श्रीगणुदासकृत - श्रीकृष्ण - कथामृत

संतकवि श्रीगणुदास यांनी रचलेले श्रीकृष्ण - कथामृत अमृताची गोडी देते.


श्रीकृष्ण कथामृत - चवथा सर्ग

( गोकुलानंद )

सत्यं नश्वरमस्तु वा जगदिदं जीवः शिवो वेतरः
शून्यं वा परमाणुरस्तु जगतो हेतुः प्रधानं च वा
योगो ज्ञानमथास्तु कर्म नितरां निःश्रेयसे साधनं
जानीमो गिरिशैतदेव भगवन् त्वं नः शरण्यः प्रभुः ॥१॥
मी इच्छितों हरिचरित्र रचावयासी
घालावया गवासणीच जणू नभासी
जें शक्य ना, घडत तें अपुल्या प्रसादें
माझ्या शिरीं वरदहस्त गुरो असूं दे ॥२॥
ॐ काराचा उदय जाहला
हिरण्यगर्भापुन ज्या वेळा
मंगलता ती त्या समयाची
आज येथ जणुं धरिते प्राची ॥३॥
सकाळ ती श्रावणी म्हणून
कुंद असावें वातावरण
चरण परी श्रीहरिचे जेथें
उरेल केवीं दुर्दिन तेथें ॥४॥
अरुणोदय होतसे मनोहर
नभीं प्रभा फांकली लालसर
मेघखंड रंगले त्यामुळें
जणों गुलालें रंजित कमळें ॥५॥
पूर्व दिशेला आज काय हें
तेज उसळतें तरि कसलें हें
इंद्राच्या कां शततमयज्ञीं
वसुधारेनें प्रदीप्त अग्नी ॥६॥
सुधा - कुंभ कांगरुड करांतुन
हरुनी नेतां पडला निसटुन
भूवरतीं आदळतां त्यांतिल
अमृत काय हें उसळें उज्वल ॥७॥
छे, न तसें, सूर्यराज भूमी पावन करण्या येती
सुवर्णरज उधळीत चालले तत्पर सेवक पुढतीं ॥८॥
उगवे आतं प्रभात मंगल
नाचत येती किरणे कोमल
विहंगमांची किलबिल कानीं
प्रसन्नतेचीं घुमवीं गाणीं ॥९॥
सोनेरी उन्ह घराघरांवर
तलपे वृक्षांच्या शेंड्यांवर
मंद वायुनें डुलती वेली
फुलें सुंगधी ज्यांवर फुललीं ॥१०॥
थेंब पावसाचे सुकुमार
दुर्वांच्या हिरव्या पात्यावर
वरुणानें जणुं आज गोकुळीं
असंख्यांत रत्नेंच उधळिलीं ॥११॥
वा ही पृथ्वी न्हाली नटली
नंद - घरीं उत्सवा निघाली
तिच्या हरित शालूस शोभती
पदरासी हे गुंफित मोती ॥१२॥
शिरीं घेउनी मृण्मय घागर
स्त्रिया निघाल्या पाणोठ्यावर
तेजानें निज पावित्र्याचें
उजळ करित मुख दिशादिशांचें ॥१३॥
नंदाच्या दाराहुन जातां गडबड कांहीं दिसली
विशेष दिसल्यावर कोणी कां स्त्री ते वगळुनि गेली ॥१४॥
नंदाच्या अंगणाभीतरीं
दोन चार कीं असती नारी
मधें यशोदा मूर्च्छित अबला
नंद दूरसा गोंधळलेला ॥१५॥
यशोदेस जागवी रोहिणी
मुखावरी लव शिंपुन पाणी
वारा घाली कुणी पदरानें
निरखी वदना आतुरतेनें ॥१६॥
सतेज बालक गोजिरवाणें
गुंडाळी दुसरी वस्त्रानें
तोंच यशोदा ये भानावर
परतवीत नंदाचा धीर ॥१७॥
गोळा होउन तिच्यासभोंती
स्त्रिया अधीरा वृत्ता पुसती
प्रथम बालका अंगीं घेउन
सांगतसे त्याचें मुख चुंबुन ॥१८॥
“ काल निशीं वासरूं मोकळें
बांधण्यास ओढाया गेलें
असह्य कळ तो पोटीं आली
प्रसूत झालें शुद्धी गेली ॥१९॥
परी सुरक्षित बाळ खरोखर देवाचीच कृपा ही
