भगवान बुद्ध

गौतम बुद्धांचे चरित्र


प्रकरण एक ते बारा 13

१३. अस्सका (अश्मका)

सुत्तनिपातातील पारायणवग्गाच्या आरंभी ज्या वत्थुगाथा आहेत, त्याजवरून असे दिसून येते की, अस्सकांचे राज्य कोठे तरी गोदावरी नदीच्या आसपास होते. बावरी नावाच्या श्रावस्ती येथे राहणार्‍या ब्राह्मणाने आपल्या सोळा शिष्यांसहवर्तमान या राज्यात वस्ती केली.

सो अस्सकस्स विसये अळकस्स समासने ।
वसी गोदावरीकूले उञ्छेन च फलेन च
तो (बावरी) अश्वकाच्या राज्यात आणि अळकाच्या राज्याजवळ गोदावरीतीरी भिक्षेवर आणि फळावर निर्वाह करून वास करिता झाला.

अस्सक आणि अळक हे दोन (अन्धक) राजे होते व त्यांच्या राज्याच्या दरम्यान बावरीने आपल्या सोळा शिष्यांसहवर्तमान एक वसाहत केली आणि ती उत्तरोत्तर वाढत गेली, असे अट्ठकथाकाराचे म्हणणे आहे. वैदिक धर्मप्रचारकांची दक्षिणेत ही पहिली वसाहत होती, असे म्हणण्यास हरकत नाही. बुद्ध किंवा तत्समकालीन भिक्षु एथवर पोचले नसल्यामुळे या राज्याची विशेष मिहती बौद्ध वाङ्मयात सापडत नाही. तथापि बुद्धाची कीर्ति येथवर जाऊन थडकली होती. तो ऐकून बावरीने आपल्या सोळाही शिष्यांना बुद्धदर्शनाला पाठविले. ते प्रवास करीत मध्यप्रदेशात आले व अखेरीस राजगृह येथे बुद्धाला गाठून त्याचे शिष्य झाल्याची हकीकत तर निर्देशिलेल्या पारायणवग्गांतच आहे. परंतु त्यानंतर त्यांनी परत जाऊन गोदावरीच्या प्रदेशात उपदेश केल्याचा उल्लेख कोठेच आढळत नाही.

१४. अवंती

अवंतीची राजधानी उज्जयिनी व त्यांचा राजा चंडप्रद्योत यांच्या संबंधाने बरीच माहिती आढळते. चंडप्रद्योत आजारी पडला असता त्याच्या आमंत्रणावरून मगध देशातील प्रसिद्ध वैद्य जीवक कौमारभूत्य त्याला बरे करण्यासाठी उज्जयिनीला गेला,. प्रद्योताच्या अत्यंत क्रूर स्वभावामुळे त्याला चंड हे विशेषण लावीत;  आणि ही गोष्ट जीवकाला चांगली माहीत होती. राजाला औषध देण्यापूर्वी जीवकाने जंगलात जाऊन औषधे आणण्याच्या निमित्ताने भद्दवती नावाची हत्तीण मागून घेतली आणि राजाला औषध देऊन त्या हत्तीणीवर बसून पळ काढला. इकडे औषध घेतल्याबरोबर प्रद्योताला भयंकर वांत्या होऊ लागल्या. त्यामुळे तो खवळला; आणि त्याने जीवकाला पकडून आणण्याचा हुकूम सोडला. परंतु जीवक तेथून निसटला होता. त्याचा पाठलाग करण्यासाठी राजाने काक नावाच्या आपल्या दासाला पाठविले. काकाने कौशाम्बीपर्यंत प्रवास करून जीवकाला गाठले. जीवकाने त्याला एक औषधी आवळा खाण्यास दिला. त्यामुळे काकाची दुर्दशा झाली आणि जीवकाने भद्दवतीवर बसून सुखरूपपणे राजगृहाला प्रयाण केले. इकडे प्रद्योत साफ बरा झाला. काक दासदेखील बरा होऊन उज्जयिनीला गेला. रोग नष्ट होऊन प्रकृति पूर्वीप्रमाणे बरी झाल्याकारणाने प्रद्योताची जीवकावर मर्जी बसली आणि त्याला अर्पण करण्यासाठी प्रद्योताने सिवेय्यक नावाच्या उत्तम वस्त्रांची जोडी राजगृहाला पाठविली. (महावग्ग, भाग ८ वा पाहा.)

बुद्ध भगवान प्रद्योताच्या राज्यात कधीही गेला नाही. परंतु त्याच्या प्रमुख शिष्यांपैकी एक-महाकात्यायन-प्रद्योताच्या पुरोहिताचा मुलगा होता. पित्याच्या मरणानंतर त्याला पुरोहितपद मिळाले. पण त्यात समाधान न मानता तो मध्यदेशात जाऊन बुद्धाचा भिक्षुशिष्य झाला. महाकात्यायन परत स्वदेशी आल्यावर प्रद्योताने आणि इतर लोकांनी त्याचा चांगला आदरसत्कार केला. (विशेष माहितीसाठी `बौद्धसंघाचा परिचय’ पृ. १६५-१६८ पाहा.) त्याचा आणि मथुरेचा राजा अवंतिपुत्र यांचा जातिभेदाविषयीचा संवाद मज्झिमनिकायातील मधुर किंवा मधुरिय सुत्तांत सापडतो. मथुरेत आणि उच्चयिनीत महाकात्यायन जरी प्रसिद्ध होता, तरी या प्रदेशात बुद्ध भगवंताच्या हयातीत बौद्धमताचा फारसा प्रसार झाला होता, असे दिसत नाही. बुद्धाचे भिक्षुशिष्य तुरळक असल्यामुळे या प्रदेशात पाच भिक्षूंना देखील दुसर्‍या भिक्षूला उपसंपदा देऊन संघात दाखल करून घेण्याची बुद्ध भगवंताने परवानगी दिली. (महावग्ग, भाग ८ वा; `बौद्धसंघाचा परिचय’ पृ. ३०-३१.) या कामी मध्य देशात कमीत कमी वीस भिक्षूंची जरूरी लागत होती.