भगवान बुद्ध

गौतम बुद्धांचे चरित्र


प्रकरण एक ते बारा 17

आठच कुलांची माहिती

सौळा जनपदांपैकी येथे आठांच्याच राजकुलाचे वर्णन आहे. त्यापैकी सुमित्राचे कुल त्याच्या मागोमागच नष्ट होऊन विदेहांचा अंतर्भाव वज्जींच्या राज्यात झाला असावा. बाकी राहिलेल्या सातात पांडवांच्या परंपरेत कोणता राजा राज्य करीत होता, हे सांगितले नाही आणि त्याची माहिती इतर बौद्ध ग्रंथातही सापडत नाही. कुरुदेशात कौरव्य नावाचा राजा राज्य करीत होता असा उल्लेख रट्ठपाल सुत्तात आहे. तो पांडवकुलातील होता याजबद्दल कोठे पुरावा नाही. राहिलेल्या सहा राजकुलांची जी माहिती येथे दिली आहे, तशीच कमीजास्त प्रमाणात त्रिपिटक ग्रंथांत सापडते.

शाक्यकुल

बौद्ध ग्रंथांत शाक्यकुलाची माहिती विस्तारपूर्वक दिली आहे. असे असता वरील सोळा जनपदात शाक्यांचा नामनिर्देश मुळीच नाही. हे कसे? याला उत्तर हे की, ही यादी तयार होण्यापूर्वीच शाक्यांचे स्वातंत्र्य नष्ट होऊन त्या देशाचा समावेश कोसलांच्या राज्यात झाला, आणि म्हणूनच या यादीत त्यांचा निर्देश सापडत नाही.

बोधिसत्त्व गृहत्याग करून राजगृहाला आला असता बिबिंसार राजाने त्यांची भेट घेऊन तू कोण आहेस, असा प्रश्न विचारला. तेव्हा तो म्हणाला...

उजुं जानपदो राजा हिमवन्तस्स पस्सतो।
धनविरियेन सम्पन्नो कोसलेसु निकेतिनो।।
आदिच्चा नाम गोत्तेन, साकिया नाम जातिया।
तम्हा कुला पब्बजितोम्हि राज न कामे अभिपत्थयं।।
(सुत्तनिपात, पब्बज्जासुत)

हे राजा येथून सरळ हिमालयाच्या पायथ्याशी कोसल देशांपैकी एक जानपद (प्रान्त आहे.) त्याचे गोत्र आदित्य व जाति शाक्य. त्या कुलातून, हे राजा, मी कामोपभोगांची इच्छा सोडून परिव्राजक झालो आहे.

ह्या गाथात ‘कोसलेतु निकेतिनो’ हे शब्द महत्त्वाचे आहेत. कोसल देशात ज्यांचे घर आहे, म्हणजे जे कोसल देशात गणले जातात यावरून शाक्यांचे स्वातंत्र्य कधीच नष्ट झाले होते असे सहज दिसून येते.

शाक्य कोसलराजाला कर देत असत आणि अन्तर्गत व्यवस्था आपण पाहत. महानामाच्या दासीकन्येशी पर्सनदीचा विवाह झाल्याचीहकीकत वर दिलीच आहे. याविषयी प्रो. ऱ्हिस डेव्हिड्स शंका प्रदर्शित करतात. कोसल राजाचा सर्वाधिकार जर शाक्यांना मान्य होता, तर आपली मुलगी त्याला देण्याला शाक्यांना हरकत वा वाटावी, असे त्यांचे म्हणणे दिसते. (Buddhist India p. ११-१२. परंतु हिंदुस्थानातील जातिभेद किती तीव्र होता हे त्यांना माहीत नसावे. उदेपूरच्या प्रतापसिंहाला अकबराचे सार्वभौमत्व मान्य असले तरी आपली मुलगी अकबराला देण्याला तो तयार नव्हता. कोसलकुल ‘मातंगच्युत्युत्पन्न’ असे ललितविस्तरात म्हटले आहे. त्यावरून हे कुल मातंगांच्या (मांगांच्या) जातीतून उदयाला आले असावे असे वाटते. अशा घराण्याशी शाक्यांनी शरीरसंबंध करणे नाकारले असल्यास त्यात आश्चर्य मानण्याजोगे काही नाही.