भगवान बुद्ध

गौतम बुद्धांचे चरित्र


प्रकरण एक ते बारा 16

कोसलराजकुल

(२) दुसरे देवपुत्र म्हणाले, “हे कोसलकुल सेना, वाहन व धन यांनी संपन्न असल्यामुळे बोधिसत्त्वाला प्रतिरूप आहे.” त्यावर दुसरे म्हणाले, “ते मातंगच्युतीपासून उत्पन्न झाले असून मातृपितृशुद्ध नाही. आणि हीन धर्मावर श्रद्धा ठेवणारे आहे. म्हणून ते योग्य नव्हे.”

वंशराजकुल

(३) दुसरे म्हणाले, “हे वंशराजकुल भरभराटीला आलेले व सुक्षेम असून त्याच्या देशात संपन्नता असल्याकारणाने ते बोधिसत्त्वाला योग्य आहे.” त्यावर दुसरे म्हणाले, “ते प्राकृत आणि चंड आहे. परपुरुषांपासून त्या कुलातील पुष्कळ राजांचा जन्म झाला आहे आणि त्या कुलातील सध्याचा राजा उच्छेदवादी (नास्तिक) असल्याकारणाने ते बोधिसत्त्वाला योग्य नाही.”

वैशालीतील राजे


(४) दुसरे देवपुत्र म्हणाले, “ही वैशाली महानगरी भरभराटीला चढलेली क्षेम, सुभिक्ष, रमणीय मनुष्यांनी गजबजलेली घरे आणि वाडे यांनी अलंकृत, पुष्पवाटिका आणि उद्याने यांनी प्रफुल्लित अशी असल्यामुळे जणू देवांच्या राजधानीचे अनुकरण करीत आहे. म्हणून बोधिसत्त्वाला जन्मण्यास ती योग्य दिसते.” त्यावर दुसरे म्हणाले,  “तेथल्या राजांचे परस्परांविषयी न्याय्य वर्तन नाही. ते धर्माचरणी नव्हेत. आणि उत्तम, मध्यम, बुद्ध व ज्येष्ठ इत्यांदिकांविषयी ते आदर बाळगीत नाहीत. प्रत्येक जण आपल्यालाच राजा समजतो. कोणी कोणाचा शिष्य होऊ इच्छीत नाही. कोणी कोणाची चाड ठेवीत नाही. म्हणून ती नगरी बोधिसत्त्वाला अयोग्य आहे.”

अवंतिराजकुल

(५) दुसरे देवपुत्र म्हणाले, “हे प्रद्योताचे कुल अत्यंत बलाढ्य, महावाहनसंपन्न व शत्रुसेनेवर विजय मिळविणारे असल्याकारणाने बोधिसत्त्वाला योग्य आहे.” त्यावर दुसरे म्हणाले,”  त्या कुलातील राजे चंड, क्रूर, कठोर बोलणारे आणि धाडसी आहेत. कर्मावर त्यांचा विश्वास नाही. म्हणून ते कुल बोधिसत्त्वाला शोभण्यासारखे नाही.”

मथुराराजकुल


(६) दुसरे म्हणाले, “ही मथुरा नगरी समृद्ध, क्षेम, सुभिक्ष आणि मनुष्यांनी गजबजलेली आहे. कंसकुलातील शूरसेनाचा राजा सुबाहु त्याची ही राजधानी आहे. ही बोधिसत्त्वाला योग्य होय.” त्यावर दुसरे म्हणाले, “हा राजा मिथ्यादृष्टि कुलात जन्मलेला असून दस्युराजा असल्यामुळे ही नगरी देखील बोधिसत्त्वाला योग्य नाही.”

कुरुराजकुल


(७) दुसरे म्हणाले, “या हस्तिनापुरामध्ये पांडव कुलातील शूर आणि सुस्वरूप राजा राज्य करीत आहे. परसैन्याचा पराभव करणारे ते कुल असल्यामुळे बोधिसत्त्वाला योग्य आहे.” त्यावर दुसरे म्हणाले, “पांडव कुलांतील राजांनी आपला वंश व्याकूळ करून टाकला आहे. युधिष्ठिराला धर्माचा, भीमसेनाला वायूचा, अर्जुनाला इन्द्राचा आणि नकुल- सहदेवांना अश्विनांचे पुत्र म्हणतात. यास्तव हे देखील कुल बोधिसत्त्वाला योग्य नाही.”

मैथिलीराजकुल

(८) दुसरे म्हणाले, “मैथिल राजा सुमित्र याची राजधानी ही मिथिला नगरी अत्यंत रमणीय असून हत्ती, घोडे, पायदळ यांनी तो राजा संपन्न आहे. सोने, मोती आणि जवाहिर त्याजपाशी आहेत. सामन्त राजांची सैन्ये त्याच्या पराक्रमाला घाबरतात. तो मित्रवान आणि धर्मवत्सल आहे. म्हणून हे कुल बोधिसत्त्वाला योग्य होय.” त्यावर दुसरे म्हणाले, “ असा हा राजा आहे खरा, परंतु त्याला पुष्कळ संतति असून तो अतिवृद्ध असल्याकारणाने पुत्रोत्पादन करण्याला समर्थ नाही. म्हणून ते देखील कुल बोधिसत्त्वा अयोग्य आहे.”

“याप्रमाणे त्या देवपुत्रांनी जंबुद्रीपातील सोळा राज्यात (षोडश जानपदेषु) जी लहान मोठी राजघराणी होती ती सर्व पाहिली. पण ती त्यांना सदोष दिसली.” (हे मूळ उतार्‍यांचे संक्षिप्त रुपांतर आहे.)