जोडी कर गहिवरुनी, नंदा स्वर्ग ठेगणा होई ॥२०॥
यशोदेस मग घरांत नेलें
उचित असे उपचारहि केले
फार दिसांनीं पुत्र जन्मला
तुला अतां कां त्या हर्षाला ॥२१॥
नंदगृहीं हरि जन्मा आला
घरोघरीं आनंद उसळला
कमळ विकसतें कुठें तळ्यांत
सुगंध पसरे सर्व वनांत ॥२२॥
वाजे सनई गर्जे ढक्का
डुलती गगनीं गुढ्या पताका
तोरण दारासी पुष्पांचें
कुठें नारळासह अंब्याचें ॥२३॥
सर्व घरीं शर्करा वांटिती
नंदाचा पुत्रोत्सव कथिती
प्रतिदिवशीं हें चालूं होतें
अधिकाधिक ये हर्षा भरतें ॥२४॥
नांव ठेवण्याच्या दिवशीं तर थाटा सीमा नुरली
नारींची बहु धांदल झाली गमती झुलत्या केळी ॥२५॥
मंगल न्हाउन करुनी भूषा
नंदगृहासी निघती योषा
पथीं दिसे समुदाय तयांचा
गुच्छ रम्यसा जसा कळ्यांचा ॥२६॥
प्रत्येकीच्या ताट करांत
झांकुन जाळीच्या वस्त्रांत
आंत गहूं, नारळ, खण उंची
कुठें रेशमी झवलें, कुंची ॥२७॥
मंडप घातियला नंदानें
दिली आंतुनी चित्र - वितानें
पान - फुलांनीं शोभा आली
उभ्या स्वागता दारीं केळी ॥२८॥
मधें पाळणा लटके सुंदर रत्नें बाजुस चारी
रंगित पोपट मोर झालरी, निजला आंत मुरारी ॥२९॥
पुढें यशोदा पाटावरती
काजळ - कुंकुम ल्याली होती
देहा थोडी आली कृशता
कांतीसी परि नसे म्लानता ॥३०॥
हा हा म्हणतां मंडप सगळा
गोपवधूंनीं भरुनी गेला
जणों कवीच्या विशाल चित्तीं
रम्य कल्पना दाटी करिती ॥३१॥
कृष्णाच्या मातेच्या भंवतीं
ओटी भरण्या जमल्या युवती
तदा यशोदा दिसे जणूं कां
खुले पाकळ्यांमध्यें कर्णिका ॥३२॥
गोपींनीं घेतला उचलुनी
बाळकृष्ण पाळण्यामधूनी
ओठ फिरविती हसत्या गाला
जावळ मोहवितें दृष्टीला ॥३३॥
हिच्या करांतुन तिच्या करासी कृष्ण सारखा नाचे
नीलकमल जणुं तरंगतें हें जल लहरीवर साचें ॥३४॥
अन्य करीं आपुल्या करांतुन
देतां व्याकुळ अंतःकरण
कृष्णाला नच सोडूं वाटे
प्रेम सर्व शरिरांतुन उमटें ॥३५॥
दुसरी परि तितकीच अधीरा
घेण्या त्या सुकुमार कुमारा
वात्सल्याची ओढाताण
सहन करी स्मितवदनें कृष्ण ॥३६॥
वृद्धा परि त्या भरल्या रागें
“ हाल मुलाचें कां करितां गे
चला, पुरे, त्या इकडे आणा
नांव ठेवण्या वेळ होत ना ” ॥३७॥
नांव घेउनी गोविंदाचें
नाम करण होतें इतरांचें
वदल्या असतील कायी आतां
येथ कृष्ण ठेवितां उचलितां ॥३८॥
तें कथण्यासी कुणास कां मुख जें वेदांस न ठावें
बुद्धीचा हा विषय न, हृदयें भक्ताच्या जाणावें ॥३९॥
कृष्ण कुणी अच्युत, गोविंद
श्रीहरि, तेवीं श्याम मुकुंद
एक नाम कां असेल साचें
अनंतरूपीं भगवंतचें ॥४०॥
समाप्त झाला समारंभ तो
परी कुणाचा पाय न निघतो
घुटमळती पाळण्या भोंवतीं
कारण कांहीं काढुन युवती ॥४१॥
वदनीं घालुन मूठ आपुली
चोखित होती मूर्त सावळी
