भगवान बुद्ध

गौतम बुद्धांचे चरित्र


प्रकरण एक ते बारा 25

विकट भोजन

(इ) “जेथे गाई बांधण्याची जागा असे व जेथून नुकत्याच गाई चरावयास गेलेल्या असत, तेथे हातापायावर चालत जाऊन मी वासराचे शेण खात असे. जोपर्यंत माझे मलमूत्र कायम असे. तोपर्यंत त्यावरच मी निर्वाह करीत होतो, असे माझे महाविकट भोजन होते.”

उपेक्षा

(नि) “मी एखाद्या भयानक अरण्यात राहत असे. जो कोणी अवीतरागी त्या अरण्यात प्रवेश करी, त्याच्या अंगावर काटा उभा राहावयाचा इतके ते भयंकर होते. हिवाळ्यात भयंकर हिमपात होत असता मी मोकळ्या जागी राहत होते आणि दिवसा जंगलात शिरत होतो. उन्हाळ्याच्या शेवटल्या महिन्यात दिवसा मोकळ्या जागी राहत असे, आणि रात्री जंगलात शिरत असे. मी स्मशानात माणसांची हाडे उशाला घेऊन निजत असे. गावढळ लोक येऊन माझ्यावर थुंकत, लघवी करीत, धूळ फेकीत अथवा माझ्या कानात काड्या घालीत. तथापि, त्यांच्याविषयी माझ्या मनात कधीही पापबुद्धि उत्पन्न झाली नाही.”
आहारव्रत

(इ) “आहाराने आत्मशुद्धि होते, अशी कित्येक श्रमणांची आणि ब्राह्मणांची दृष्टि आहे. ते केवळ बरे खाऊन राहतात. बोरांचे चूर्ण खातात, बोरांचा काढा पितात किंवा दुसरा कोणताही पदार्थ बोराचांच करून खातात. मी एकच बोर खाऊन राहत असल्याची मला आठवण आहे. हे सरिपुत्ता, तू असे समजू नकोस की, त्या काळी बोरे फार मोठी होती. आजला जशी रे आहेत, तशी ती त्या काळीही असत. याप्रमाणे एकच बोर खाऊन राहिल्यामुळे माझे शरीर अत्यंत कृश होत असे. आसीतक वल्लीच्या किंवा कालवल्लीच्या गाठीप्रमाणे माझे सांधे स्पष्ट दिसत असत. माझा कटिबद्ध उंटाच्या पावलासारखा दिसे. सुताच्या च्यात्यांच्या माळेप्रमाणे माझा पाठीचा कणा दिसे. मोडक्या घरांचे वसे जसे खालीवर होतात तशा माझ्या बरगड्य़ा झाल्या. खोल विहिरीत पडलेल्या नक्षत्रांच्या छायेप्रमाणे माझी बुबळे खोल गेली. कच्चा कडू भोपळा कापून उन्हात टाकला असता जसा कोमेजून जातो, तशी माझ्या डोक्याची चामडी कोमजून गेली. मी पोटावरून हात फिरवण्यास जाई, तो पाठीचा कणाच माझ्या हाती लागे. त्यावर हात फिरवी, तेव्हा पोटाची चामडी हाताला लागे. येणेप्रमाणे माझा पाठीचा कणा आणि पोटाची चामडी ही एक झाली होती. शौचाला किंवा लघवीला बसण्याचा प्रश्न केला तर मी तेथेच पडत असे अंगावरून हात फिरवला तर माझे दुर्बळ झालेले लोम खाली पडत. त्या उपोषणाच्या योगाने माझी स्थिती तशी झाली.

“कित्येक श्रमण आणि ब्राह्मण मूग खाऊन राहतात, तीळ खाऊन राहतात. किंवा तांदूळ खाऊन राहतात. या पदार्थांनी आत्मशुद्धि होते अशी त्यांची समजूत आहे हे सारिपुत्ता, मी एकच तीळ, एकच तांदूळ किंवा एकच मूग खाऊन राहत होतो. त्या वेळी हे दाणे फार मोठे होते असे समजू नकोस. आजकालच्या सारखेच हे दाणे होते. या उपोषणाने माझी स्थिती तशीच (वर वर्णिल्याप्रमाणे) होत असे.”

बुद्धघोषाचार्यांचे म्हणणे की, भगवंताने ही तपश्चर्या एका पूर्वजन्मी केली. त्या काळी बोरे वगैरे पदार्थ आताच्या सारखेच होत असत. या मजकुरावरून बुद्धघोषाचार्यचे म्हणणे संयुक्तिक आहे असे दिसून येते. बुद्धसमकाली चालू असलेल्या भिन्न भिन्न तपश्चर्याचे निरर्थकत्व दाखवून देण्यासाठी सुत्ताच्या कर्त्याने वरील मजकूर भगवंताच्या तोंडी घातला आहे हे सांगणे नलगे.
टिपेत दिलेल्या फरकाशिवाय (नि) सदराखाली आलेली तपश्चर्या निर्ग्रंथ (जैन साधू) करीत असत. आजलाही केस उपटण्याची उपासतापास करण्याची प्रथा त्यांच्यात चालू आहे.

(इ) सदराखाली आलेली तपश्चर्या इतर पंथाचे श्रमण आणि ब्राह्मण करीत असत त्यातील बहुतेक प्रकार बुवा, वगैरे लोकांत अद्यापि चालू आहे.