संत तुकडोजी महाराज

सर्व सामान्य लोकांच्या मनावर शिक्षणाचे महत्त्व बिंबवणारा , अस्पृश्यता गाडून टाका असे सांगणारा , स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणारा , सर्व धर्मांकडं सारख्याच नजरेनं पहा असे सांगणारा, राष्ट्रसंत म्हणजेच संत तुकडोजी महाराज.


भजन ६१ ते ६५

भजन - ६१

ये बोल बोल रे कन्हैया ! बोल एकदा ।

अंतरिचा भेद सख्या ! खोल एकदा ॥धृ॥

तुज भेटण्यास माझा, जीव भुकेला ।

दुःख हे अती विरहे, सांगु कुणाला ? ।

मनी डोल डोल रे कन्हैया ! बोल एकदा ॥१॥

कोणि ना तुझ्याविण या, प्रेमि जिवाचा ।

न्याहाळुनि पहा अमुच्या, भाव मनाचा ।

बोल एकदा तरि ते ! बोल एकदा ॥२॥

संसार तुझ्या नामे, सोडला हरी ! ।

सौभाग्य तुझे ल्यावे, ही आस अंतरी ।

तुकड्याची हाक घे कन्हैया ! बोल एकदा ॥३॥

भजन - ६२

हस एकदा तरी हस रे ! कुंजविहारी ! ।

त्या गोजिर्‍या रुपाची मज लागु दे तारी ॥धृ॥

कंठात वैजयंती, कानात कुंडले ती ।

शिरी मोरमुकुट झळके, किति केस कुरळ देती ।

किति गोड नेत्र हे, अधरी सुरस बांसरी ॥१॥

बघताचि तुझी वाट जिव हा, वेड्यापरी ।

बेचैन सदा राही, मन वृत्ति बावरी ।

दिसलास तसा बोल सख्या ! एकदा तरी ॥२॥

मन बावरे अता हे तव ध्यान सोडि ना ।

बस जन्मजन्मिचीही, ती हरलि कल्पना ।

तुकड्यास पदी घे आपुल्या, आस कर पुरी ॥३॥

भजन - ६३

मन बावरे तुझ्या विरहे, काही सुचेना ।

जिव घाबरी अती भ्रमरा-परिस, बसेना ॥धृ॥

'असशी कुठे तू हरी ?' ही चिंतना अती ।

'कुणि भेटवील का ?' म्हणुनी भटकते मती ॥१॥

काशी नि द्वारका करुनी, तीर्थ फिरुनी ।

चारीहि धाम हे पहाता, ना दिसे कुणी ।

मनि शांति ना जरा दिसते, नेत्र फसेना ॥२॥

कुणि संत, साधुही वदती, जवळची हरी ।

पहा ज्ञान-दिवा लावुनिया, हृदय-मंदिरी ।

नच मार्ग मिळे हा दृढ या, व्हावया मना ॥३॥

ये भेटे सख्या ! पतितासी, रुक्मिणी-वरा !

तू सर्वसाक्षि हे कळले, तुजचि श्रीधरा !

तुकड्याची आस ही पुरवी, देइ दर्शना ॥४॥

भजन - ६४

कुणि सांगिता पता हरिच्या, गावि जावया ।

मन बावरे सदा फिरते, त्यासि पहावया ॥धृ॥

म्हणताति संतही देती, मार्ग दावुनी ।

इतुका करा उपकार, तया भेटवा कुणी ।

अर्पीन तुम्हापायि तनू, भेट घ्यावया ॥१॥

रानी वनी कुणी फिरती, लाभण्या रुपा ।

दरी-खोरी कुणी फिरती, लाभण्या रुपा ।

परि दूर हरि हा न दिसे, कष्ट करुनिया ॥२॥

कुणि सांगती जनी हरि हा, येई धावुनी ।

परि भक्त पाहिजे त्यासी, प्रेमभावनी ।

तुकड्यासि दया द्या इतुकी, लाभावा तया ॥३॥

भजन - ६५

हरी आठवा मनी अपुल्या, भाव धरोनी ।

सोडूचि नका त्यासि कधी, जागृति, स्वप्नी ॥धृ॥

संसार भूल सारी, हा भ्रमचि ओसरा ।

हरि ठेवितसे या जीवा, वागु द्या बरा ।

सुख-दुःख सोसवोनि सदा, ध्यास घ्या मनी ॥१॥

ध्यानि धरा हरी नयनी, अंतरंगि या ।

रमवा सदा तयासी जिवी, आळवोनिया ।

तुकड्या म्हणे मिळे प्रभु हा, येइ धावुनी ॥२॥