गोपींचीं जणुं मनेंच कवळुन
मुखांत घाली नंदनंदन ॥४२॥
गोपींचीं परतलीं शरीरें कशी तरी निजसदनीं
परी चैन नच जणुं राहिलें कांहितरीं विसरूनी ॥४३॥
धान्य निवडितां दही घुसळितां
मुलास वा आपुल्या भरवितां
पेटण वा घालून चुलीसी
मधेंच येती नंदगृहासी ॥४४॥
येउन कोणी मागे विरजण
कुणा हवी सपिटाची चाळण
पदार्थ अमका करणें केवीं
रीत पुसाया कोणी यावी ॥४५॥
उगीच कांहीं वस्तू नाया
नेली नसतां परत कराया
निमित्त करुनी नाना रीती
कृष्णा बघण्या गोपी येती ॥४६॥
आणिक मग त्या श्रीकृष्णासी
खेळविती घेउन उरासी
कुणी तयासी तेल माखितें
एक म्हणे “ मी न्हाउं घालितें ” ॥४७॥
कुणी लोचनीं काजळ घाली
दुजी तिटेची लावी टिकली
थोपटुनी कोणी निजवावें
आंदोलित वा गीत म्हणावें ॥४८॥
भुंगा गंऽ बसलेला । पाटलीच्या फुलावरी ॥
कृष्णाच्या गालावरी ॥ गालबोट ॥४९॥
चांदणं या खोलीमाजीं । कोठून तरी आलं ॥
माझं बाळ गंऽहासलं ॥ गालामधें ॥५०॥
चांदोबा उगवला । कमळ झोंपीं गेलें
का उघडे राहीले ॥ डोळे तूझे ॥५१॥
कोणी रडवा उगा करावा
हसराही कोणी रडवावा
परी त्यांतही कौतुक होतें
खेळणेंच तें जणों स्त्रियांतें ॥५२॥
अशी स्थिती होती इतरांची
असेल केवीं यशोमतीची
तिजसी सुख जें श्रीकृष्णाचें
नसेच तें भाग्यांत कुणाचे ॥५३॥
अंकीं घेउन श्रीकृष्णातें
कुरळें जावळ कुरवाळीते
कवळ्या ओठांच्या हास्यें तर
वेड तिला लाविलें खरोखर ॥५४॥
प्यावयास फिरता मुख हृदयीं
उरत न तिजसी देहभान ही
हर्ष उमटतो प्रतिरोमांतुन
मृदुसुख त्या स्पर्शाचें पावुन ॥५५॥
नंद असाची होई मोहित
धरी कवळुनी हृदयीं निजसुत
प्रसादगुण काव्याचा जेवीं
क्षणाक्षणा रसिकांसं मोहवी ॥५६॥
गोकुळ इकडे होतें पोहत
आनंदाच्या सरोवरांत
तिकडे होता कंस घाबरा
गचक्या खाउन भीति - सागरा ॥५७॥
मरण आपुलें टाळायासी त्या पापे भूपालें
मुलें प्रजेचीं मारायासी अधिकारी नेमियलें ॥५८॥
कामा या मधुवेश धरोनी
फिरे पूतना बाल - घातिनी
आपुलकीची भाषा मंजुल
मधु वदनीं, हृदयीं हालाहाल ॥५९॥
लाव भरी ती विष वक्षोजीं
घेउन जवळीं शिशु त्या पाजी
अपथ्य जेवीं प्रियरूपानें
मोहुन, नाशीं सहजपणानें ॥६०॥
तडफडुनी शिशु मरतां हांसे
“ वधिशी मेल्या, कंसा कैसें ”
शठता परि ही कशी टिकावी
हरि जो लीला - नट मायावी ॥६१॥
शोषण घे हरि विष स्तनींचें
हरिलें जणुं कीं पाप तियेचें
पाठविलें स्वर्गांत तियेसी
प्रभुचा द्वेषहि फलद विशेषी ॥६२॥
तृणावर्त शकटासुर गेला याच गतीला अंतीं
वारुळांत जणुं धजले मूषक कोल्हे सिंह विघाती ॥६३॥
खर्‍या मृगमदापुढें कसा वा
लसुणीचा दुर्गंध टिकावा
तत्त्वज्ञाना सन्मुख सांगा
शोक मोह कां करिती दंगा ! ॥६४॥
हेत्वाभासा लाभे ठाय
तर्क - पंडिता समोर काय !
