भगवान बुद्ध

गौतम बुद्धांचे चरित्र


प्रकरण एक ते बारा 24

तपस्विता

“हे सारिपुत्त, माझी तपस्विता कशी होती ती सांगतो.”
(नि) मी नागावा राहत असे. लौकिक आचार पाळीत नसे. हातावर भिक्षा घेऊन खात असे. ‘भदन्त इकडे या’ असे कोणी म्हटले तर ते ऐकत नसे.  बसल्या ठिकाणी आणून दिलेल्या अन्नाचा, मला उद्देशून तयार केलेल्या अन्नाचा आणि निमंत्रणाचा मी स्वीकार करीत नसे. ज्यात अन्न शिजविले याच भांडयातून अन्न आणून दिले तर ते घेत नसे. उखळातून खाण्याचा पदार्थ आणून दिला तर तो घेत नसे. उंरठ्याच्या आणि दांडक्याच्या पलीकडे राहून दिलेली भिक्षा घेत नसे. दोघे जेवीत असताना एकाने उठून दिलेली भिक्षा घेत नसे. गर्भिणी, मुलाला पाजणारी किंवा पुरुषाशी एकांतात असणारी, अशा स्त्रियांकडून भिक्षा घेत नसे. मत्स्य, मांस, सुरा, वगैरे पदार्थ घेत नसे.* एकाच घरात भिक्षा घेऊन दोन घासावर, याप्रमाणे सात दिवस वाढवीत जाऊन सात घरी भिक्षा घेऊन सात घास खाऊन राहत असे. पळाभरच अन्न घेत नसे. याप्रमाणे सात दिवस वाढवीत जाऊन सात फळे अन्न घेऊन त्यावर निर्वाह करीत असे. एक दिवसाआड जेवीत असे. दोन दिवसाआड जेवीत असे याप्रमाणे उपासाची मर्यादा वाढवीत जाऊन, सात दिवसाआड किंवा पंधरवड्यातून एक दिवस जेवीत असे.
*जैन साधू मत्स्य आणि मांस घेत असत. पण सुरा घेत असल्याचा दाखला पडत नाही. मांसाहाराची चर्चा अकराव्या प्रकरणात केली आहे.

(इ) “शाक, श्यामक, नवार, चांभाराने फेकलेले चामड्याचे तुकडे, शेवाळ, कोंडा, करपलेले अन्न, पेंड, गवत किंवा गाईचे शेण खाऊन राहत असे किंवा अरण्यात सहजासहजी मिळालेल्या फळामुळांवर निर्वाह करीत असे. मी सणाची वस्त्रे धारण करीत असे. मिश्र वस्त्रे धारण करीत असे. प्रेतावर टाकलेली वस्त्रे धारण करीत असे. रस्त्यातील चिंध्याची वस्त्रे बनवून ती धारण करीत असे. वल्कले धारण करीत असे. अजिनमृगचर्म धारण करीत असे. कुशांचे बनविलेले चीवर धारण करीत असे. वाकाचे वर धारण करीत असे. मनुष्यांच्या केसांची कांबळ किंवा घोड्यांच्या केसांची कांबळ अथवा घुबडांच्या पिसांचे बनविलेले चीवर धारण करीत असे.

(नि) “मी दाढीमिशा आणि केस उपटून काढीत असे. उभा राहून तपस्या करीत असे. उकिड्याने बसून तपस्या करीत असे.

(इ) “मी कंटकांच्या शय्येवर निजत असे. दिवसातून तीनदा स्नान करीत असे. अशा प्रकारे अनेक परींनी देहदंडन करीत होतो. ही माझी तपस्विता.”

रुक्षता

“सारिपुत्त, माझी रुक्षता कशी होती हे सांगतो—

(नि) अनेक वर्षांच्या धुळीने माझ्यावर अंगावर मळाचा थर चढला होता. जसा एखादा तिंदुक वृक्षाचा सोट अनेक वर्षांच्या धुळीने माखला जातो. तसा माझा देह झाला होता. पण मला असे वाटत नव्हते की, हा धुळीचा पापुद्रा मी स्वत: किंवा दुसर्‍या कोणी तरी हाताने झाडावा अशी माझी रुक्षता होती.”

जुगुप्सा

“आता माझी जुगुप्सा कशी होती हे सांगतो – (नि) मी मोठ्या काळजीपूर्वक जात येत असे. पाण्याच्या थेंबावर देखील माझी तीव्र दया होती. अशा विषय अवस्थेत सापडलेल्या सूक्ष्म प्राणाचा माझ्या हातून नाश होऊ नये, याबद्दल मी अत्यंत काळजी घेत असे. अशी माझी जुगुप्सा होती.” (जुगुप्सा म्हणजे हिंसेचा कंटाळा).

प्रविविक्तता


“हे सारिपुत्त, आता माझी प्रविविक्तता कशी होती हे सांगतो—(इ) मी एखाद्या अरण्यात राहत असता कोणा तरी गुराख्याला गवत कापणार्‍याला, लाकडे नेणार्‍याला किंवा जंगलाची देखरेख ठेवणार्‍या माणसाला पाहून गहन जंगलातून खोलगट किंवा सपाट प्रदेशातून एकसारखा पळत सुटे. हेतू हा की, त्यांनी मला पाहू नये आणि मी त्यांना पाहू नये. जसा एखादा अरण्यमृग मनुष्यांना पाहून पळत सुटतो तसा मी पळत सुटत असे. अशी माझी प्रविविक्तता होती.”