणि अनुष्ठान करू नये. असे सिद्ध होते. ‘शुद्राला मति देऊ नये.’

शंकराचार्यांनी शुद्रांचा छळ करण्यासाठी घेतलेले आधार गौतमधर्मसूत्र इत्यादि गुप्त राजांच्या समकाली झालेल्या ग्रंथातील आहेत. म्हणजे समुद्रगुप्तापासून (इ.स.च्या चवथ्या शतकापासून) तहत शंकराचार्यांपर्यंत (इ.स.च्या सहाव्या शतकाच्या आरंभापर्यंत) आमच्या ब्राह्मण पूर्वजांचा शुद्रांना दाबून आपले वर्चस्व कायम ठेवण्याचा प्रयत्न अव्याहत चालू होता, असे दिसते. धर्मसूत्रकार आणि शंकराचार्य यांच्यामध्ये फरक एवढाच की, सूत्रकारांच्या वेळी मुसलमान लोकांनी या प्रदेशात प्रवेश केला नव्हता आणि शंकराचार्यांच्या वेळी सिंध देश मुसलमानांच्या ताब्यात गेला असून तेथे मुसलमानी धर्माचा एकसारखा प्रसार होत होता. त्यांच्याकडून तरी आमच्या आचार्यांनी समानत्वाचा धडा शिकावयास पाहिजे होता. तसे न करता हे आचार्य आपले जातिभेदाचे घोडे तसेच दामटीत राहिले. त्याचे परिणाम या हतभागी देशाला कसे भोगावे लागले हे इतिहास सांगतच आहे.

स्त्री साध्वींचे संघ


तपस्वी ऋषिमुनीत किंवा वैदिक ऋषींत स्त्रियांचा समावेश झाला नव्हता. गार्गी वाचक्वनी सारख्या स्त्रिया ब्रह्मज्ञानाच्या चर्चेत भाग घेत होत्या.* परंतु त्यांचे स्वतंत्र संघ नव्हते. स्त्रियांचे स्वतंत्र संघ बुद्धकालापूर्वी एकदोन शतके स्थापन झाले. त्यापैकी सर्वात जुना जैन साध्वीचा संघ होता, असे वाटते. या जैन साध्वी वादविवादात पटाईत होत्या. हे भद्रा कुंडलकेशा इत्यादिकांच्या गोष्टीवरून समजून येईल.

पूर्वीचे ऋषिमुनी जंगलात राहत आणि गावात क्वचितच संचार करीत. यास्तव त्यांना स्त्रियांचे संघ स्थापन करणे शक्य नव्हते. परंतु श्रमण लोक वस्तीच्या आसपास राहत आणि त्या काळची परिस्थिती अनुकूल असल्यामुळे त्यांना स्त्रियांचे संघ स्थापता आले. बौद्ध आणि जैन वाङमय वाचले असता एक विशेष गोष्ट दिसून येते ती ही की, त्या काळी स्त्रिया धार्मिक बाबतीत पुरुषांप्रमाणेच पुढारलेल्या होत्या. याचे कारण गणसत्ताक राज्यात स्त्रियांना पूर्ण स्वातंत्र्य असे. बुद्ध भगवंताने वज्जींना जे उन्नतीचे सात नियम घालून दिले त्यापैकी पाचवा, ‘स्त्रियांचा मान राखला पाहिजे; विवाहित किंवा अविवाहित स्त्रीवर कोणत्याही प्रकारे बलात्कार होऊ देता नये’ हा आहे. आणि त्याला अनुसरून बुद्धाच्या मरणापर्यंत तरी वज्जी लोक वागत असत. वज्जीप्रमाणेच मल्लांच्या राज्यांत देखील बायकांचा मान ठेवण्यात येत होता असे मानण्यास हरकत नाही. अंग, काशी, शाक्य, कोलिय इत्यादि गणसत्ताक राज्याचे स्वातंत्र्य नष्ट झाले होते, तरी अन्तर्गत व्यवस्था त्यांच्या हातात असल्यामुळे त्यांच्या राज्यात स्त्रीस्वातंत्र्याला फारसा धक्का पोचला नाही.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
* बृ. उ. ३।६।१ इत्यादि.
+ बौद्धसंघाचा परिचय, पृ. २१४-२१६ पाहा
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------