तसे दैत्य हे कृष्णापुढतीं
मशकें हीं, तो अनंतशक्ति ॥६५॥
कुबेर - सुत कृष्णें उद्धरिलें
नारद - शापें तरु झालेले
असामान्य हीं कृत्त्यें ऐशीं
बघतां धाले गोकुलवासी ॥६६॥
तेज रवीचें पूर्वाह्णीं वा मुनि - हृदयींचें वैराग्य
कमलांचें सौंदर्य सकाळीं गोकुळचें अथवा भाग्य
यशोमतीचें मूर्त सौख्य वा नंदाचें वात्सल्य जसें
हळुं हळुं तेवीं आनंदासह बाळकृष्ण तो वाढतसे ॥६७॥
फिरे ओसरी भिंत धरोनी
पांगुळ - गाडा कधीं घेउनी
निज जननीच्या धरुन अंबरा
महत्प्रयासें चढे उंबरा ॥६८॥
वस्त्र सोडुनी ठेवयलेलें
त्यांत जाउनी हा घोटाळे
खालीं राही चुकुन करंडा
सांडुन कुंकू माखी तोंडा ॥६९॥
करी यशोदा तुलसी - पूजन
कृष्ण उभा पाठीसी येउन
उदकाडीचा धरण्या धूर
बघे पसरुनी इवलासा कर ॥७०॥
घुसळण करितां कधीं एकदां
मधेंच गेली आतं यशोदा
बाळकृष्ण ये डेर्‍यापाशीं
कांठ धरून उंचवी पदासी ॥७१॥
पाही आंतिल लोणी घ्याया
परी होतसे खटपट वाया
रागें मग उलथिलें दुधाणें
धांव ये जननी तच्छ्रवणें ॥७२॥
इकडे ही मूर्ती तें ठाईं
दोदो हातीं लोणी खाई
मुख, पद, पोटहि लडबडलेलें
ताक दूरवर वाहत गेलें ॥७३॥
हात पकडुनी श्रीकृष्णाचे
( प्रयत्न हे रागे भरण्याचे )
करी तयावर मोठे डोळे
परी कौतुकें हसूंच आलें ॥७४॥
नंदा पुढतीं तसेंच नेलें
विचित्रसें तें ध्यान सांवळे
हसें दावुनी वदे यशोदा
यास मार मारिजे एकदां ॥७५॥
नंदें चुंबियलें प्रेमानें रडव्या कृष्ण - मुखासी
शिक्षा याहुन दुजी असे कां असल्या अपराधासी ॥७६॥
लीलांनीं या सुकुमाराचे
वेडें केलें मन सकलांचें
नाच नाच रे बाबा घननीळा
गोपींना हा एकच चाळा ॥७७॥
नंदपाटलाकडे प्रत्यहीं
कामासाठीं गौळी कांहीं
येती ते आणिती खेळणीं
श्रीहरि जवळीं यावा म्हणुनी ॥७८॥
अंग धुळीनें सर्व माखलें
तसेंच मुख जरि मळकट असलें
करपाशीं तरि कृष्णा घेउन
विशंक घेती त्याचें चुंबन ॥७९॥
सुंदर हंसरा श्याम खोडकर
वदुन बोबडे सुखवी अंतर
वृद्ध तरुण वा मूल असो कां
श्रीहरि सर्वांचाच लाडका ॥८०॥
कुणी कसाही असो उदास
चिंता वा लागली मनास
श्रीकृष्णाच्या मधुर दर्शनें
कळी खुलावी प्रसन्नतेनें ॥८१॥
परिसुनि भाषण कधीं हरीचें
विस्मित व्हावें मन सूज्ञांचें
बुद्धीची कीं चमक विलक्षण
बालवयींही दिपवी लोचन ॥८२॥
श्याम परी तो महालाघवी
विसरवीत आपुली थोरवी
मधुर खेळकर साधें वर्तन
यांतच मोठ्यांचें मोठेपण ॥८३॥
अतां हरीसी वर्ष पांचवें मग त्याच्या खेळासी
पुरेल केवीं सदन, मनूचा कमंडलू मत्स्यासी ॥८४॥
गोपांच्या समवयी बालकां
जमवुन खेळे पथीं सारखा
कधीं पळापळ कधीं हुतूतू
कधीं भोंवर्‍यावरतीं हेतू ॥८५॥
पाट्यांचा कधीं खेळ मांडितां
गुंतुन जाई सगळा रस्ता
वाट नुरावी जाणारातें
परी न कोणी ये रागातें ॥८६॥
