भगवान बुद्ध

गौतम बुद्धांचे चरित्र


प्रकरण एक ते बारा 3

दासांचा पराजय का झाला?

अशा या फिरस्त्या लोकांनी दासांसारख्या पुढारलेल्या लोकांचा पराजय केला कसा, याचे उत्तर इतिहासाने- विशेषत: हिंदुस्थानच्या इतिहासाने-वारंवार दिले आहे. एका राजवटीखाली लोक आरंभी सुखी आणि सधन झाले, तरी अखेरीस एका लहानशा वर्गाच्या हातात सत्ता एकवटते, तो वर्ग तेवढा चैनीत राहतो आणि आपसात अधिकारासाठी भांडत असतो. त्यामुळे लोकांवर कराचा भार वाढत जातो;  आणि ते या सत्ताधार्‍यांचा द्वेष करतात. अशा वेळी मागासलेल्या लोकांना चांगले फावते. एकजुटीने असल्या साम्राज्यशाहीवर हल्ला चढवून ते ती पादाक्रांत करतात. तेराव्या शतकाच्या आरंभी जंगली मोगलांना एकवटून झगिशखानाने किती साम्राज्ये लयाला नेली? तेव्हा आर्यांनी आपसात भांडणार्‍या दासांना अनायासे जिंकले असल्यास त्यात मुळीच नवल नाही.

शहरे तोडणारा इन्द्र

दास लहान लहान शहरातून राहत असत. आणि या शहरांचे एकमेकांत वैर चालत होते असे दिसते. का की, दासांपैकी दिवोदास हा इन्द्राला सामील झाल्याचा उल्लेख ऋग्वेदात अनेक ठिकाणी आढळतो. दासांचे नेतृत्व वृत्र ब्राह्मणाकडे होते. त्याचाच नातलग त्वष्टा; त्याने इन्द्राला एकप्रकारचे यंत्र (व्रज) तयार करून दिल. त्याच्या साहाय्याने इन्द्राने दासांची शहरे तोडली व अखेरीस वृत्र ब्राह्मणाला ठार मारले. पुरंदर म्हणजे शहर तोडणारा हे विशेषण इन्द्राला ऋग्वेदात अनेक ठिकाणी लावले आहे. (विशेष माहितीसाठी `हिंदी संस्कृति आणि अहिंसा’ पृष्ठ १७-१८ पाहा.)

इन्द्राची परंपरा


इन् आणि द्र या दोन शब्दांच्या समासाने इन्द्र शब्द बनला आहे इन् म्हणजे योद्धा. उदाहरणार्थ `सह इना वर्तते इति सेना’ द्र शब्द शिखर किंवा मुख्य अशा अर्थी बाबिलिनयन भाषात सापडतो. तेव्हा इन्द्र म्हणजे सैन्याचा अधिपति किंवा सेनापति. होता होता हा शब्द राजवाचक बनला. जसे देवेन्द्र, नागेन्द्र, मनुजेंद्र इत्यादि. पहिल्या इन्द्राचे नाव शक होते. त्यानंतर त्याची परंपरा बरीच वर्षे चालली असावी. नहुषाला इन्द्र केल्याची दन्तकथा पुराणात आलीच आहे. `अहं सप्तहा नहुषी नहुष्टर’ असा उल्लेख ऋग्वेदात (१४/४९/८) सापडतो. अर्थात् या दन्तकथेत काही तथ्य असले पाहिजे.

इन्द्रपूजा

सार्वभौम राजांना यज्ञात बोलावून आणून त्यांना सोम देण्याचा विधि बाबिलोनियात होत असे. त्या प्रसंगी स्तुतीने भरलेली त्यांची स्तोत्रे गाण्यात येत. इन्द्राची बहुतेक सुक्ते अशाच प्रकारची आहेत. इन्द्राची संस्था नष्ट झाल्यानंतर देखील ही स्तोत्रे तशीच राहिली आणि त्यांचा अर्थ भलताच होऊ लागला. इंद्र आकाशातील देवांचा राजा आहे, अशी कल्पना होऊन बसली; आणि ह्या सूक्तांचा अर्थ अनेक ठिकाणी कोणाला काहीच समजेनासा झाला. त्यांच्या नुसत्या शब्दात मांत्रिक प्रभाव आहे, असे लोक गृहीत धरून चालू लागले.