भगवान बुद्ध

गौतम बुद्धांचे चरित्र


**प्रस्तावना 2

वर सांगितलेले तिपिटकाचे विभाग राजगृह येथे भरलेल्या पहिल्या सभेत ठरविण्यात आले, असे बुद्धघोषाचार्याचे म्हणणे आहे. भगवान बुद्धाच्या परिनिर्वाणानंतर भिक्षु शोकाकुल झाले. तेव्हा एक सुभद्र नावाचा वृद्ध भिक्षु म्हणाला, ‘आमचा शास्ता परिनिर्वाण पावला, हे बरे झाले, तुम्ही अमुक केले पाहिजे आणि तमुक करता कामा नये, अशा प्रकारे तो आम्हांस सतत बंधनात ठेवीत होता. आता वाटेल तसे वागण्यात मोकळीक झाली.’ हे ऐकून महाकाश्यपाने विचार केला की, जर धर्मविनायाचा संग्रह केला नाही, तर सुभद्रासारख्या भिक्षूंना स्वैराचार करण्यास मुभा मिळेल, म्हणून ताबडतोब भिक्षुसंघाची सभा बोलावून धर्म आणि विनय यांचा संग्रह करून ठेवला पाहिजे. त्याप्रमाणे महाकाश्यपाने राजगृह येथे त्या चातुर्मासात पाचशे भिक्षूंना गोळा केले; आणि सभेत प्रथमत: उपालीला विचारून विनयाचा संग्रह करण्यात आला; आणि नंतर आनंदाला प्रश्न करून सुत्त आणि अभिधम्म या दोन पिटकांचा संग्रह करण्यात आला. कित्येकांच्या मते खुद्दकनिकायाचा अंतर्भाव अभिधम्मपिटकातच केला गेला होता. पण इतर म्हणत की, त्याचा अंतर्भाव सुत्तपिटकातच करावयास पाहिजे.

हा सुमंगलविलासिनीच्या निदानकथेत आलेल्या मजकुराचा सारांश आहे. हाच मजकूर समन्तपासादिका नावाच्या विनय अट्ठकथेच्या निदानकथेतही सापडतो. पण त्याला तिपिटक ग्रंथात कोठेच आधार नाही. बुद्ध भगवंतांच्या परिनिर्वाणानंतर राजगृहात भिक्षुसंघाची पहिली सभा झाली असेल; पण तीत सध्याचे पिटकाचे विभाग किंवा पिटक हे नाव देखील आले असेल असे दिसत नाही. अशोककालापर्यंत बुद्धाच्या उपदेशाचे धर्म आणि विनय असे दोन विभाग करण्यात येत असत; पैकी धर्माची नऊ अंगे समजली जात असत; ती अशी- सुत्त, गेथ्य, वेय्याकरण, गाथा, उदान, इतिवुत्तक, जातक, अब्भुतधम्म आणि वेदल्ल. या अंगांचा उल्लेख मज्झिमनिकायातील अलगद्दूपमसुत्तात, आणि अंगुत्तरनिकायात सात ठिकाणी सापडतो.

सुत्त हा पालि शब्द सूक्त किंवा सूत्र या दोनही संस्कृत शब्दांबद्दल असू शकेल. वेदात जशी सूक्ते आहेत, तशीच ही पालि सूक्ते होत, असे कित्येकांचे म्हणणे. परंतु महायानसंप्रदायाच्या ग्रंथात यांना सूत्रे म्हटले आहे; आणि तोच अर्थ बरोबर असावा. अलीकडे सूत्रे म्हटली म्हणजे पाणिनीची आणि तशाच प्रकारची इतर सूत्रे समजली जातात. पण आश्वलायन गृह्यसूत्र वगैरे सूत्रे या संक्षिप्त सूत्रांहून थोडीशी विस्तृत आहेत; आणि तशाच अर्थाने पालि भाषेतील सूत्रे आरंभी रचली गेली असावी. त्या सूत्रांवरून आश्वलायनादिकांनी आपल्या सूत्रांची रचना केली किंवा बौद्धांनी त्यांच्या सूत्रांना अनुसरून आपल्या सूत्रांची रचना केली, या वादात शिरण्याची आवश्यकता नाही. एवढे खरे की, अशोककालापूर्वी जी बुद्धाची उपदेशपर वचने असत त्यांना सुत्ते म्हणत; आणि ती फार मोठी नव्हती.

गाथायुक्त सूत्रांना गेय्य म्हणतात, असे अलगद्दसुत्ताच्या अट्ठकथेत म्हटले आहे आणि उदाहरणादाखल संयुत्तनिकायाचा पहिला विभाग देण्यात आला आहे. परंतु जेवढ्या म्हणून गाथा आहेत त्या सर्वाचा गेय्यामध्ये संग्रह होतो; तेव्हा गाथा नावाचा निराळा विभाग का पाडण्यात आला हे सांगता येत नाही. गेय्य म्हणजे अमुकच प्रकारच्या गाथा अशी समजूत असल्यास नकळे.

वेय्याकरण म्हणजे व्याख्या. एखादे सूत्र घेऊन त्याचा थोडक्यात किंवा विस्तारपूर्वक अर्थ सांगणे याला वेय्याकरण म्हणतात. (अर्थात् या शब्दाचा संस्कृत व्याकरणाशी काही संबंध नाही)