खेळ पाहण्या उलट तयांनीं
उभे रहावें काम सोडुनी
टाळ्या कोणी पिटती कोडें
दुजा भांडणीं करी निवाडे ॥८७॥
हरी खेळतां विटिदांडूनें
आल्या जरि गोपिका पथानें
शिरीं घेउनी चुंबळ त्यावर
ठेवुनियां भरलेली घागर ॥८८॥
अचुक मारुनी विटिचा टोला
खट्याळ हा फोडीत घटाला
पाणी सांडुन चिंब भिजे ती
आणिक दुसर्‍या हांसहांसती ॥८९॥
हिनें कोपुने धरण्या यावें
चपळ सावळा दे हुलकावे
निराश होउन दमुन म्हणे ते
“ थांब, तुझ्या आईस सांगतें ” ॥९०॥
“ सुखें सांग जा. ” म्हणे लाघवी
मान वेळवी जीभ दाखवी
दुसरीचे पाठीसी राहुन
हिला हसूं ये झणिं तें पाहुन ॥९१॥
अशी सर्वही वेळ हरीनें खेळण्यांत दवडावी
भोजनास दे हांक यशोदा ती न परी ऐकावी ॥९२॥
किती खेळ खेळला तरीही
थकवा श्रीकृष्णासी नाही
दुबळी परि तीं इतर बालकें
धीर तयाचा इतुका न टिके ॥९३॥
वदती सगळे मग, “ ए कृष्णा. ”
दमलों आम्ही अता पुरे ना ! ”
कृष्णें त्यांसीं हसुन म्हणावें
“ दूध तूप रे कसें पचावें ” ॥९४॥
“ दूध असे बा कुणा प्यावया
पचण्याची मग गोष्ट कासया
तुला दूध नवनीत सांपडे
तुकडे आम्हाप्रती कोरडे ॥९५॥
तुम्हां घरीं आहे ना गोधन
कृष्ण विचारी विस्मित होउन
दुधतें त्यांचें कोठें जातें
उत्तर ये मथुराशिबिराते ॥९६॥
काय मुलें ठेऊन उपाशी
पुसे मुरारी सरोष त्यासी
भाव चांगला तेथे मिळतो
कोण आमुचा विचार करितो ॥९७॥
दूध दही लोणी घृत तेही जात विकाया सर्व
पेंद्या म्हणतो खरवड मिळते हेंच आमुचें दैव ॥९८॥
तशी बालकें कांहीं वदतीं
किती कथूं तुज घरच्या गमती
ताकहि लाभत ना प्रति दिवशीं
सकाळींच पाजिती म्हशीसी ॥९९॥
अपुली नाहीं स्थिती अशी बा
प्रेमळ माझे फार अजोबा
वदे सिदामा म्हणुनी मजसी
तोटा नाहीं घरीं कशासी ॥१००॥
घरांत अमुची परी म्हातारी
मेद ओघळे जिच्या शरीरीं
यथासांग तिज सर्व लागते
इतराना वाकडे बोलते ॥१०१॥
खाउं न देई घांस सुखाचा
स्वभाव असला असे तियेचा
म्हणुनी नसतां उणीव कसली
हाडें माझी कधीं न बुजलीं ॥१०२॥
वदे हरी यावरी गड्यांनों हें नाहीं कामाचें
गोरस खाउन बल मिळवावें असलें वय हें अमुचें ॥१०३॥
अविचारें जो छळी प्रजेसी
त्या कंसाच्या पशु सेनेसी
पोसताति हे धन लोभानें
घरीं पोर कळवळे भुकेनें ॥१०४॥
गोकुळांतले गोरस साचे
आहे गोकुळवासि जनांचें
अम्हा पुरोनी उरल्यावरते
सुखें विकाया मग जावे ते ॥१०५॥
सत्य तुझें हें भाषण सगळें
कोण परी मानील आपुलें
वदे वाकड्या कधीं अम्हास
सरळपणानें मिळे न गोरस ॥१०६॥
उगीच चिंता कशास त्याची
उणीव येथें ना युक्तीची
कृष्ण म्हणे घेऊन चर्‍हाटें
या मज जवळी उद्यां पहाटें ॥१०७॥
पहांटले अजुनी नव्हते तों गोपवधू मथुरेसी
निघती घेउन कुंभ शिरावर दूध तूप विकण्यासी ॥१०८॥
