भगवान बुद्ध

गौतम बुद्धांचे चरित्र


प्रकरण एक ते बारा 21

ते तपस्वी वाराणसीला आले. राजाने त्यांची कीर्ति ऐकून त्यांना आपल्या उद्यानात चातुर्मासात राहण्याची विनंती केली; व त्यांच्या जेवण्याखाण्याची व्यवस्था आपल्याच राजवाड्यात करविली. एक दिवस शहरात सुरापानमहोत्सव चालला होता. परिव्राजकांना जंगलात दारू मिळणे कठीण म्हणून राजाने या तपस्व्यांना उत्तम दारू देवविली. तपस्वी दारू पिऊन नाचू लागले, गाऊ लागले. आणि काही अव्यवस्थितपणे खाली पडले. जेव्हा ते पूर्वस्थितीवर आले, तेव्हा त्यांना फार पश्चाताप झाला. त्याच दिवशी राजाचे उद्यान सोडून ते हिमालयाकडे वळले; आणि क्रमश: आपल्या आश्रमात येऊन आचार्याला नमस्कार करून एका बाजूला बसले. आचार्य त्यांना म्हणाला, “तुम्हाला लोकवस्तीत भिक्षेचा त्रास झाला नाही ना? आणि तुम्ही समग्रभावाने राहिलात ना?” ते म्हणाले, “आचार्य! आम्ही सुखाने राहिलो; मात्र ज्या पदार्थाचे पान करू नये त्याचे पान केले.”

अपायिम्ह अनच्चिम्ह अगायिम्ह रुदिम्ह च।
विसञ्ञकरणि पित्वा दिट्ठा नाहुम्ह वानरा।।

आम्ही प्यालो, नाचलो, गाऊ लागलो आणि रडलो. उन्मत्त करणारी (दारू) पिऊन आम्ही वानर बनलो नाही, एवढेच काय ते!” (सुरापान जातक नं. ८१)

ऋषिमुनीत जातिभेद नव्हता

तपस्वी ऋषिमुनीत जातिभेदाला मुळीच थारा नव्हता. कोणत्याही जातीचा मनुष्य तपस्वी झाला, तरी त्याचा सर्व समाजात बहुमान होत असे. उदाहरणादाखल येथे जातकात आलेली मातंग ऋषीची गोष्ट (मातंग जातक (नं. ४९७) संक्षेपाने देत आहे:-

मातंग वाराणसी नगराच्या बाहेर चांडालकुलात जन्मला. तो वयात आल्यावर एके दिवशी त्याची व वाराणसी श्रेष्ठीच्या दुष्टमंगलिका नावाच्या तरुणी कन्येची रस्त्यात गाठ पडली. तेव्हा मातंग एका बाजूला उभा राहिला. आपल्या परिवारातील नोकरांना दुष्टमंगलिकेने विचारले की, हा बाजूला उभा राहिलेला मनुष्य कोण? तो चांडाल आहे, असे तिच्या नोकराने सांगितल्याबरोबर अपशकुन झाला असे समजून ती तेथूनच मागे फिरली.

दृष्टमंगलिका महिन्या दोन महिन्यांनी एकदा उद्यानात जाऊन आपल्या बरोबरच्या व तेथे जमणार्‍या इतर लोकांना पैसे वाटीत असे. ती माघारी घरी गेल्यामुळे त्या लोकांची निराशा झाली. त्यांनी मातंगाला झोडपून निश्चेष्टा करून रस्त्यात पाडले. मातंग काही वेळाने शुद्धीवर आला आणि दृष्टमंगलिकेच्या बापाच्या दरवाजात पायरीवर आडवा पडून राहिला. “हा त्रागा का करतोस?” असे जेव्हा त्याला विचारले, तेव्हा तो म्हणाला, “दृष्टमंगलिकेला घेतल्यावाचून मी येथून हलणार नाही.” सात दिवस तसाच पडून राहिल्यावर श्रेष्ठीने निरुपाय होऊन आपल्या मुलीला त्याच्या स्वाधीन केले. तिला घेऊन तो चांडालग्रामात गेला.