श्रीगणुदासकृत - श्रीकृष्ण - कथामृत

संतकवि श्रीगणुदास यांनी रचलेले श्रीकृष्ण - कथामृत अमृताची गोडी देते.


श्रीकृष्ण कथामृत - प्रस्तावना

( ले. रा. द. रानडे )

या काव्याचे १८ सर्ग आहेत. वृत्त बहुतेक पादाकुलकच आहे. मधून मधून साक्या दिल्या आहेत. संत श्रीतुलसीदासाच्या चौपाया व दोहे यांच्या चालीवर श्रीकृष्ण - कथामृत रचलें गेलें आहे. तुलसीदासाच्या चौपाया व दोहे जसे त्यांनीं रचलेल्या रामचरित मानसांत आहेत, त्याचप्रमाणें गणुदास यांनीं प्रथम पादाकुलक वृत्तांत कांहीं श्लोक लिहून मधून मधून दोह्याप्रमाणें साक्या घातल्या आहेत. इतर काव्य ग्रंथांतून न आढळणारा प्रकार म्हणजे काव्यांत प्रत्येक सर्गाच्या आरंभीं मंगलाचरणाचे श्लोक ठेवणें हा प्रकार. या काव्यांत प्रत्येक सर्गाच्या आरंभी प्रथम संस्कृत भाषेंत रचलेला श्लोक, तदनंतर मराठी श्लोक, असा क्रम न चुकता दिलेला आहे. हे मंगलाचरणाचे श्लोक प्रौढ असून माहितीपूर्ण आहेत. या श्लोकांत ग्रंथकर्त्यांनीं उपनिषदादि आध्यात्मिक ग्रंथांचा भाव ( सर्व १३ श्लोक १ ) संतांच्या नामनिर्देशासह ( १३।२, १४।२,३ ) आणण्याचा प्रयत्न केला आहे. संस्कृत श्लोकांच्या रचनेवरून ग्रंथकर्त्यानीं संस्कृत भाषेवर प्रभुत्व मिळविलें आहे असें दिसतें.
श्रीगणुदास२ यांच्या काव्याचा पहिला गुण म्हणजे प्रसाद हा होय. ( २।२२-४६, १२।१४१-१८, १५।१२४-२०० ) माधुर्यगुणहि या काव्यांत असणारच, कारण कथामृत हें एका सामान्य नायकाचें नसून श्रीकृष्णासारख्या धीरोदात्त नायकाचें आहे. ( ३।५२; १०।९१-९७ ) श्रीकृष्णाच्या ओजस्वितेचें वर्णन करीत असतां काव्यांत ओजोगुणाचीही सलक आली आहे. ( ८।८३-८८, ९।६०-८२, १७।१८-३२, ) काव्यांत सर्वत्र भक्तिरस प्रधान असून शांत रसासह बहुतेक सर्व रस त्यांत गोवले आहेत. ( शांतरस ७।२३-७५, शृंगार ११।१२-२२, १३।९३-१०३, वीररस ८।७२-८४, करुणरस ९।४१-४९, भयानक २।५४-६२, ) काव्यांत क्लिष्टता मुळींच नसल्यामुळें काव्य वाचीत असतां रसभंग होण्याचें कारणच उरत नाहीं. भक्तिरसाचा प्रवाह चालूं असतां ग्रंथ कर्त्यास आपलें पांडित्य प्रदर्शन करावें, छंदोविषयक ज्ञान लोकांच्या नजरेस आणावें, अथवा वाचकांना चमत्कृतीचा अनुभव करून देण्याकरितां काव्यातं शब्दालंकार व अर्थालंकारयुक्त चित्रकाव्य रचन अलंकाराचा भडिमार करून सोडावा, इत्यादींचा मोह होतो पण ते प्रकार ग्रन्थकर्त्यानीं टाळले आहेत हें त्यांना भूषणास्पद आहे.