रेंगळती तारे आकाशीं
अजुन अशा सांवळ्या प्रकाशीं
अंधुक मूर्ती दिसती त्यांच्या
स्मृती पुसट जणुं बालवयींच्या ॥१०९॥
एकी मागुन एक चालती
दूध दह्याची घागर वरतीं
कुणी मधुरसें पद सांगावें
इतरांनीं तें सुस्वर गावें ॥११०॥
प्रतिदिवशींची ही परिपाटी
आजच कसली शंका पोटीं
परी तयांना काय कल्पना
सर्व वेळ सारखी असेना ॥१११॥
ताणुन दोर्‍या रस्त्यावरतीं
मुलें दों-कडे लपलीं होतीं
शीळ हरीची येतां कानीं
दोर्‍या धरिल्या उचलुनि त्यांनीं ॥११२॥
शीळ कशाची म्हणती तोची अडखळुनी दोरीला
पडल्या भूवर गोप कामिनी तोल नसे सांवरला ॥११३॥
दूधतुपाची घट्ट दह्याची
तशीच मडकीं नवनीताचीं
कोसळली कीं सवेंच खालीं
आणि मुलांची चंगळ झाली ॥११४॥
एक ताव दे नवनीतावर
दुजा दुधाची उचली घागर
मुखीं घालिती सांफडले तें
मूर्त सांवळी दूर हासते ॥११५॥
व्याकुळल्या गोपिका बापुड्या
दुधातुपानें भिजल्या साड्या
दांत दुखावे कोपर फुटलें
पाउल कोणाचें मुरगळलें ॥११६॥
सांवरुनी जों गोपी उठतीं
तों हीं पोरें पसार होती
लागतसे ना कृष्णहि हातीं
वायूची दुसरी मूर्ती ती ॥११७॥
यशोदेस येउनी तयांनीं वृत्त हरीचें कथिलें
परि जननीच्या न्याय - मंदिरीं शिक्षेचें भय कसले ॥११८॥
खरें न वाटे तिला कदापी
जरि शपथेनें कथिती गोपी
सांगे परि ती वत्सल आई
करीन मी तुमची भरपाई ॥११९॥
मेघनीळ तो दुसर्‍या वेळे
प्रकार कांहीं करी निराळे
लोणी चोरून पळतां वाटें
पसरुन ठेवी खूप सराटे ॥१२०॥
जरी घातिले टाळे दारा
ते न थांबवी गोरसचोरा
शिडी सारखी रचुनी पोरें
धाड्या मधुनी घरांत उतरे ॥१२१॥
उंच बांधिली शिंकी असती
काठी घाली हा त्या वरती
केले असती उपाय नाना
कृष्णा पुढती एक टिकेना ॥१२२॥
मुलें जाहलीं पुष्ट शरीरी
गोपवधू त्रासल्या अंतरीं
म्हणती हरि हा घरांत असतां
लाभूं दे नच अम्हां शांतता ॥१२३॥
त्रास होत हें खरें, त्यामुळें द्वेष चीड परि नाहीं
उलट कुठें तरि खोल, हवेसें खट्याळपण तें होई ॥१२४॥
आवडत्यांच्या वागणुकींतिल
विचित्रतेचें वोचत जरि सल
सुखकरता तरि त्यांतहि घेई
प्रेमाची कीं ही नवलाई ॥१२५॥
परी हरीच्या या खोड्यासी
नवीच भरती ये प्रतिदिवशीं
वदती गोपी हरीप्रती या
लाडावुन नच ठेवा वाया ॥१२६॥
गोरस चोरी फोडी रांजण
धान्य उधळितो करितां कांडण
लुगडे दिसतां तें टरकावी
घेउन चिमटे मुलास रडवी ॥१२७॥
खोडीविणें हा न बसे जराही
शिक्षा परी या करवे न कांहीं
या लागव्याते बघतांच बाई
चित्तांतला राग विरोनि जाई ॥१२८॥
उपाय कथितों अम्ही म्हणुनिया यशोदे तुला
सरे वरिस आठवें नच लहान हा राहिला
वनांत इतरासवें नित वळावयासी गुरें
हरीस तव पाठवी सकल लाड झाले पुरे ॥१२९॥

‘ गोकुलानंद ’ नांवाचा चवथा सर्ग समाप्त

लेखनकाल :-
कार्तिक, शके १८६७